Dengue Fever : पावसाळा सुरू झाला की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे डेंग्यू, टायफॉईड इत्यादी आजारांचे आहे. सध्या देशभरात डेंग्यूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या दिवसांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे, डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. मादी एडिस डास हे डेंग्यूच्या विषाणूचे वाहक आहेत. या डासाच्या चाव्यामुळे व्यक्तीला डेंग्यूची लागण होते.
डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. शिवाय, अशक्तपणा मोठ्या प्रमाणात येतो. जर यावर वेळीच उपचार नाही केले, तर व्यक्तीला जीव देखील गमवावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये डेंग्यूच्या उपचारांदरम्यान, रूग्णाने आहाराची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे.
जर तुम्ही व्यवस्थित आहार घेतला तर तुमची डेंग्यूमधून लवकर सुटका होऊ शकेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही औषधांसह काही फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश केल्यास रूग्णाला बरे होण्यास मदत होते.
किवी हे फळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ताप दूर करण्यासाठी किवीचे अवश्य सेवन करावे. व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअमने समृद्ध असलेल्या किवीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे, संक्रमणाशी लढण्यास व्यक्तीला पुरेशी ऊर्जा मिळते.
या व्यतिरिक्त किवी हे फळ शरीरातील इलेक्ट्रॉलाईट्सचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे, डेंग्यूपासून लवकर आराम मिळवण्यासाठी किवीचा आहारात जरूर समावेश करावा.
पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के इत्यादी जीवनसत्वांचे विपुल प्रमाण आढळते. ही सर्व जीवनसत्वे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त पालकमध्ये लोह देखील आढळते. ज्यामुळे, शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. त्यामुळे, डेंग्यूच्या रूग्णांनी आहारात पालकचा जरूर समावेश करावा.
पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि संसर्गामुळे उद्भवणाऱ्या वेदना कमी होतात. एकूणच आरोग्यासाठी पपई अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, डेंग्यूपासून लवकर सुटका करून घेण्यासाठी तुमच्या आहारात पपईचा जरूर समावेश करा.
नारळपाण्याला जीवनाचे अमृत मानले जाते. हे नारळपाणी प्यायल्यास ते आपल्या शरीरात सलाईनप्रमाणे काम करते. जुलाब, उलट्या, अशक्तपणामुळे शरीरात पाणी, इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता दिसून येते. ही कमतरता दूर करण्यासाठी नारळपाणी मदत करते. त्यामुळे, डेंग्यूच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात नारळपाण्याचा जरूर समावेश करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.