आदर्श जीवनशैली

सध्याच्या काळात ‘लाइफ स्टाइल डिसऑर्डर्स’ हा शब्द खूप वापरला जात आहे. जीवनशैली चुकल्यामुळे होणाऱ्या आजारांची यादी फार मोठी आहे.
Family Ideal lifestyle
Family Ideal lifestylesakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

सध्याच्या काळात ‘लाइफ स्टाइल डिसऑर्डर्स’ हा शब्द खूप वापरला जात आहे. जीवनशैली चुकल्यामुळे होणाऱ्या आजारांची यादी फार मोठी आहे. पण जीवनशैलीत काय चुकते आहे याचा विचार केला तर उशिरा झोपणे उशिरा उठणे, खाण्या-पिण्यात चुका करणे हाच सहसा विचार केला जातो. आयुर्वेदशास्त्रात मात्र लाइफ स्टाइल म्हणजेच जीवनशैली कशी असवा यावर व्यवस्थित मार्गदर्शन केलेले आहे. आयुर्वेद हे ‘आयु’चे म्हणजे जीवनाचे शास्त्र आहे. आयुष्य कसे घालवाचे याबद्दलची सर्व माहिती आयुर्वेदात मिळणे स्वाभाविक आहे. आयुर्वेदात जीवनशैली तीन भागात विभक्त केलेली आहे.

१. दिनचर्या

२. ऋतुचर्या

३. सद्वृत्त

या तिन्हींत सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर दीर्घायुष्य, स्वास्थ्य मिळेल, व्याधी व दुखण्यापासून मुक्ती मिळणे शक्य होईल असे सांगितलेले आहे. दिनचर्या म्हणजे रोजचा दिवस कसा घालवावा, ऋतुचर्या म्हणजे ऋतू बदलतील तसे कोणत्या गोष्टींचे पालन करावे आणि सद्वृत्त म्हणजे वागणुकीत कोणती काळजी घ्यावी हे समजावलेले आहे.

दिनचर्या

  • दिनचर्येची सुरुवात अर्थातच सकाळी उठल्यापासून होते. सकाळी ब्राह्ममूहूर्तावर उठणे इष्ट सांगितले गेले आहे. सकाळी साधारण साडेचार ते साडे सहाच्या दरम्यान उठणे स्वास्थ्याच्या दृष्टीने उत्तम. याहून उशिरा उठल्यास शरीरातील चयापचय क्रियांवर प्रभाव होतो व वेगवेगळ्या रोगनिर्मितीला मदत होते. सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणे व मूत्रत्याग करणे महत्त्वाचे असते. लवकर उठण्याची सवय ठेवली तर मलत्याग व मूत्रत्यागाला काहीही अडचण येत नाही. सकाळी उशिरा उठण्यास सुरुवात केली तर हळूहळू नैसर्गिक वेगाची भावना कमी होते, यातून पुढे मलबंध वा मूत्रत्यागाच्या वेळी त्रास होणे वगैरे तक्रारी दिसू लागतात.

  • कुठल्यातरी नैसर्गिक ब्रशने किंवा चांगल्या प्रतीच्या ब्रशने दात घासावे. पूर्वी अपामार्ग, करंज, खदिर वगैरेंच्या फांद्यांच्या छोट्या छोट्या तुकड्याने दात घासले जात. सतुंलन सुमुख तेलासारख्या एखाद्या तेलाचा कवल वा गंडूष करणे दातांच्या व हिरड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असते.

  • जिह्वानिर्लेखन- रोजच्या रोज जीभ साफ करणे महत्त्वाचे असते. यासाठी स्टीलची किंवा जमत असल्यास चांदीची टंग क्लिनर वापरणे इष्ट. यामुळे जीभ स्वच्छ झाल्याने चव नीट येते व पचनक्रिया सुधारायला मदत मिळते. या सगळ्यांनंतर चूळ भरून तोंड स्वच्छ करावे, व इच्छा असल्यास वेलची, लवंग वगैरेंसारखे सुवासिक द्रव्य चावायला घेता येते.

  • आयुर्वेदिक पद्धतीने सिद्ध केलेल्या तेलाने (तीळ वा खोबरेल) अभ्यंग करावा. संपूर्ण अंगाला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल लावल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते तसेच वात कमी होऊन शरीरातील हाडे, सांधे व स्नायूंना पोषण मिळते, रक्ताभिसरण सुधारायला मदत मिळते, शरीरातील आम कमी व्हायला मदत मिळते.

  • नियमित व्यायाम करणे स्वास्थ्यासाठी उत्तम असते. व्यायाम करण्याने शरीराची ताकद वाढते, बल वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरातील स्रोतसे शुद्ध राहायला मदत मिळते, पचनक्रिया व्यवस्थित राहते व शरीराच्या सर्व अंगप्रत्यंगांचे काम व्यवस्थित चालते. व्यायामामुळे अवाजवी वजन वाढण्यालाही प्रतिबंध होतो. रोज प्रत्येकाने आपापल्या सवडीनुसार अर्धा ते एक तास व्यायाम करावा.

  • यानंतर सॅन मसाज पावडरसारख्या वनस्पतीज उटण्याने उद्वर्तन करणे उत्तम. रोज अभ्यंग-उद्वर्तन करणे शक्य नसले तरी आठवड्यातून २-३ वेळा नक्की करावे. यामुळे त्वचेचे आरोग्य नीट राहायला तसेच वात-कफाचे शमन व्हायला मदत मिळते. साबण व बॉडी वॉश यांच्यात वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक द्रव्ये असतात, जी स्वास्थ्यासाठी व पर्यावरणासाठी चांगली नसतात. त्यामुळे नैसर्गिक उत्पादने वापरणे उत्तम. अंघोळ केल्यामुळे उत्साह वाढतो, बल वाढते, वीर्यशक्ती वाढते, पचन व्यवस्थित होते तसेच आयुष्यवृद्धी व्हायलाही मदत मिळते. स्नानामुळे त्वचेवर जमलेला घाम, इतर दोष निघून जायला मदत मिळते. स्नानाचे पाणी शरीराच्या तापमानाच्या आसपासच्या तापमानाचे असावे.

  • स्नानानंतर स्वच्छ, सुती कपडे घालावे. त्यानंतर एखादे चांगले अत्तर लावावे. अत्तर जेवढे सुवासिक व चांगल्या प्रतीचे असेल तेवढी त्याची मानसिक उत्साह नीट राहायला मदत होते. सध्या मात्र डिओडरंटस् व रासायनिक पर्फ्युम लोकप्रिय आहोत, जी त्वचेसाठी चांगली नसतात. त्यामुळे रासायनिक गोष्टींचा वापर टाळणेच बरे.

  • गरजेनुसार केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे, नाक स्वच्छ करणे, कान स्वच्छ करणेही गरजेचे असते.

  • शक्य असले तेव्हा डोक्यावर तेल लावणे तसेच पादाभ्यंग करणे यांचाही दिनचर्येत समावेश करावा.

  • एकूण आरोग्य नीट राहण्याच्या दृष्टीने नाभी, कान, तळपाय व ब्रह्मरंध्र (क्राउन सेंटर) यावर नियमाने १-२ थेंब तेल टाकणे चांगले. तसेच नाकात तूप वा तेल घालावे.

  • न्याहारी व जेवण दिवसातून २-३ वेळा स्वतःच्या प्रकृतीनुसार व पाचनाग्नीनुसार केलेले चांगले. संध्याकाळचे जेवण सात्त्विक, पचायला हलके व सूर्यास्ताच्या सुमाराला करणे उत्तम. रात्री उशिरा केलेले जेवण पचत नाही व शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे त्रास उत्पन्न करते.

  • जेवण झाल्यावर २-३ तासांनी झोपायला गेलेले बरे. झोपताना शयनगृहात अंधार असावा, एखादा तुपाचा दिवा वा मेणबत्ती लावली तरी हरकत नाही, पण डोळ्यांवर फार उजेड न आलेला बरा. झोपण्यापूर्वी शक्यतो शांत स्वास्थ्यसंगीत ऐकणे उत्तम ठरते.

ऋतुचर्या

आयुर्वेदशास्त्रानुसार संपूर्ण वर्ष सहा विभागात ऋतुनुसार विभक्त केलेले आहे. प्रत्येक ऋतुनुसार वागणूक, आहार कसा असला पाहिजे याबद्दल आयुर्वेदात विस्तृत मार्गदर्शन केलेले आढळते. उदा. उन्हाळ्यात वातावरण गरम असल्यामुळे पित्तशमनाच्या गोष्टी घ्यायला सांगितले आहे. शीतवीर्य, मधुर, द्रव , स्निग्ध आहार घेणे उत्तम असे सांगितलेले आहे. उष्ण, तिखट, खूप आंबट आहार वर्ज्य सांगितलेला आहे. जेवणामध्ये तांदूळ, दूध, तूप, साखर, नारळ, द्राक्षे वगैरेंचा वापर सुचवलेला आहे. थंडीच्या दिवसांत उष्णवीर्य, गोड, आंबट गोष्टी घ्यायला सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दूध, तांदूळ, जव, गहू, गरम सूप, यूष घ्यायला सांगितलेले आहे. निसर्ग बहुधा अशाच गोष्टींचे उत्पादन त्या त्या काळात करत असतो. त्यामुळे ऋतुनुसार उपलब्ध असलेली फळे, भाज्या यांचा वापर केला तर सहसा चूक होण्याची किंवा फार जास्त शंका येण्याची शक्यता कमी असते.

नियमित पंचकर्म करणाऱ्या व्यक्तींना ऋतुनुसार विधी आयुर्वेदशास्त्राने सुचवले आहेत.

सद्वृत्त

आयुर्वेदात मानसिक स्वास्थ्याबरोबर आध्यात्मिक स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे असे सांगितलेले आहे. त्यासाठी आपल्या वागणुकीत काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. या गोष्टींचे अवलंबन केले तर आयुष्य संतुलित व सौहार्दपूर्ण राहायला मदत मिळते. जेवढी आपल्याला मानसिक शांती लाभेल तेवढे सगळ्यांबरोबर संबध सुधारतात. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार प्रत्येकाने सद्वृत्ताचे पालन करायला सुरुवात केली तर समाजात सकारात्मकता वाढायला मदत मिळू शकते.

  • नेहमी सत्य बोलावे, नेहमी गोड बोलावे,

  • कितीही बिकट परिस्थिती आली तरी मानसिक संतुलन साधण्याचा प्रयत्न करणे इष्ट, स्वतःवर ताबा ठेवणे, धीराने वागणे, मनात दयाभाव जागृत करणे चांगले. जीवनात नियमांचे पालन करणे स्वास्थ्याकरता उत्तम ठरते.

  • फार जास्त प्रमाणात खाणे, पिणे, अनैसर्गिक प्रमाणात शारीरिक संबंध ठेवणे, फक्त आवडीच्या गोष्टी करत राहणे, फक्त छंद जोपासणे, चांगले नाही.

  • सकारात्मक विचार ठेवणे, सकारात्मक विचार असलेल्यांबरोबर राहणे, सकारात्मक विचार असलेले साहित्य वा सोशल मिडिया वापरणे चांगले.

या व अशा अनेक प्रकारच्या सूचना आपल्याला आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सापडतात. या सूचनांचे जमेल तितके पालन केल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर स्वास्थ्य मिळण्यात मदत होऊ शकेल. जे बदल आपल्याला समोरच्या व्यक्तीत अपेक्षित असतील ते बदल प्रथम आपण आपल्यात घडवावेत असे म्हटलेले आहे. त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहिले व या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर नक्की फायदा मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.