दीपावली येते ती आरोग्यपूर्ण ऋतुकालात. पावसाचा जोर कमी होत होत कोजागरी पौर्णिमेच्या आसपास रात्रीचे वातावरण थंड, शीतल व्हायला सुरुवात झालेली असते. पावसाळ्यात मंद झालेला अग्नी पुन्हा हळूहळू प्रदीप्त व्हायला सुरुवात होते. आणि उत्साहाने, प्रकाशाने जीवन अंतर्बाह्य उजळवून टाकणारा दीपावलीचा महोत्सव येतो. जणू पावसाळ्यामुळे अंधारलेल्या, सुस्तावलेल्या चराचराला प्रकाशाने, चैतन्याने प्रफुल्लित करण्यासाठी दीपावली येते.
‘दीपावली आली’ म्हणताना सर्वप्रथम विचार येतो की यावर्षी दीपावलीचे खास असे काय करायचे? दीपावली आली की सर्वप्रथम येते साफसफाई व घराची रंगरंगोटी, नंतर येते नवे कपडे, दागदागिने यांची खरेदी, नंतर येतो फराळ, नंतर येते कमरणूक किंवा असतो प्रवास. या सर्व गोष्टींचे नियोजन करून योग्य वेळी न झाल्यास सणावारी मानसिक ताण वाढतो, व त्यातून पुढे येऊ शकतो आजार.