डायबेटिक रेटिनोपथी, ही डोळ्यांची अशी स्थिती आहे, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये दृष्टी कमी होऊ शकते आणि त्यांना अंधत्व येऊ शकते.
डॉ. अंबरीष दरक
डायबेटिक रेटिनोपथी, ही डोळ्यांची अशी स्थिती आहे, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये दृष्टी कमी होऊ शकते आणि त्यांना अंधत्व येऊ शकते. डोळ्यातील पडदा-रेटिना (डोळ्याच्या मागील बाजूस असलेला संवेदनशील थर) मधील रक्तवाहिन्यांवर हा आजार परिणाम करतो. मधुमेह असलेल्या लोकांसाठी दृष्टी कमी होण्याचे हे सर्वांत सामान्य कारण आहे.
मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे अनेक अवयवांना इजा पोचते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स’ असे म्हणतात. मधुमेही रुग्णांना होणाऱ्या अनेक गुंतागुंतींपैकी एक म्हणजे मधुमेही नेत्ररोग.
मधुमेहाच्या रुग्णांची डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. याचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचारांतून अंधत्व टाळता येते. डायबेटिक रेटिनोपॅथीची सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे नसतात. ती जसजशी वाढत जाते तशी त्याची तीव्र लक्षणे दिसू लागतात. ती खालीलप्रमाणे ः
अस्पष्ट दृष्टी
दृष्टिक्षेपात फिरणारे ठिपके किंवा गडद रेषा
दृष्टिक्षेपात जाणवणारे गडद किंवा रिकामे क्षेत्र
डायबेटिक रेटिनोपॅथीचे दोन मुख्य प्रकार आहेत ः
१) नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी
या रेटिनोपॅथीमध्ये डोळ्यातील पडद्यावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्या फुगतात, गळतात आणि परिणामी, पडद्याला सूज (डायबेटिक मॅक्युलर एडेमा) होऊ शकते. कधीकधी डोळ्यातील पडद्यावरील मध्यभागी रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो याला मॅक्युलर इस्केमिया म्हणतात.
२) प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी (PDR)
या रेटिनोपॅथीमध्ये डोळ्यातील पडद्याच्या अनेक वाहिन्या बंद होतात. या प्रकारात डोळ्यातील पडद्यावर विशेष प्रथिने तयार होतात, पुढे त्याच्यात वाढ होत जाते, जी डोळ्याच्या पडद्यावरील नवीन रक्तवाहिन्या वाढण्यास उत्तेजित करते.
हा या प्रकारातील सर्वांत पुढचा टप्पा आहे. नवीन रक्तवाहिन्या डोळ्यातील पडद्यावर वाढत जातात आणि नंतर नेत्रगोलकाच्या आतील द्रवामध्ये (विट्रीयस ह्युमरमध्ये) वाढतात. या नाजूक आणि नवीन रक्तवाहिन्यांमधून द्रव बाहेर पडण्याची आणि रक्तस्राव होण्याची अधिक शक्यता असते. यात तयार होणाऱ्या स्कार टिश्यूमुळे पडद्याची नैसर्गिक स्थिती बदलू शकते. यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
डायबेटिक रेटिनोपॅथी आणि मॅक्युलर एडीमाच्या निदानासाठी पडद्याची विस्तृत तपासणी करणे आवश्यक आहे. ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी (ओसीटी) स्कॅनद्वारे याचे निदान करणे शक्य होते. तपशील तपासणीसाठी फ्लोरोसीन अँजिओग्राफी किंवा ओसीटी अँजिओग्राफीही केली जाते.
उपचार
डायबेटिक मॅक्युलर एडेमावर इंट्राविट्रिअल अँटी-व्हीईजीएफ इंजेक्शन्सने उपचार केले जाऊ शकतात. ही औषधे व्हॅस्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टरला (व्ही. जी. एफ) अवरोधित करतात. ही एक प्रकारची प्रथिने आहेत. ती डोळ्यात असामान्य रक्तवाहिन्यांची वाढ करतात. त्यांना अवरोधित केल्याने पडद्यावरची सूज कमी होते. मॅक्युलर एडीमासाठी इतर उपचार पर्यायांमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड इंजेक्शन्स, मॅक्युलर फोकल किंवा ग्रिड लेसर या उपचार पद्धतींचा समावेश असतो.
डायबेटिक रेटिनोपॅथीच्या उपचारांच्या पर्यायांमध्ये रेटिनल लेसर फोटोकोग्युलेशन आणि विट्रेक्टोमी शस्त्रक्रियेचा पर्याय असतो. रेटिनल लेसर फोटोकॉग्युलेशन नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन घडवून आणते आणि यामुळे आजाराची तीव्रता रोखण्यास मदत होते. रुग्णांना यापैकी दोन किंवा अधिक लेसर उपचाराची आवश्यकता असू शकते.
व्हिट्रियस हॅमरेज किंवा रेटिनल डिटेचमेंट असलेल्या रुग्णांसाठी विट्रेक्टोमी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.