श्वसन ध्यान

बहिणाबाई... एक अशिक्षित, अडाणी शेतकरीण बाई. ना शिक्षण, ना कुणाचं मार्गदर्शन! एक महान सत्य जगाला किती सोप्या शब्दातून सांगून गेल्या?
Breathing meditation
Breathing meditationsakal
Updated on

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

आला सास गेला सास। जीवा तुझं रे तंतर।

अरे जगणं मरणं । एका श्वासाचं अंतर ।।

बहिणाबाई... एक अशिक्षित, अडाणी शेतकरीण बाई. ना शिक्षण, ना कुणाचं मार्गदर्शन! एक महान सत्य जगाला किती सोप्या शब्दातून सांगून गेल्या?

बाहेरच्या जगात चाललेली धावपळ, गडबड यांमुळे जीवन गतिमान झालं आहे. संगणक, मोबाइलही ज्ञानेंद्रियांना उद्दिपीत करतात. यातून विचार, चिंता, विश्लेषण यांची मालिका मनात सुरू राहते. मग मनाला विश्रांती मिळणार तरी कशी? मन गतिमान आहे. ते स्थिर कसं करता येईल? याला उत्तर म्हणजे ‘श्वसन ध्यान’ हा ध्यानाचा प्रभावी प्रकार!

हे ध्यान कसं करायचं?

डोळे मिटून शांत बसावं. शक्यतो शरीराची कुठलीही हालचाल होऊ देऊ नये. सगळं शरीर अगदी शिथिल सोडावं.

पहिला टप्पा : अवयव ध्यान

मनानं पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत सगळ्या अवयवांकडे, जाणीवपूर्वक बघून ते शिथिल होऊ द्यावेत. त्यांच्यातले ताणतणाव, आकुंचन कमी होत निघून जाईल असं पाहावं.

पतंजलींनी सांगितलेलं ‘प्रयत्न शैथिल्य’ ते हेच. अवयव ध्यान करण्यामुळे मन ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या बाह्य संवेदनांऐवजी, शरीरातल्या अवयवांकडून येणाऱ्या संवेदनांकडे वेधलं जातं. जाणीव वेगळ्याच स्तरावर पोचते.

दुसरा टप्पा : संथ श्वसन

संथ श्वसन म्हणजे आपोआप घडणारं नैसर्गिक श्वसन. अवयव ध्यान केल्यामुळे शरीर, मन स्थिर होतं. अशा स्थितीत सहजपणे जे श्वसन होतं, ते संथ श्वसन.

तिसरा टप्पा : श्वासाबद्दल साक्षीत्व

नेहमीच्या श्वसनात पोटाची हालचाल होत असते. श्वास घेताना पोट किंचित पुढे येतं. श्वास सोडताना आत जातं. ही नैसर्गिक हालचाल अनुभवावी. लक्ष इकडेतिकडे जातंय, मनात विचार येत आहेत असं वाटलं, तरी पुन्हा पोटाकडेच लक्ष ठेवावं.

श्वसन चालू असताना, नाकपुड्यांच्या आत, नाकाच्या शेंड्याजवळ हवेचा स्पर्श होतो. श्वास घेताना काहीसा थंड स्पर्श, तर सोडताना किंचित उबदार, कोमट स्पर्श जाणवतो. तो अनुभवताना ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदनांकडे लक्ष जात नाही. मन विचारांमध्ये गुंतत नसल्याने भावनांच्या आहारीही जात नाही. शांत, शिथिल होतं. अशा वेळी कुठलेच ताण त्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत. शरीराची जाणीवही कमी होत जाते. शरीर-मनाचं अधिकाधिक सखोल शिथिलीकरण होत जातं.

चौथा टप्पा : दीर्घ श्वसन

आता श्वास घेणं-सोडणं थोडं दीर्घ करावं. श्वास घेण्यासाठी, सोडण्यासाठी सारखाच वेळ द्यावा. मनात चार अंक मोजावेत. आता होत असलेलं दीर्घ श्वसन, हे प्रयत्नानी तालबद्ध केलेलं श्वसन आहे. या श्वसनानं मानसिक शांतता प्रस्थापित होते हे सिद्ध झालं आहे.

स्नायूंवर असणारा ताण आणि मनावरचा ताण, यांचा घनिष्ट संबंध आहे. एक ताण कमी झाला, की दुसराही कमी होतो. रक्तदाब, हृदयगती, श्वसनगती या ध्यानात खूपच कमी होते.

अनेक शास्त्रोक्त प्रयोगातले निष्कर्ष असे आहेत, की मेंदूच्या पेशींचं कार्य कमी होतं, त्यावेळी साधकाला फार शांत, शिथिल वाटतं. रक्ताभिसरणाला अडथळा उरत नाही. हृदयापासून त्वचेकडे शेवटच्या टोकांपर्यंत रक्तपुरवठा चांगला होतो.

उच्चरक्तदाब, निद्रानाश, आम्लता, हायपरटेन्शन यांसाठी हे ध्यान वरदान आहे. दिवसभर ताजंतवानं, प्रसन्न वाटतं. शांती, सुख, आनंद यांचं अनोखं मिश्रण तयार होतं. दुःख, संताप, राग, द्वेष या भावनांना थारा उरत नाही. मानसिक स्थैर्य लाभतं. शारीरिक, मानसिक थकवा दूर होतो. दिवसभरातले ताणतणाव त्रास देत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.