- डॉ. मालविका तांबे
जानेवारी महिना म्हणजे वर्षातील सर्वांत थंड महिना. हेमंत-शिशिर ऋतूच्या संगमात असलेला हा महिना. यावेळी थंडी असते तसेच बरोबरीने गार वाराही वाहत असतो. थंडी असल्याने वात वाढतो. वातामुळे एकूणच कोरडेपणाही वाढतो. कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होणे, सांधे दुखणे वगैरे त्रास वाढताना दिसतात. तसेच या काळात शरीरात कफाचा संचय होत असल्यामुळे सर्दी-खोकला असेही त्रास होताना दिसतात.
आहार-विहाराची नीट काळजी घेतली तर त्रास कमी व्हायला मदत मिळू शकते. या काळात अग्नी व्यवस्थित असल्यामुळे भूक जास्त लागते. त्यामुळे या काळात आहाराची काळजी घेतली आणि ताजा, बल्य, संतुलित व उष्ण ठेवला तर सगळ्या त्रासांवर मात करण्यास मदत मिळू शकते.
काही साध्या-सोप्या गोष्टी बघू या, ज्यांची काळजी घेतली तर आपल्याला स्वस्थ राहण्यात मदत मिळू शकेल.
या ऋतूत आपल्याला तहान लागल्याची जाणीवच होत नाही. त्यामुळे पाणी कमी प्यायले जाते व त्रास होताना दिसतो. आवर्जून पाणी पिणे अत्यंत आवश्यक असते. शक्यतो कोमट पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने हितकर ठरते. जेवणाच्या टेबलावर स्वतःकरिता साधारण २ लिटरचा जग वा थर्मास भरून ठेवला तर दिवसातून किती पाणी प्यायले जाते आहे, याचा अंदाज येतो.
चहा करताना त्यात तुळशीची २-३ पाने, पुदिन्याची २-३ पाने व थोडा गवती चहा आवर्जून घालावा. यामुळे कफाचे निःसारण व्हायला मदत मिळते.
सर्दी झालीच तर गरम पाण्यात लिंबू पिळावे, त्यात थोडा आल्याचा रस व चवीपुरती साखर घालून गरम गरम असताना प्यायल्यास सर्दी कमी व्हायला मदत मिळते तसेच घशालाही आराम पडतो.
या काळात आहारात दूध व तूप भरपूर प्रमाणात वापरायला हरकत नाही. दूध शक्यतो गाईचे असावे व गरम असताना पिणे अधिक इष्ट. संतुलन शतानंत कल्प, अनंत कल्प किंवा चैतन्य कल्प टाकून दूध घेणे आरोग्यासाठी उत्तम. घरी केलेले साजूक तूप पोळी, भाकरी, आमटीत घालून जास्त चांगले.
या काळात दह्याचा वापर कमी असावा. दही फारच आवडत असल्यास आठवड्यातून १-२ वेळा दुपारच्या जेवणात २-३ चमचे या प्रमाणात घेतले तर चालू शकते.
घरी केलेले पनीर, चांगल्या प्रतीचे चीज या काळात चालू शकते.
डाळींचा वापर आवर्जून करावा. वेगवेगळ्या डाळींची भजी, धिरडी, ढोकळा, मिश्र डाळींची आमटी वगैरे पदार्थात डाळींचा वापर करता येतो. ज्यांना डाळी पचत नसतील अशांनी डाळ शिजवून पाणी काढून घ्यावे व या पाण्यात थोडे सैंधव मीठ, तूप घालून प्यायला द्यावे.
ज्यांना गोड आवडते व ज्यांची फार प्रमाणात साखर वाढलेली नाही अशांनी घरी केलेले श्रीखंड, जिलबी, मालपुवा, दुधी हलवा, गाजर हलवा आवर्जून खायला हरकत नाही. फक्त हे पदार्थ एका वेळी जास्त प्रमाणात खाण्याऐवजी अर्धी वाटी इतक्या प्रमाणात खाणे उत्तम, न्याहारीच्या वेळी घेतले तर आणखीच चांगले. घरी खवा करून पेढा, बर्फी वगैरे करून खाणे चांगले. वेळ कमी असणाऱ्यांनी आठवड्यातून १-२ वेळा रव्याची खीर, शेवयांची खीर वा बदामाची खीर करून खाल्ली तरी चालू शकते. गोड पदार्थ करत असताना त्यात बदाम, मनुका, काजू, पिस्ते, चारोळी वगैरेंसारखा सुका मेवा घातलेला चांगले.
तळलेल्या गोष्टी इतर ऋतूंमध्ये खाणे अवघड जाते. पण या ऋतूत गोराडू, सुरण, रताळी वाफवून किंवा तळून खाता येतात. तसेच या ऋतूत दुधी मुठिया, कोथिंबीर वडी वगैरे पदार्थ खाणे चांगले. या ऋतूत उंधियू, पोपटीसारख्या भाज्या करण्याची पद्धत आहे.
या ऋतूत आपल्या संपूर्ण शरीरात कोरडेपणा आलेला असतो. त्यासाठी खालील उपाय करता येतात. त्वचा संतुलन अभ्यंत सेसमी तेल स्नानाआधी साधारण अर्धा तास आधी संपूर्ण शरीराला हलक्या हाताने खालून वर या दिशेत लावावे.
नाक : नस्यसॅन घृत २-३ थेंब नाकात घालावे. यामुळे सायनस व नाकातील कोरडेपणा कमी होतो. वारंवार सर्दी होण्यास प्रतिबंध होतो.
डोळे : संतुलन सुनयन तेल ३-४ थेंब डोळ्यांमध्ये घालावे. डोळ्यांमधील कोरडेपणा कमी होतो.
कान : संतुलन श्रुती तेल १-२ थेंब कानात घालण्याने कानातील कोरडेपणा कमी होतो. तसेच इन्फेक्शन होण्यास प्रतिबंध होतो.
नसा : संतुलन कुंडलिनी तेल नसांचा कोरडेपणा कमी होतो.
सांधे : संतुलन शांती तेल सांध्यांना नियमितपणे लावावे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी सुती वा लोकरीचे कपडे घातलेले चांगले. सिंथेटिक कपडे घालणे टाळावे. बाहेर जाताना कान, गळा, तळपाय, तळहात, डोके यांचे संरक्षण नक्की करावे. मला थंडी वाजत नाही अशा समजाने व्यवस्थित कपडे न घालता बरेच लोक थंडीत बाहेर पडतात. त्यावेळी थंडी वाजली नाही तरी नंतर शरीरात वातदोष वाढून निरनिराळ्या प्रकारचे आजार भविष्यात होऊ शकतात.
कितीही थंडी असली तरी खूप गरम पाण्याने स्नान करू नये. स्नानासाठी खूप गरम पाणी वापरण्याने त्वचा अजूनच कोरडी होत जाते. स्नानाच्या वेळी शक्यतो साबणाचा वापर टाळावा, त्याऐवजी घरी केलेले उटणे किंवा सॅन मसाज पावडरसारखे उटणे वापरणे उत्तम. या उटण्यात गरजेनुसार कोरफड, दूध वगैरे वापरता येते.
त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी सतत वेगवेगळ्या प्रसाधनांचा मारा करण्यापेक्षा संतुलनचे क्रेम रोझ हे सिद्ध तेलांपासून बनविलेले तेल लावणे उत्तम ठरते. चेहऱ्याबरोबरच हाताच्या त्वचेला, विशेषतः नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला हे क्रीम लावणे फायदेशीर ठरते.
पायात नेहमी मोजे घालावे, मोजे घालण्यापूर्वी संतुलन सोल केअर क्रीम लावणे चांगले.
आठवड्यातून २-३ वेळा सोसवेल एवढ्या गरम पाण्यात १० मिनिटांसाठी तळपाय बुडवून बसणे आरोग्यासाठी हितकर ठरते.
हिवाळ्यात बऱ्याच वेळा सांध्यांजवळची जागा कोरडी झालेली आढळते. यासाठी संतुलन बॉडी लोशन सूदिंग हे क्रीम लावण्याचा फायदा होतो. घराबाहेर पडण्याआधी संपूर्ण शरीराच्या त्वचेला संतुलन बॉडी लोशन ॲक्टिव्ह हे क्रीम लावणे लाभदायक ठरते.
केसांमधील कोरडेपणा कमी करण्याच्या दृष्टीने संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेलासारखे तेल नियमितपणे केसांच्या मुळाशी लावावे. यामुळे कोंडा होण्यास प्रतिबंध होतो. बाहेर जाताना केस टोपीच्या आत असणे अधिक बरे. किंवा केसांना संतुलन व्हिलेज हेअर क्रीम लावल्यास कोरडेपणा कमी व्हायला मदत मिळते.
तळपायांना पादाभ्यंग घृत लावून पादाभ्यंग करणे उत्तम.
या काळात ओठ कोरडे होण्याचाही त्रास होतो. कोरडेपणा कमी करण्यासाठी अनेकांना त्यावर जीभ फिरविण्याची सवय असते, पण त्यामुळे ओठ अजूनच कोरडे होतात. ओठ फुटू नये यासाठी चेहऱ्याला संतुलनचे क्रेम रोझ लावत असताना तेच क्रीम ओठांला लावणे चांगले. रात्री झोपताना संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारख्या तेलाचा ओठांवर हलक्या हाताने मसाज करणे उत्तम.
थंडीच्या काळात लहान मुलांची काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे. ‘डॉक्टर, माझा मुलगा टोपी घालायला तयार नसतो, पायात मोजे घालत नाही, अंगावर पांघरूण ठेवत नाही यामुळे त्याला सर्दी खोकल्याचा त्रास कायम होतो. त्याला बरीच औषधे द्यावी लागतात’ अशी तक्रार बरेच पालक करतात. पायात मोजे, डोक्यावर टोपी घालण्याची लहान मुलांना सवय लावणे आवश्यक आहे. मोजे, टोप्या सिंथेटिक कापडाच्या नसाव्या, तर सुती असाव्या म्हणजे मुले एवढा त्रास देत नाहीत.
घरात रांगणारे बाळ असले तर घरातील एखाद्या खोलीत लहान हीटरची सोय करावी. खोली थोडी गरम करून मुलाला खाली सोडता येऊ शकते.
या काळात लहान-मोठ्यांनी गरम पाण्याची पिशवी वापरणे चांगले. रात्री झोपताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे हीटींग पॅड वापरता येतात, ते सुरक्षितही असतात.
अशा प्रकारे आहार-विहार-वागणूक या सगळ्यांद्वारे थंडीचा उबदार सामना केला तर थंडी आरोग्यदायी ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.