उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये रेबीज झाल्याने एका १४ वर्षीय मुलाचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या मुलाला एक महिन्यांपूर्वी कुत्रा चावला होता. पण वेळेवर उपचार न झाल्याने रेबीजचा संसर्ग वाढत गेला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानिमित्ताने रेबीजपासून संरक्षणासाठी काय काळजी घ्यावी, हा आजार कसा होतो, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
कुत्र्याने चावल्यानंतर काही दिवसांमध्येच मुलामध्ये विचित्र लक्षणं दिसून आली. तो हवा आणि पाण्याला घाबरत होता. पण जोवर घरच्यांनी या मुलाला डॉक्टरांकडे नेलं, तोवर बराच वेळ निघून गेला होता. वेळेवर जर रेबीजचे उपचार झाले नाहीत, तर तो जीवघेणा ठरू शकतो, याचं हे उदाहरण आहे.
फेलिक्स हॉस्पिटलचे डॉक्टर गुप्ता यांनी आजतकला दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी रेबीजमुळे १८ ते २० हजार जणांचा मृत्यू होतो. भारतामध्ये रेबीजच्या ३०- ६० टक्के रुग्णांमध्ये तसंच, त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये १५ वर्षांहून कमी वयाच्या मुलांचा समावेश आहे. कारण लहान मुलांमध्ये चावा घेतल्याच्या खुणा ओळखल्या जात नाहीत आणि त्याबद्दल जागरुकताही नाही. भारतामध्ये माणसांना झालेल्या रेबीजसाठी ९७ टक्के प्रकरणांमध्ये कुत्रेच जबाबदार आहेत. त्यानंतर २ टक्के मांजर, गिधाडं आणि इतर गोष्टी उरलेल्या एक टक्क्यात येतात.
रेबीज म्हणजे काय, तो कशा प्रकारे पसरतो?
रेबीज हा एक आजार आहे. हा आजार रेबीज नावाच्या विषाणूच्या संसर्गामुळे होतो. हा आजार मुख्यतः प्राण्यांचा आजार आहे. पण संक्रमित प्राण्यांकडून हा आजार माणसांमध्येही पसरू शकतो. हा विषाणू संक्रमित प्राण्यांच्या लाळेमध्ये आढळतो. जेव्हा प्राणी माणसाला चावतो, तेव्हा हा विषाणू या प्राण्याच्या लाळेवाटे मानवी शरीरात प्रवेश करतो.
संक्रमित प्राण्यांच्या लाळेमुळे डोळा, तोंड किंवा उघड्या जखमेवाटे हा संसर्ग पसरू शकतो. या आजाराची लक्षणं अनेक महिन्यांपासून काही वर्षांपर्यंतही दिसून येतात. साधारणपणे लक्षणं दिसण्याची सुरुवात पहिल्या १ ते ३ महिन्यातच होते. रेबीज प्रामुख्याने कुत्रे, माकड, मांजर यांच्या मार्फत माणसांमध्ये पसरतो. पण सध्या भारतामध्ये कुत्र्यांच्या चावण्याने रेबीज होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.
रेबीजची प्रमुख लक्षणं कोणती?
रेबीज आजाराची लक्षणं संक्रमित प्राणी चावल्यानंतर काही दिवसांनी दिसू लागतात. काही वेळा ही लक्षणं दिसण्यासाठी काही दिवस ते काही वर्षांचा कालावधीही लागतो. रेबीजचं प्रमुख लक्षण म्हणजे ज्या ठिकाणी प्राणी चावतो, तिथले स्नायू ठणकू लागतात.
विषाणू शरीरात पोहोचल्यानंतर रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचतो आणि लक्षण दिसायला सुरुवात होते. या लक्षणांमध्ये वेदना, थकवा येणे, डोकेदुखी, ताप, स्नायू आखडणे, चिडचिड, व्याकुळता, विचित्र विचार येणे, अशक्तपणा, लाळ आणि अश्रू जास्त प्रमाणात येणे, प्रकाश, आवाज सहन न होणे, बोलताना अडखळणे यांचा समावेश आहे.
जर संक्रमण जास्त पसरलं तर इतरही काही लक्षणं दिसून येतात. यामध्ये सगळ्या गोष्टी दोन दोन दिसणे, तोंड उघडताना त्रास होणे, तोंडातून फेस येणे, अशा प्रकारच्या लक्षणांचाही समावेश आहे.
रेबीजचे उपचार काय?
एकदा संसर्ग झाला की रेबीजवर कोणताही उपाय नाही. पण बरेचसे लोक या आजारातून बरे झाले आहेत. तरीही कमी अधिक प्रमाणात धोका हा राहतोच. जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही रेबीजच्या संपर्कात आला आहात, तर हा आजार गंभीर स्वरुप घेण्याआधी तुम्ही लस घेणं गरजेचं आङे.
घरात जर पाळीव प्राणी किंवा कुत्रा असेल तर त्याच्या खाण्यापिण्याकडे आणि वागण्याकडे लक्ष ठेवावे. त्या प्राण्याला वेळच्या वेळी लस देणंही गरजेचं आहे. जेणेकरून हा प्राणी स्वतःही आजारी पडणार नाही आणि दुसऱ्या कोणालाही धोका निर्माण करणार नाही. जर वेळच्या वेळी प्राण्यांचं लसीकरण केलं, तर तुम्ही रेबीजपासून बहुतांश प्रमाणात वाचू शकता.
कुत्रा चावला तर काय करावे?
जर तुम्हाला कुत्रा चावला, तर सर्वात आधी ती जागा साबणाने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे रेबीज विषाणूचा प्रभाव थोडा कमी होईल. तसंच कुत्रा चावल्यानंतर तात्काळ रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्याने रेबीज प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.