- डॉ. मालविका तांबे
वेळेवर व्यवस्थित भूक लागणे, खाल्लेले अन्न नीट पचणे व रोज पोट साफ होणे यांसारखे खरे अन्य वरदान नाही. पण सध्या भूक न लागणे, खाण्याची इच्छा न होणे (फक्त चमचमीत वा आवडणारा पदार्थ समोर आला तरच खाण्याची इच्छा होणे), खाल्ल्यानंतर पोटात-छातीत जळजळ होणे, त्याचबरोबरीने पोट फुगणे अशा तक्रारी सध्या फार प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर भूक लागली आहे असे जाणवल्यावर ताटावर बसल्यावर जेवण जात नाही, अशीही तक्रार घेऊन येणारे रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळतात. या सगळ्या तक्रारींचे मूळ कारण असते जाठराग्नी-पाचनाग्नीने व्यवस्थित काम न करणे.
रोगाः सर्वे अपि मन्दे अग्नौ ।... अष्टांगहृदय
अग्नीचे काम व्यवस्थित होत नसले तर रोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
याच्या कारणाचा विचार केला तर आयुर्वेदात सांगितलेली कारणे अशी आहेत की फार प्रमाणात पाणी पिणे, आहाराच्या नियमांचे पालन न करणे अर्थात भूक लागलेली असताना जेवण न करणे, भूक लागलेली नसताना जेवणे, दोन जेवणांच्या मध्ये काहीतरी खात राहणे, विरुद्ध अन्न घेणे, वेगांचे धारण करणे अर्थात मलत्यागाला जायची गरज आहे तेव्हा न जाणे, लघवीला थोपवून ठेवणे, त्याचबरोबरीने वेळेवर व्यवस्थित व पुरेशी झोप न घेणे. अशा प्रकारच्या अग्निदोषाकरता मानसिक कारणेही खूप महत्त्वाची असतात. जास्त प्रमाणात राग-राग करणे, चिडचिड करणे, इतरांवर ईर्ष्या-मत्सर ठेवणे, मनावर खूप जास्त प्रमाणात ताण-तणाव असणे, नैराश्य व चिंता असणे ही कारणेही अग्निदोषासाठी महत्त्वाची असतात.
प्रकृतीप्रमाणे व अग्नीच्या दोषाप्रमाणे हे त्रास आयुर्वेदात सविस्तर सांगितलेले आहेत. अन्नाचे पचन व्यवस्थित व्हावे व भूक व्यवस्थित लागावी याकरता आपण काही उपाय बघू या.
जेवताना तोंड फार उघडे ठेवून जेवू नये. तोंडात चावत असलेला घास समोरच्याला कधीही दिसू नये. घास तोंडात घेतल्यावर तोंड बंद करूनच चावावे. त्याचबरोबरीने जेवत असताना आजूबाजूच्या व्यक्तींशी गप्पा मारू नये. गरज असल्याशिवाय जेवताना न बोलणेच चांगले.
फार घाईने किंवा फार भराभर नीट न चावता जेवू नये.
३. स्वतःला आवडत असणाऱ्या, परंतु न पचणाऱ्या गोष्टी आहारातून पूर्णपणे टाळणे इष्ट असते. कारण अशा गोष्टी भूक नसताना खाल्ल्या जातात व त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात.
जेवताना मन शांत असणे गरजेचे आहे. त्यामुळे ताण असला तरी शक्यतो चांगले विचार मनात आणणे, चांगले संगीत ऐकून नंतर प्रार्थना करून जेवायला बसणे जास्त उत्तम असते.
अधूनमधून लंघन किंवा उपवास करणे उत्तम. आठवड्यातून एखादे जेवण अगदी हलके असणे, किंवा चालत असल्यास आठवड्यातून एखादा दिवस एकभुक्त राहणे हे पचनाच्या दृष्टीने जास्त उत्तम ठरू शकते.
भूक व्यवस्थित लागण्यासाठी व पचन नीट होण्यासाठी जेवणाआधी साधारण १५ मिनिटे आल्याचा छोटा तुकडा काळे मीठ घालून खावा.
सकाळी उठल्यावर एक कप कोमट किंवा गरम पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस, थोडा आल्याचा रस व सैंधव वा काळे मीठ घालून प्यावे.
घासभर भातात तूप व पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण मिसळावे. हा घास जेवणाचा पहिला घास असावा व नंतर जेवण सुरू करणे उत्तम ठरते. आठवड्यातून २-३ वेळा तरी जेवणाच्या सुरुवातीला अशा प्रकारे हिंग्वाष्टक चूर्ण घेणे पचनाच्या दृष्टीने उत्तम ठरते.
भूक लागत नाही अशी खूप जाणीव असल्यास सकाळच्या न्याहारीमध्ये मऊ भात गाईचे साजूक तूप, थोडे सुंठ चूर्ण व पिंपळी चूर्ण घालून खावा. यामुळे पचन व्यवस्थित राहायला मदत मिळते.
अजिबात भूक लागत नसली तर साळीच्या लाह्यांची पेज करून खाणे उत्तम ठरते. किंवा तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता, आले यांची फोडणी दिलेले पातळ ताक घेतल्यास पचनाला मदत होऊ शकते.
पुदिना, कोथिंबीर, लिंबू, आले, लसूण व जिरे हे एकत्र करून बनविलेली चटणी जेवणात ठेवल्यास पचनाला मदत होऊ शकते.
जेवणानंतर ताज्या ताकात ओवा, काळी मिरी, काळे मीठ व सुंठ चूर्ण टाकून घेतल्यास पचनाला फायदा होऊ शकतो.
आमटी, भाजीच्या फोडणीत वा शिजवताना मोड आलेल्या मेथ्या वापरल्यास पचनाला चांगला उपयोग होताना दिसतो.
जिरे उकळून तयार केलेले पाणी सकाळी अनाशेपोटी घेतल्यास पचनाला मदत होऊ शकते.
लहान मुलांना अपचनाची तक्रार असल्यास आले, गवती चहा, पुदिना, तुळस घालून तयार केलेला चहा पाजण्याचा फायदा मिळू शकतो.
प्रकृतीनुसार गरम पाणी पिण्याचा पचनासाठी फायदा होताना दिसतो.
घरी केलेला मुरलेला, काळा झालेला मोरावळा, तसेच काळे झालेले लिंबाचे लोणचे पचनाच्या दृष्टीने उत्तम असते असे पूर्वीच्या काळी सांगितले जात असे. पण सध्या कोणी घरी मोरावळा, मोरांबा, लोणचे करत नसल्यामुळे या गोष्टी जुन्या करून खाणे अवघड आहे. पण घरात कोणी वृद्ध व्यक्तीला पचनाचा त्रास होत असला तर कुणाकडून तरी याच्या कृती शिकून घेऊन, २-३ वर्षे जुन्या झाल्यावर खाणे उत्तम ठरते.
रोज न चुकता पोटाला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे किंवा संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल लावणे पचनाच्या दृष्टीने जास्त उत्तम ठरते.
रोज जेवल्यानंतर २-२ संतुलन अन्नयोग गोळ्या घेण्याने पचनाकरिता, पोटफुगीकरिता चांगला फायदा होताना दिसतो.
रात्री झोपण्यापूर्वी संतुलन सॅनकूल चूर्ण घेतल्यास सकाळी पोट साफ होऊन अशा प्रकारच्या त्रासाला प्रतिबंध होतो.
पाचनाग्नीला मदत करण्याच्या दृष्टीने बिल्वसॅन, सॅन उदर आसव, संतुलन अविपत्तिकर चूर्ण वगैरे गरजेनुसार व वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेण्याचा फायदा होताना दिसतो.
पचन व्यवस्थित झाले तर शरीरात लघुता वाढते, उत्साह राहतो व सगळे वेग व्यवस्थित राहायला मदत मिळते. एकंदर पाहिले तर आरोग्याच्या दृष्टीने पचन व्यवस्थित असणे, भूक लागणे हे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे पचनाचा काही त्रास असल्यास दुर्लक्ष न करता लगेचच उपाय करणे इष्ट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.