Monsoon Diet For Kids : पावसाळ्यात लहान मुलांचा आहार कसा असावा?

लहान मुलांच्या वयानुसार त्यांना पावसाळ्यात कसा आहार द्यावा याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
Monsoon Diet For Kids
Monsoon Diet For Kids esakal
Updated on

Monsoon Diet For Kids : पावसाळा सुरू झाल्यावर सुरू होतात त्या लहान मुलांच्या शाळा, आणि त्याचबरोबर सुरू होतात मुलांचे खाण्याचे नखरे! पावसाळ्यात वातावरण काहीसे थंड आणि सुखावणारे असल्याने मुलांना वडा, भजी, समोसा यांसारखे तळलेले पदार्थ किंवा मग चाट, चायनीज यासारखे पदार्थ खाण्याची ओढ लागते. ही ओढ सुखावणारी असली तरीही कधीतरी ही ओढ आपल्या मुलांना आजारी करायला पुरेशी असते. अशावेळी लहान मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आता आपण वयोमानानुसार लहान मुलांना द्यायच्या आहाराबद्दल थोड बोलूया.  

वय वर्ष ० ते ५ : रंगीबेरंगी आहार 

सहाव्या महिन्यापर्यंत बाळ केवळ स्तनपानावर अवलंबून असल्याने, अशावेळी बाळाला योग्य ते पोषण मिळण्यासाठी आईने आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, अंडी, मांस, डाळी यांचा मुबलक समावेश करावा. सहाव्या महिन्यापर्यंत बाळाला आवश्यक असणारे पोषक घटक दुधातून पुरवले जात असल्याने, आईने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असते.

पावसाळ्यात बाळाला मुबलक प्रमाणात दुग्धपान दिल्याने आणि स्तनांची निगा राखल्याने बाळाला रोगापासून वाचवता येऊ शकते. सहा महिन्यापासून पुढील वयोगटासाठी 'रंगीबेरंगी आहार' ही संकल्पना लागू होते. जर बाळाला दात आले नसतील तर गाळून घेतलेले भाज्या, डाळी आणि चिकनचे सूप यापैकी कुठलीही गोष्ट बाळाला देता येते.

परंतु पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यात काही प्रमाणात त्यात आले, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि हळद यासारख्या पदार्थांचा समावेश केल्याने आरोग्य चांगले राखता येते. खाण्यायोग्य वयात आलेल्या बाळाला मक्याचे दाणे, डाळिंब, पेर यासारख्या गोष्टी द्याव्या. ज्यातून बाळाला विटामिन सी, अँटीऑक्सिडंट, फायबर यासारखे महत्त्वाचे घटक मिळतात. 

Monsoon Diet For Kids
Child Health: पालकांनो, मुलांना ‘या’ ७ गोष्टींपासून दूर ठेवा अन् वाढवा मेंदूची कुशाग्रता; संतुलित आहार व मेडिटेशनचा होईल लाभ

वय वर्षे ६ ते १० - चवदार आणि चविष्ट आहार

या वयातील मुलांना चवीची समज चांगल्या पद्धतीने असल्याने; त्यांचा आहार बनवताना तो चवदार चविष्ट कसा असेल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. वडा, समोसा, किंवा भजी अशा पदार्थांना पर्याय म्हणून गरमागरम थालीपीठ, पराठे, मिक्स डाळीचे वडे, शेंगदाण्याचे लाडू /  चिक्की अशा पदार्थांचा न्याहारीमध्ये समावेश करावा. ज्यातून त्यांच्या शरीराला लागणाऱ्या कॅलरीसोबत, इतर पोषक घटक देखील त्यांच्या शरीराला मिळतील. (monsoon)

शक्य असल्यास मुलांना उकळलेले, उकडलेले आणि भाजलेले अन्न द्यावे. कच्चे आणि अति जास्त तेल वापरून तळलेले पदार्थ टाळावेत. जेवणामध्ये लिंबू आणि पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांचा ( अळू , टायकाळा, करटूली, चवळीच्या शेंगा ई.) समावेश करावा. जर मूल खाण्यासाठी नखरे करत असेल तर, त्याला आवडणाऱ्या पौष्टिक गोष्टींचा वापर करून अधिक चवदार आणि चविष्ट पदार्थ बनवून त्याला खायला घालावे.

Monsoon Diet For Kids
Monsoon Health Care : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीये? मग आहारात घ्या 'हे' महत्त्वाचे पदार्थ!

वय वर्ष ११ ते १५ - चौरस आणि सकस आहार

साधारणतः ११ ते १५ या वयोगटातील मुलांना खाण्यापिण्याबद्दल चांगली समज आलेली असते. याशिवाय ही मुले पौगंडावस्थेत आलेली असल्याने शरीराच्या वाढीसाठी लागणाऱ्या कॅलरीज आहारातून पुरेशा प्रमाणात देणे गरजेचे असते. (Health)

या वयोगटातील मुला मुलींना त्यांच्या आवडीप्रमाणे सकस आणि चौरस आहार निवडण्याची मुभा द्यावी. त्यांच्या जेवणात मांस, मासे, अंडी यांचा पुरेसा समावेश करावा. शक्य असल्यास रोजच्या जीवनात थोडे दही आणि न्याहारीमध्ये सूर्यफुलाच्या बिया यांचा समावेश करावा. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असल्याने मुले पुरेसे जेवण करत नाही. अशावेळी पुरेशा कॅलरीज मिळवण्यासाठी डाळ भातासोबत तूप देणे फायद्याचे ठरते. 

प्रत्येक वयोगटानुसार मुलांच्या आवडीनिवडी आणि गरजा वेगवेगळ्या असल्याने त्यांच्या कलेनुसार पावसाळ्यात त्यांच्या आहारात बदल करावा. केवळ पोषक आहे म्हणून जबरदस्तीने त्यांच्या जेवणात एखाद्या अन्न घटकाचा समावेश करणे टाळावे. या उलट त्यांना आवडणाऱ्या गोष्टी घेऊन त्यातून त्यांना अधिकाधिक पोषणमूल्य कसे मिळतील, आणि पदार्थाची लज्जत कशी वाढेल याचा विचार करावा. जेणेकरून तुमच्या मुलाला ती गोष्ट खाताना आनंद मिळेल आणि पावसाळ्याचा आनंद देखील लुटता येईल.

लेखक - आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.