कॅल्शिअम गोळ्या जास्त खाल्यास किडनी स्टोन (खडे होतात) हे चुकीचे आहे. सिनीयर सिटीझन लोकांना वयानुसार कॅल्शिअमची हाडांच्या मजबुतीसाठी गरज असते.
1) कॅल्शिअम गोळ्या जास्त खाल्यास किडनी स्टोन (खडे होतात) हे चुकीचे आहे. सिनीयर सिटीझन लोकांना वयानुसार कॅल्शिअमची हाडांच्या मजबुतीसाठी गरज असते. या गोळ्या चालू असताना भरपूर पाणी पिणे, कॅल्शिअम गोळ्यांबरोबर व्हिटॅमिन D३ घेणे. आहारात कॅल्शिअम किंवा शरीरात कॅल्शिअम कमी असेल, तर हाडामधून कॅल्शिअम जास्त प्रमाणात ओरबाडून काढले जाते. त्याचा परिणाम रक्तामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण मेन्टेन केले जाते. रक्तप्रवाहात जास्त कॅल्शिअम असल्यामुळे ते लघवीवाटे बाहेर पडते. कमी आहारात जास्त ऑक्सेलेट व कमी कॅल्शिअममुळे खडे निर्माण होतात.
2) ऑर्थोपेडिक मॅट्रेस घेणे, मणक्यासाठी फायदेशीर आहे, असा गैरसमज आहे. Firm mathen ही मणक्यासाठी सर्वोत्तम आहे. लाकडाच्या फळीवरती पातळ कापसाची गादी टाकून झोपणे हे योग्य. त्यासाठी लाखो रुपयांची ऑर्थोपेडिक मॅट्रेस, स्प्रिंग मॅट्रेस, कॉयर, फोम, मेमरी फोम मॅट्रेसची गरज नसते. मणक्याचा फार त्रास असल्यास साध्या चटईवर झोपणेही योग्य असते.
3) मानेत, कंबरेत किंवा इत्तर हाडांमध्ये कडकड आवाज येणे, फार भयंकर असते असा समज आहे. मात्र, हे काही आजार नसून आपल्या सांध्यांमधील Fluid एक जागेवरून दुसऱ्या जागेवर सरकते.
4) भरपूर पाणी पिल्याने माझ्या मणक्यातील सुकलेली गादी परत तंदुरुस्त होते, हा समज चूक. पाणी पिणे हे शरीरासाठी चांगले आहे, परंतु जास्त पाणी पिल्याने मणक्यातली गादी मजबूत होते हे चुकीचे आहे.
5) भरपूर तूप किंवा तेल खाल्ल्यास सांधे अधिक मजबूत होतात व संधिवात बरा होतो, हे चूक.
6) मणक्याचे ऑपरेशन झाल्यावर माझी लवचिकता कमी होईल, वाकता येणार नाही, खाली बसता येणार नाही, हा समज चूक. मणक्याचे ऑपरेशन आता अत्याधुनिक पद्धतीने होते, चिरफाड कमी होते, रक्तस्राव कमी होतो. त्यामुळे रुग्ण परत आपल्या active जीवनशैलीकडे वळू शकतो व पुढच्या आयुष्यात तो एक Normal जीवन जगू शकतो.
7) हाता-पायांमध्ये कंपने (Tremors) ही मणक्यांमुळे होतात ही चूक. Neurological (मेंदूशी निगडित) आजारांमध्ये अशी कंपने बघायला मिळतात. त्याचा मणक्याशी संबंध फार कमी, क्वचितच असतो.
8) कंबरेचा किंवा मानेचा पट्टा हा कायम वापरायचा असतो, हा समज चूक. जोपर्यंत वेदना आहेत, तोपर्यंत बेल्टचा वापर करायचा असतो. अतिवापर केल्यास त्याचा दुष्परिणाम होतो, व स्नायू कमजोर होतात.
9) प्रेग्नन्सीमध्ये व त्यानंतर (डिलिव्हरीनंतर) व्यायाम करायचा नाही, हे चूक. प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार व्यायाम करता येतात. डिलिव्हरीनंतरसुद्धा व्यायाम करता येतात व ते करावेत. (टीप : तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. कारण काही अशा प्रेग्नन्सी असतात- ज्यांच्यामध्ये व्यायाम वर्जित असतो. पण बहुतांश प्रेग्नन्सीमध्ये पाठदुखी किंवा मानदुखीसाठी व्यायाम करता येतात.
10) मान दुखल्यास उशी वापरू नये, हा समज चूक. झोपताना मानेसाठी उशी गरजेची असते. झोपताना मान, खांदा, खुबा हे एका रेषेत असले पाहिजेत. त्यामुळे उशी किंवा मानेखाली रोल्ड टॉवेल घेणे गरजेचे असते.
11) प्रत्येक मणक्याच्या आजाराला ऑपरेशनची गरज असते, हा समज चूक. ९९ टक्के मणक्यांचे आजार हे व्यायाम, योग, फिजिओथेरपीच्या साह्याने बरे होते. फक्त एक टक्के लोकांना ऑपरेशनची गरज पडते.
12) मणक्याच्या ऑपरेशननंतर अपंगत्व येते, हा समज चूक. आता नवीन तंत्रज्ञाने, अत्याधुनिक सुविधा व कुशल शल्यविशारद अशा त्रिवेणी संगमामुळे मणक्यांच्या ऑपरेशनच्या यशाचे प्रमाण उत्तम आहे व बहुतांश पेशंट ऑपरेशननंतर संपूर्ण बरे होतात व ऑपरेशनच्या काही तासांतच चालायला लागतात. ऑपरेशनच्या काही दिवसांनंतर गाडी चालवणे, शेती करणे, गृहिणींना घरातील सर्व कामे करणे शक्य होते. व्यायाम - योग करणे, धावणे, ट्रेकिंग करणे, हे सहज शक्य होते.
(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणका तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.