मुंबई : हेपॅटायटिस सी हा एक विषाणू प्रादुर्भाव असून, तो यकृताच्या कार्यावर परिणाम करतो. ह्यामुळे यकृताची हानी होते,सायऱ्हॉसिस व यकृताच्या कॅन्सरसारखे गंभीर आजारही होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरात ७१ दशलक्ष रुग्ण गंभीर स्वरूपाच्या हेपॅटायटिस सी विकाराने ग्रस्त आहेत आणि दरवर्षी ४००००० हून अधिक जणांचा ह्या विकाराने मृत्यू होतो. अर्थात योग्य निदान व उपचारांद्वारे हेपॅटायटिस सी प्रभाविरित्या व्यवस्थापित केला जाऊ शकतो.
हेपॅटायटिस सी आणि त्याच्या निदानात्मक साधनांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने, व्यक्ती, आरोग्यसेवा व्यावसायिक व समुदायांसाठी, महत्त्वाची माहिती देत आहेत न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे चीफ पॅथोलॉजिस्ट डॉ. राजेश बेंद्रे. (causes and precautions for Hepatitis C)
हेपॅटायटिस सी विकाराबद्दलची महत्त्वपूर्ण तथ्ये :
● हेपॅटायटिस सी हा विकार बहुतेकदा कोणतीही लक्षणे दाखवत नाही, म्हणजेच हा आजार झालेल्या बहुतेकांना कोणत्याही लक्षणांचा अनुभव येत नाही. त्यामुळे तुम्हाला हेपॅटायटिस सी ह्या विकाराचा धोका असेल, तर चाचणी करून घेणे निर्णायक आहे.
● हेपॅटायटिस सी ह्या विकाराच्या दृष्टीने धोक्याचे घटक म्हणजे रक्त संक्रमण किंवा अवयव प्रत्यारोपण,हेमोडायलिसिस,रेझर्स किंवा टूथब्रशसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू सामाईकपणे वापरणे आदी.हेपॅटायटिस सीचा प्रादुर्भाव झालेल्या मातेपासून जन्माला आलेल्या अर्भकाला हा विकार होण्याचा धोका असतो, हेपॅटायटिस सीने ग्रस्त व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास हा विकार होऊ शकतो आणि इंजेक्शनद्वारे घेतल्या जाणाऱ्या औषधांतून हा विकार होऊ शकतो.
● हेपॅटायटिस सीचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये रक्ताची चाचणी- सेरोलॉजी, आरटीपीसीआर व जेनोटायपिंग चाचण्यांचा समावेश होतो.
● रक्ताच्या प्रवाहातील हेपॅटायटिस सीच्या प्रतिपिंडांच्या (अँटिबॉडीज) अस्तित्वाचे निदान ब्लड सेरोलॉजिकल चाचणीमध्ये होऊ शकते. प्रतिपिंडे आढळल्यास विषाणूच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी दुसरी चाचणी केली जाते.
● संख्यात्मक आरटीपीसीआर चाचणीमध्ये रक्तातील हेपॅटायटिस सी विषाणूच्या आरएनएचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर, म्हणजे प्रतिपिंडे निर्माण होण्यापूर्वीही, होऊ शकते. प्रतिपिंड चाचणीची निष्पत्ती पॉझिटिव आल्यास तिची पुष्टी करण्यासाठी ह्या चाचणीचा उपयोग केला जातो. तसेच उपचारांच्या परिणामकारकतेवर देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने एचसीव्ही आरएनए विषाणूभार तपासण्यासाठीही ही चाचणी केली जाते.
● एचसीव्ही जेनोटाइप - हेपॅटायटिस सी विषाणूचे (एचसीव्ही) वर्गीकरण, समान जनुकांवर आधारित प्रवर्गामध्ये, करण्यासाठी ह्या चाचणीचा उपयोग केला जातो. एचसीव्हीचे सहा जेनोटाइप्स (जनुकीय प्रकार) आहेत. त्यांना 1 ते 6 असे लेबलिंग करण्यात आले आहे. एचसीव्हीचे सर्व जनुकीय प्रकार यकृताला सारख्याच प्रमाणात हानी पोहोचवतात. मात्र, जेनोटाइप 1चा, विशेषत: 1b ह्या उपप्रकाराचा, प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांमध्ये सायऱ्होसिस होण्याची किंवा यकृताला तीव्र स्वरूपाच्या जखमा (स्कारिंग) होण्याची शक्यता, अन्य जेनोटाइप्सच्या प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या तुलनेत, अधिक असते. 1b आणि 3 ह्या जेनोटाइप्समुळे यकृताचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. बहुतेक जणांना एकाच, प्रबळ जेनोटाइपचा प्रादुर्भाव होतो पण एका वेळी एकाहून अधिक जेनोटाइप्सच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होणेही शक्य आहे.
● हेपॅटायटिस सीवरील उपचारांमध्ये विषाणूविरोधी (अँटिव्हायरल) औषधे तसेच यकृत प्रत्यारोपण ह्यांचा समावेश होतो. थेट कृती करणारी विषाणूविरोधी औषधे (डायरेक्ट-अॅक्टिंग अँटिव्हायरल्स अर्थात डीएए) बहुतेक रुग्णांना झालेला हेपॅटायटिस सीचा प्रादुर्भाव बरा करते. विशेषत: एचसीव्ही जेनोटाइपनुसार विशिष्ट उपचार दिले देल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. हे उपचार साधारणपणे 8-12 आठवडे चालतात आणि त्याचे काही साइड इफेक्ट्स असतात. यकृताचे गंभीर स्वरूपाचे नुकसान झाले असल्यास, यकृत प्रत्यारोपणाची गरज भासू शकते.
हेपॅटायटिस सीचा प्रतिबंध :
● हेपॅटायटिस सी प्रादुर्भावाचा प्रसार कमी करण्यासाठी प्रतिबंध ही गुरूकिल्ली आहे. हेपॅटायटिस सी तसेच लैंगिक संबंधांतून संक्रमित होणाऱ्या अन्य प्रादुर्भावांचे संक्रमण रोखण्यासाठी, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे व कंडोम्सचा वापर करणे ह्या सवयी महत्त्वाच्या आहेत.
● रेझर्स, टूथब्रश तसेच ज्यांचा रक्ताशी संपर्क येऊ शकतो अशी वैयक्तिक उपकरणे कोणालाही वापरण्यास देऊ नये तसेच अन्य कोणाची उपकरणे वापरू नये.
● औषधांसाठी सुरक्षित इंजेक्शन्सचा वापर करावा आणि सुया, सिरिंजेस किंवा अन्य उपकरणे एकाची दुसऱ्याला वापरू नयेत.
● हेपॅटायटिस ए व बी ह्या विकारांसाठी लसीकरण करून घ्यावे; हेपॅटायटिस सीवर सध्या लस उपलब्ध नाही.
● हेपॅटायटिस सी विषाणूशी संपर्क आल्याची शंका वाटत असेल, तर स्वत:ची चाचणी करून घ्यावी. सुरुवातीच्या टप्प्यावर निदान होऊन उपचार मिळाल्यास यकृताची हानी टाळता येते तसेच विषाणूच्या प्रसारालाही प्रतिबंध करता येतो.
सूचना - या लेखात दिलेली माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या औषधोपचारांसाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.