Yog For Success : अष्टांग योगात सापडतो यशस्वी जीवनाचा कानमंत्र, तुम्हालाही होईल साध्य

यश साध्य करण्यासाठी अष्टांग योग आपल्याला मदत करत असतो.
Yog For Success
Yog For Success esakal
Updated on

श्रुती आपटे :-

Yog For Success : माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याच्या कामात एकाग्रता, चिकाटी आणि सातत्या या तीन गुणांची प्रचंड आवश्यकता असते. ते साध्य करण्यासाठी अष्टांग योग आपल्याला मदत करत असतो.

योग साधकाने मन एकाग्र करून, चित्त आणि इंद्रियांचे व्यापार आवरून धरून, आसनावर बसून आत्मशुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. भगवद्‍गीतेच्या सहाव्या अध्यायात ध्यान योग सांगितला आहे. पातंजली योगसूत्राच्या अभ्यासाचे वर्णन श्रीकृष्णाने केले आहे. यालाच अष्टांग योग असेही नाव आहे‌.

यम, नियम, आसन, बंध, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी अशी योगाची आठ अंगे आहेत. समाधी साध्य होणे हे अत्यंत कठीण असते. ज्ञानयोग, कर्मयोग भक्तियोग अशा कोणत्याही योग मार्गाने आनंद किंवा ईश्वरप्राप्ती करून घ्यायची असेल, तरी त्यासाठी चित्तशुद्धी आणि एकाग्रता होणे आवश्यक असते. ती अष्टांगयोगाच्या अभ्यासाने साधता येते.

म्हणून अगदी कर्मयोग्याने सुद्धा आत्मशुद्धीसाठी अष्टांग योगाचा सराव करायला हवा. श्रीकृष्ण सांगतात, की समत्वबुद्धी संपादन करण्यासाठी योग्याने एकांतात राहून सर्व इच्छांचा त्याग करावा. एखादे स्वच्छ, पवित्र स्थान निवडावे. फार उंचही नाही आणि फार खालीही नाही अशा स्थिरजागी कुश गवतावर मृदू मृगाजिन पसरावे.

Yog For Success
Yog Guru Ramdev : योगगुरू रामदेवबाबा यांचा माफीनामा

त्यावर बसून चित्त, इंद्रिये, मन नियंत्रित करून ध्यान लावण्याचा अभ्यास करावा. पाठीचा कणा, मान आणि मस्तक सरळ उभ्या रेषेत स्थिर करावे. इतर दिशांकडे न पाहता नाकाच्या अग्रावर दृष्टी ठेवून ध्यान करावे. अतिशय शांत आणि निर्भय होऊन परमात्म्याशी एकरस होण्याचा प्रयत्न करावा. असे प्रयत्न सतत, चिकाटीने न कंटाळता केल्यास योगी परमशांती आणि निर्वाण पद प्राप्त करून परमात्म स्वरूपात लय पावतो.

बालमित्रांनो, मनात खूप विचार असतील, तर मन-चित्त-बुद्धी यांच्या शक्ती क्षीण होतात. मग वाचलेले लक्षात न राहणे, आकलन न होणे, पुनःपुन्हा अभ्यास करून सुद्धा परीक्षेत काहीच न आठवणे, चिडचिड होणे, अभ्यास करायची इच्छाच नसणे इत्यादी समस्या निर्माण होतात आणि प्रगतीच खुंटते. अशावेळी अगदी सोप्या पद्धतीने ध्यानाचा सराव केल्यास पुष्कळ समस्या नाहीशा होतात.

Yog For Success
Daily Yog: एकाग्रता वाढवण्यासाठी करा वृक्षासन

अभ्यासाला बसण्यापूर्वी, रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी लवकर उठून प्रत्येकाने थोडा वेळ ध्यान करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी शांत ठिकाणी मांडी घालून सुखासनात बसावे. पाठीचा कणा सरळ ठेवून शरीर सैल सोडावे. डोळे अलगद मिटून घ्यावे. काही वेळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू मनातले विचार कमी होत असल्याचे जाणवेल. अतिशय शांत आणि प्रसन्न वाटू लागेल. अशा स्थितीत शक्य तेवढा वेळ बसण्याचा प्रयत्न करावा. ही ध्यानाची अगदी सोपी पद्धत आहे. याच्या सरावाने तुम्हाला स्वतःमध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्याचे नक्कीच अनुभवायला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.