जालना : मागील काही दिवसांपासून पहाटे थंडी आणि दुपारी कडक ऊन असा दुहेरी ऋतूचा अनुभव जालनेकरांना येत आहे. मात्र, या ऋतू बदलाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, तापीच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे ऋतू बदलाच्या काळात आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घेणे, अचानक वाढलेल्या उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणेही गरजेचे आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यात पहाटेची थंडी कायम आहे. तर, दुसरीकडे दुपारी उन्हाचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. या थंडीसह वाढत्या तापमानाचा मानवी आरोग्यावर परिणाम जाणवत आहे.
या ऋतू बदलामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालये फुल्लं झाली आहेत. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात (ओपीडी) रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ऋतू बदलाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचा असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
शिवाय दुपारी उन्हात बाहेर पडणे टाळण्यासह सकाळी थंडीपासून बचाव करणाऱ्या साधनांचा उपयोग करण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. ऋतू बदलानुसार उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मार्च महिन्यात जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढीस सुरवात होणार आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा चाळिशी पार होतो. त्यामुळे ऊन सुरू होत असताना प्रत्येकाने स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे.
अशी घ्या स्वतःची काळजी
हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जण कमी पाणी पितात. मात्र, उन्हाळा सुरू झाल्याने तापमानात वाढ होते. त्याचप्रमाणे शरीराचे तापमानही वाढल्याने अनेक वेळा थकवा जाणवतो. उन्हाळ्यात शरीराला पाणी कमी पडू नये, म्हणून भरपूर पाणी प्यावे. मात्र, पाणी एकदम पिऊ नये.
असा घ्या आहार
नियमित आहारासोबत शरीरातील पाणी पातळीचा समतोल राखण्यासाठी उन्हाळी फळे खाण्यावर भर द्यावा. यामध्ये टरबूज, खरबूज, द्राक्ष, काकडी, अंबा, खिरे अशा फळांचा आहारात समावेश करावा. शिवाय दही, ताकाचे सेवन करावे. उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे. उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स पिणे शक्यतो टाळावे. कोल्ड ड्रिंक्स ऐवजी उसाचा रस, लिंबू पाणी प्यावे.
उन्हापासून करा स्वतःचे संरक्षण
उन्हाळा सुरू झाल्याने शक्यतो दुपारपर्यंत सर्व कामे उरकून घ्यावीत. दुपारी कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, रूमाल किंवा छत्रीचा आधार घ्यावा.
ऋतू बदलामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ओपीडीमध्येही रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. या ऋतू बदलाच्या काळात प्रत्येकाने आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घ्यावा. पहाटेच्या थंडीपासून व दुपारच्या उन्हापासून स्वतःचा बचाव करावा.
- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रूग्णालय, जालना
ऋतू बदलाच्या काळात विषाणूचा प्रसार होतो. शिवाय या काळात प्रतिकार शक्ती कमी झाल्याने सर्दी, खोकला, ताप असे आजार जडतात. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घ्यावा. भरपूर पाणी प्यावे, थंड व तेलकट पदार्थ खाणे टाळावेत.
-डॉ. आशीष राठोड, नवजीवन हॉस्पिटल, जालना
खरपुडी कृषी विज्ञान केंद्र येथे सोमवारी (ता.२७) कमाल तापमान ३६.६ व किमान १८.९ सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात दुप्पटीचा फरक आहे. यामुळे आजारांना आमंत्रण मिळते. शिवाय पिकांवर रोगराई पडते.
-पंडित वासरे, कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, जालना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.