आम्ही चालवू हा पुढे वारसा...!

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी कार्ला येथे स्थापन केलेल्या ‘आत्मसंतुलन व्हिलेज’च्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या शनिवारी (ता. ११) पुणे येथील पंडित फार्म्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Santulan Ayurveda
Santulan Ayurvedasakal
Updated on

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी कार्ला येथे स्थापन केलेल्या ‘आत्मसंतुलन व्हिलेज’च्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या शनिवारी (ता. ११) पुणे येथील पंडित फार्म्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ‘संतुलन आयुर्वेद’च्या संचालिका आणि आयुर्वेदाचार्य डॉ. मालविका तांबे यांची विशेष मुलाखत.

संतुलन पंचकर्म म्हणजे काय आणि ते कोणी व कशासाठी करावे?

- संतुलन पंचकर्म आयुर्वेदाच्या वेदोक्त संकल्पनेवर आधारित आहे. पंचकर्म अगदी साध्या सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे शरीराची शुद्धी. आपण रोज अंघोळ करतो, परंतु शरीराच्या आतमध्ये गेलेल्या गोष्टी आपल्याला बाहेर फेकता येत नाहीत, त्या गोष्टी आपल्या शरीराच्या विविध अंगप्रत्यंगांमध्ये राहून त्यातून वेगवेगळे आजार निर्माण होतात. पंचकर्माच्या माध्यमातून आपल्या शरीरातील सर्व विषद्रव्ये बाहेर काढता येतात, जेणेकरून चयापचय क्रिया पूर्ववत होते. आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये संतुलन पंचकर्म शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते. शरीरातील पंचमहाभूतांची शुद्धी करणे म्हणजे पंचकर्म, अशी श्रीगुरू बालाजी तांबे यांची संकल्पना होती. त्यामुळे त्याची शुद्धीसाठी ‘संतुलन पंचकर्म’ आवश्यकता आहे.

पंचकर्म कोणी करावे?

- स्वस्थपणा टिकवून ठेवण्याबाबत आयुर्वेदात सांगितले आहे. अन्य पॅथीमध्ये आजार आधी आणि नंतर उपचार. शरीराच्या बाबतीत झालेल्या चुका दुरुस्त करून ते मूळ पदावर आणण्याचे काम पंचकर्म करते. त्यामुळे भविष्यातील त्रास वाचवता येतात. स्वास्थ्याबद्दल जागरूक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने संतुलन पंचकर्म करणे उत्तमच आहे. कार्ला येथे ‘संतुलन पंचकर्म’ करून घेण्यासाठी अनेक युवक येत आहेत. संतुलन पंचकर्मासाठी कोणतीही वयाची अट नाही. फक्त वय, प्रकृती, आजार यांनुसार उपचारपद्धती ठरवली जाते. आजारी पडण्याची वाट पाहण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय म्हणून संतुलन पंचकर्म करण्यास सुरुवात करा.

पंचकर्माबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. त्याबद्दल, काय सांगाल?

- शास्त्रोक्त पंचकर्म करायचे म्हणजे वेळ द्यावा लागतो. विरेचनामुळे जुलाब होऊन थकवा येईल का किंवा अन्य शंका असतात. योग्य मार्गदर्शनाखाली पंचकर्म केल्यास काहीही त्रास होत नाही. कार्ला येथे संतुलन पंचकर्माचा चाळीस वर्षांचा अनुभव आहे. संतुलन पंचकर्मातील विरेचनानंतर काही लोकांना साधारण दहा ते पंधरा-वीसच्या दरम्यान जुलाब होतात. मात्र, त्यानंतर रुग्णांना हलके आणि फ्रेश वाटायला लागते. विषद्रव्ये बाहेर पडल्यामुळे शरीर हलके होत असते. आणखी शंका खाण्याबद्दल असते. आत्मसंतुलनमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत पोषक मूल्यांचा विचार करून आहार दिला जातो. पंचकर्म म्हणजे शरीराची अंतर्बाह्य शुद्धता आहे. त्यामुळे पंचकर्मासाठी योग्य वेळ दिलाच पाहिजे.

संतुलन पंचकर्माची पद्धत कोणती आहे?

- शरीरात पसरलेली विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदात काही पद्धती दिल्या आहेत. त्याला पंचकर्मांचे पूर्वकर्म असे म्हणतो. त्यामध्ये अभ्यंग, स्वेदन, अंतर्स्नेहन असते. ही सर्व पद्धती संतुलन पंचकर्मात शास्त्रोक्त पद्धतीने वापरतात. शरीराबरोबर मनाची शुद्धी ‘आत्मसंतुलन’मध्ये केली जाते. शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीवर या ठिकाणी कार्य केले जाते. या ठिकाणचे निसर्गाचे सान्निध्य आपल्यावर वेगळी जादू करते.

योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा यांमुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची ठरते. त्याबरोबरच श्रीगुरू बालाजी तांबे यांनी संशोधन करून तयार केलेले स्वास्थ्यसंगीत आहे. यातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. शरीरात सत्तर टक्के पाणी असल्याने ‘आत्मसंतुलन’मध्ये पाण्यावर खूप विचार केलेला आहे. शारीरिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर काम केले जाते. त्यामुळे याला आम्ही आयुर्वेद होलिस्टिक हिलिंग केंद्र म्हणतो. तोच बाबांच्या कार्याचा मूळ पाया आहे.

वंध्यत्वाच्या समस्येबाबत काय सांगाल?

- नवीन पिढीचे चयापचयाचे चक्र पूर्णपणे बिघडले आहे. दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. जीवनातील ताणही वाढलेला दिसतो. यी सगळ्याचा परिणाम म्हणजे शरीरातील वीर्याची पातळी, तसेच नवीन काही करायची ऊर्जा, उत्साह कमी होत आहे. त्यासाठी ‘संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्सपिरियन्स’ केंद्र सुरू आहे. याद्वारे नैसर्गिकरित्या बाळाला जन्म देऊ शकता, हे सांगितले जाते.

काही त्रासांमुळे गर्भ राहत नसल्यास कृत्रिम गर्भधारणा केली जाते. अशा बाळाला जन्म दिला तर ते तुमच्या प्रेमाचे प्रतीक होत नाही. ते मॅकेनिकल होते. त्यासाठी आमच्याकडे मानसिक, आध्यात्मिक विचार केला असून, जोडप्यांना सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाते. निसर्गाने महिलांना निर्मितीचा मोठा आशीर्वाद दिला आहे. तो पुढे नेण्याबाबत महिलांमध्ये भीती असू नये, यादृष्टीने मार्गदर्शन केले जाते.

संतुलन आयुर्वेदच्या उत्पादनांबाबत काय सांगाल?

- फार्मसीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने उत्पादन घेतले जाते. केमिकलचा वापर होत नाही. निसर्गाकडून घेत असताना त्याची पूजा करतो आणि ज्या कारणासाठी घेत आहोत, त्याचे तसे फळ मिळू दे, अशी प्रार्थना केली जाते. फार्मसीमध्ये रोज ज्योतीध्यान होऊन धूप लावला जातो आणि रोज प्रार्थना केली जाते. प्रत्येक गोष्ट ‘जीएमपी’नुसार (गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस) केली जाते. कच्चा माल उच्च दर्जाचा असण्याकडे विशेष कटाक्ष असतो.

औषधप्रक्रिया पूर्ण झाल्यावर तपासणीत सर्व निकष अत्यंत काटेकोरपणे पाळतो. फार्मसी अत्याधुनिक असली तरी पारंपरिक निकष पूर्ण केल्याशिवाय उत्पादन घेतच नाही. निसर्गाची हानी न करता उत्पादन घेतले जाते. पंचकर्म, उत्पादन आणि रुग्णसेवा या पायांवर आयुर्वेद उभा आहे. श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या हाताखाली मी पंचवीस वर्षांपूर्वी सेवा करण्यास सुरुवात केली. रुग्णाला सर्व व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सक्षम, सुदृढ पिढी घडवल्यास भविष्यातील आजार कमी होतील असे त्यांचे म्हणणे होते. ‘आयुर्वेदिक गर्भसंस्कार’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजात खूप बदल झाले आहेत. श्रीगुरू बालाजी तांबे यांचे स्वप्न पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. श्रीगुरू बालाजी तांबे यांनी घालून दिलेला रुग्ण आणि समाजसेवेचा वारसा पुढे न्यायचा आहे. आजारांवर काम करण्यापेक्षा सुदृढ पिढी जन्माला घातली पाहिजे, हा त्यांचा ध्यास पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

संगीत मैफील, व्याख्यान अन् प्रदर्शन

‘आत्मसंतुलन व्हिलेज’च्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. ११) दिवसभर कर्वेनगरच्या पंडित फार्म येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘संतुलन आयुर्वेद प्रस्तुत’ कार्यक्रमात सकाळी १०.३० वाजता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे प्रवचन होईल.

तसेच ‘संतुलन आयुर्वेद’च्या संचालिका व आयुर्वेदाचार्य डॉ. मालविका तांबे, अभिनेते-व्याख्याते राहुल सोलापूरकर, ‘संतुलन आयुर्वेद’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील तांबे यांची व्याख्याने होतील. सायंकाळी ७.३० वाजता गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची ‘अनुभूती’ संगीत मैफील रंगेल. ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ येथील विविध उपक्रमांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन दिवसभर खुले असेल. दिवसभर कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे; मात्र संगीत मैफिलीसाठी तिकिटे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.