व्यायामाला द्या संतुलित आहाराची जोड

सध्या मी अभिनयाबरोबरच खऱ्या जीवनात नव्याने आईपण अनुभवत आहे. माझ्या जीवनात हा नवा अध्याय सुरू झाला आहे.
actress vidisha srivastava
actress vidisha srivastavasakal
Updated on

- विदिशा श्रीवास्तव, अभिनेत्री

सध्या मी अभिनयाबरोबरच खऱ्या जीवनात नव्याने आईपण अनुभवत आहे. माझ्या जीवनात हा नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यामुळे फिटनेस, आहार आणि मानसिक स्वास्थ्याचे संतुलन राखण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. आई होणे हा एक सुंदर; परंतु आव्हानात्मक अनुभव आहे. माझ्या फिटनेसची काळजी घेणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

व्यायामामुळे मी तंदुरुस्त राहते आणि नव्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ऊर्जावान असते. माझ्या व्यायामाच्या दिनचर्येत कार्डिओ, वजन उचलणे आणि ताण कमी करणाऱ्या व्यायामांचा समावेश असतो. हे सर्व मला शारीरिकदृष्ट्या सशक्त ठेवतात आणि माझ्या शरीराला प्रसूतीनंतर पुनःसंचयित करण्यात मदत करतात.

योगासनं माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. योगाच्या माध्यमातून मी माझ्या शरीराला आणि मनाला संतुलित ठेवते. योगामुळे शरीरातील लवचिकता वाढते आणि मन शांत राहते. नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांसाठी योगासनं फायदेशीर असतात; कारण त्यामुळे प्रसूतीनंतरच्या तणावापासून मुक्ती मिळते.

प्राणायाम आणि ध्यानधारणाही माझ्या दिनचर्येत महत्त्वाचे स्थान घेतात. यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. मैदानावरील खेळांमुळे मला शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते. माझ्या फिटनेसचे रहस्य म्हणजे मला संतुलन राखता येते. बाहेरील खेळांमुळे मी ताजेतवाने, तंदुरुस्त आणि उत्साही राहते.

मी सध्या ‘ॲण्ड टीव्ही’वर ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेत सुंदर अनिताभाभीची भूमिका साकारत आहे. अभिनय क्षेत्रात काम करत असल्याने मलाही माझा फिटनेस जपावा लागतो. त्यासाठी व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानधारणेबरोबरच आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे संतुलित आहार घेण्याचे महत्त्व मला नेहमीच जाणवते.

माझ्या आहारात ताजी फळे, भाज्या, प्रथिनयुक्त आहार आणि भरपूर पाण्याचा समावेश असतो. मी कोणत्याही प्रकारच्या जंक फूडला स्थान देत नाही, कारण मी जाणते, की चांगला आहार हा शारीरिक तंदुरुस्तीचे मुख्य स्तंभ आहे. माझ्या आहारातील प्रत्येक घटक माझ्या शरीराला आवश्यक पोषण पुरवतो.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स...

  • मानसिक स्वास्थ्य हे माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारांमुळे मी मानसिक तणावाला तोंड देते. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता ध्यानधारणा करावी.

  • आई झालेल्या महिलांनी मानसिक स्वास्थ्य राखणे महत्त्वाचे आहे. कारण त्यांच्यावर घरगुती जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण असतो. ध्यानाच्या माध्यमातून मी मनातील नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मक दृष्टिकोन राखते. त्यामुळे सकारात्मक विचार करा.

  • माझ्या जीवनशैलीचा समतोल मला तंदुरुस्त, स्वास्थ्य आणि आनंदी ठेवतो. मी प्रत्येक दिवसाची सुरुवात उत्साहाने करते आणि माझ्या फिटनेसच्या मंत्रामुळे कामात आणि घरगुती जबाबदाऱ्यांत संतुलन राखू शकते.

  • फिटनेसची काळजी घेणे ही माझ्यासाठी एक प्रेरणादायी प्रक्रिया आहे आणि मीही अनेक महिलांना प्रेरणा देऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपायलाच हवे.

  • सध्या प्रत्येक जण खूप व्यग्र असतो. मात्र, दिवसातील अर्धा तास तरी कोणत्या ना कोणत्या व्यायामासाठी काढणे आवश्यक आहे.

  • आपण स्वास्थ्यपूर्ण राहिलो तर आपले कुटुंबही स्वास्थ्यपूर्ण राहील.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.