तुम्ही तुमचा दिवस कसा जगावा हे मी सांगणार नाही, पण तुम्ही काहीही केलं, कुठेही असलात, कोणताही व्यवसाय करत असलात तरी काही ठराविक गोष्टी आहेत ज्या रोजच्या रोज करायलाच हव्यात. त्या कोणत्या ते आज पाहूया. तुमच्या बिझी दिवसात तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी या सवयी तुमची कायम साथ देतील. तुमच्या दिवसात अचानक काहीही न बदलता छोट्या छोट्या सवयींचा समावेश करायचा आहे. वेळोवेळी माझ्या लेखांमध्ये यातील काही गोष्टी आल्या आहेतच पण आजच्या विषयाला धरून एकत्रितपणे या सगळ्या गोष्टी पाहू व काही नवीन मुद्देही पाहू.
झोप
झोपेबद्दलचा माझा एक पूर्ण लेख ज्यात शास्त्रीय पद्धतीने चांगल्या झोपेचा प्रभाव आणि त्याचा अभाव या दोन्हींचेही परिणाम आपण पाहिले आहेत. रोज किमान सात तास झोप हवी. सकाळी नैसर्गिक पद्धतीने जाग येऊन फ्रेश, हलकं व सकारात्मक वाटलं आणि चिडचिड व जडपणा नसल्यास ती योग्य झोप. आदल्या दिवशीचा बिघडलेला मूड कॅरी फॉरवर्ड न होता, मानसिक चढ-उतारांचा निचरा झोपेत व्हावा. त्यासाठी त्या चढ-उतारांना मनात दडपवून रात्री झोपी जाऊ नये. मन व शरीर मोकळं करून झोपावं तरच खऱ्या अर्थाने पूर्ण विश्रांती मिळेल.
पोट
सकाळी उठल्यावर पहिलं काम पोट साफ होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ पोटात घाण साठवून ठेवणं आरोग्यास हानिकारक आहे. पचन क्रियेचं शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजे वेस्ट मटेरिअल बाहेर फेकणं. तसे न झाल्यास पोटाचे, त्वचेचे, सांध्यांचे विकार तसेच जडपणा, चिडचिडेपणा सुरू होतो. तीच घाण पुन्हा रक्ताद्वारे शरीरभर पसरली जाते व शरीरात ठिकठिकाणी साचून राहते.
व्यायाम
रोज पाऊण ते एक तास बलोपासनेसाठी काढायलाच हवा. तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येयं पूर्ण होतील, जेव्हा शरीर धडधाकट असेल. त्याची काळजी घेऊन सुस्थितीत ठेवल्यास ते ''asset'' आहे, पण बेफिकीर राहिल्यास ''liability'' बनेल. सर्वांगाला ताबडून व्यायाम मिळेल अशा पद्धतीने पण दुखापत न होऊ देता, पूर्ण शरीर सर्व बाजूंनी पिळून-ताणून निघाले पाहिजे. अशाने रक्ताभिसरण सुधारते आणि सर्व आंतरिक अवयव, पेशी उत्तम रीतीने काम करतात. ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा शरीरभर झाल्यास तुम्हाला ताजं आणि हलकं वाटेल. हलकं वाटणं हे आरोग्याचे पहिले लक्षण.
हालचाली
व्यायामचा तास सोडल्यास उरलेला दिवस आपण बसून राहायला मोकळे, असं नाही. एका जागी एका तासापेक्षा जास्त वेळ बसू नये. दर तासाने उठून एक फेरी मारा, फोन आला तर चालत चालत बोला, थोडा वेळ उभे राहून काम करा. स्टँडिंग डेस्कची कल्पना आजकाल प्रचलित आहे. दर दोन-तीन तासांनी मायक्रो ब्रेक्स घेऊन मान, पाठ, खांदे, कंबर, पाय छान स्ट्रेच करा मग पुन्हा कामाला लागा. अशी शरीराची हालचाल दिवसभर व्हायला हवी. हे केल्यास तुम्हाला कधीच जड आणि आखडल्यासारखे वाटणार नाही.
मन
व्यायामासारखं दिवसात एकदा वीस मिनिटे प्राणायाम व ध्यानासाठी वेळ काढा. मनाचं ''centering'' रोज होणं आवश्यक आहे. याची कारणं पाहू. आपण जे सारखे प्रतिक्रिया देत असतो त्याने मेंदूची रिॲक्टिविटी वाढते, म्हणजे ते सारखं उत्तेजित राहतं. त्याला शांत ठेवण्यासाठी डेडिकेटेड प्रॅक्टिस व्हायला लागली की दोन गोष्टी होतात - एक म्हणजे मेंदूचे उत्तेजन हळूहळू कमी होऊ लागतं, त्याला शांत राहण्याची सवय होऊ लागते आणि दुसरं, उत्तेजन मिळालं तरी भावनांच्या extremes ला न जाता त्याला लवकर पुन्हा पूर्ववत येण्याचा मार्ग सापडतो. अशाने एखाद्या गोष्टीमुळे तासनतास किंवा अख्खा दिवस आपली चिडचिड होऊन आपण तोंड पाडून बसणार नाही. हलचालींसाठी मायक्रो ब्रेक्सबद्दल बोलले, तसेच मनासाठीही मायक्रो ब्रेक घेऊन वेळ मिळेल तेव्हा डोळे मिटून शांतपणे श्वासावर लक्ष ठेवून बसावं. अशाने सुद्धा खूप शांत वाटतं.
सिंहावलोकन
आठवड्यातून एकदा तुमच्या मागच्या आठवड्याचा आढावा घ्या. कसे दिवस चाललेत, कोणत्या दिशेने जायला हवे, मार्ग भरकटत असू तर पुन्हा योग्य वाटेवर कसे यावे, तुमची मूल्ये काय आहेत त्या मूल्यांना अनुसरून तुमचं वर्तन आहे का.. हे सर्व थर्ड पर्सनसारखं पाहा. गोळ्या-औषधं घेत असाल, तर औषध चालू आहे मग माझी त्या विकारांप्रति जबाबदारी संपली, असा attitude चुकीचा आहेजरा थांबा - योग्य जीवनशैली, योगसाधना, आणि योग्य आहार यांच्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या समस्यांना मुळापासून उखडून काढण्याची किंवा त्यांना वाढू न देण्याची ताकद आहे. त्यासाठी इच्छा, शिस्त आणि श्रद्धा हवी. वरील सर्व गोष्टी मोफत आहेत, पण अत्यंत उपयोगी. जेमतेम जगण्यात काय मजा आहे, मोकळे, निरोगी, आनंदी जगुया!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.