सूर्यदेवता नमो नम:

या सृष्टीतील सगळेच प्राणिमात्र निसर्गाच्या चक्रावर अवलंबून असतात. मनुष्यही याला अपवाद नाही.
Yoga
Yogasakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

या सृष्टीतील सगळेच प्राणिमात्र निसर्गाच्या चक्रावर अवलंबून असतात. मनुष्यही याला अपवाद नाही. आयुर्वेदशास्त्र हे निसर्ग व मनुष्याचे आरोग्य, मनुष्याचे आयुष्य यात सांगड घालून द्यायला मदत करते. सध्या सूर्यदेवता आपल्या डोक्यावर एवढी प्रखर किरणे पाठवत आहे की आपल्याला त्यांचे अस्तित्व नकोसं वाटायला लागते.

पण निसर्गाच्या चक्रात सर्वांत महत्त्वाचे स्थान सूर्यदेवालाच आहे. सृष्टीतील सगळे व्यवहार नियमाने चालतात ते सूर्यामुळेच. यात जोपर्यंत संतुलन राहते तोपर्यंत आयुष्यात आरोग्य टिकून राहते. सूर्याच्या वेळा आपल्या आरोग्यावर कशा प्रभाव करतात, ते आपण आज पाहू या.

सूर्यदेवतेचा उदय झाला की पहाट झाली, असे आपण म्हणतो. थकलो आहे, दमलो आहे म्हणून आज थोडे उशिरा उठू, असा विचार सूर्य कधीच करत नाही. तो नियत वेळेत उगवतो व नियत वेळी अस्त होतो. उगवत्या सूर्याचे किरण कोवळे असतात, आपल्या शरीराला मानवतील असे असतात, सकाळच्या कोवळ्या उन्हात बसण्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित राहायला मदत होऊ शकते.

ज्याप्रमाणे सूर्य बाहेर संपूर्ण सृष्टीला जागे करत असतो, तशाच प्रकारे आपण वेळेत उठून व्यायाम केला, प्राणायाम केला तर आपल्या शरीरातील सृष्टी वेळेवर कार्य करायला लागते. आपण या सृष्टीला नियमात न ठेवल्यास त्रास दिसायला लागतात. सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या आधी उठणाऱ्याचे आरोग्य व्यवस्थित राहते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेच.

जसा दिवस पुढे जातो तसा दिवस मध्यान्ही जातो, त्याचे किरण प्रखर व्हायला लागतात. त्यामुळे सकाळी हवाहवासा वाटणारा सूर्य दुपारी नकोसा होतो. सकाळच्या उगवत्या सूर्याचे किरण अंगावर घ्यायला सांगितलेले आहेत, सूर्यनमस्कार करायला सांगितले आहे, तर दुपारी डोक्यावर टोपी घातल्याशिवाय, व्यवस्थित कपडे घातल्याशिवाय बाहेर जाऊ नये, असे सांगितले आहे.

सध्या लवकर उठणे हे कालबाह्य झाल्यासारखे झालेले आहे. यामुळेच कदाचित चयापचय क्रियेशी निगडित आजार आज मोठ्या प्रमाणावर दिसायला लागलेले आहेत, तसेच आपल्या शरीरात आवश्यक असलेली जीवनसत्त्वे, मुख्यत्वे जीवनसत्त्व डी व जीवनसत्त्व बी १२ यांची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळायला लागलेली आहे.

जीवनसत्त्व डी या पूर्तीसाठी सकाळच्या उन्हात बसावे की दुपारच्या उन्हात यावर मतभेद दिसतात. पण आयुर्वेदशास्त्रानुसार सकाळचे कोवळे ऊन आरोग्यासाठी जास्त हितकर असल्यामुळे जीवनसत्त्व डी सुद्धा कदाचित याच वेळात तयार होत असावे.

आहाराच्या वेळा– आपल्या शरीरातील पाचनाग्नी सूर्याच्या वेळेनुसार कमी–जास्त होत असतो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पाचनाग्नी मंद असतो, तो हळूहळू संधुक्षित होत होत दुपारी मध्यान्ही सगळ्यांत जास्त प्रज्वलित असतो आणि संध्याकाळ होत जाते तसतसा पाचनाग्नी मंद होत जातो. त्यामुळे दिवसभरातील मुख्य जेवण मध्यान्ही करणे उत्तम असते. वेळ नाही या कारणामुळे काही लोक सकाळी साडेनऊ दहालाच जेवून घेतात.

पण त्यावेळी पाचनाग्नी प्रखर झालेला नसतो. तसेच वेळ उलटून गेल्यानंतर म्हणजे दुपारी २-३ वाजल्यानंतर जेवायला बसल्यासही अग्नी फार वेळ वाट पाहून मंद झालेला असतो, शरीरात उष्णता तयार झालेली असते. त्यामुळे ज्या अन्नासाठी आपण दाही दिशा हिंडत आहोत त्या अन्नाला वेळेत घेणे अत्यंत गरजेचे असते.

आपल्याकडे सांगितलेले आहे, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म. म्हणजे येथेही अग्नीचा विचार आहेच. त्यामुळे एक नियम लक्षात ठेवावा तो असा की सकाळी नाश्ता केला तरी तो प्रमाणबद्ध असावा तसेच सुपाच्य, सात्त्विक, प्रमाणात भोजन दुपारी ११ ते १च्या दरम्यान घेणे प्रकृतीसाठी उत्तम ठरते. संध्याकाळचे जेवणही सूर्यास्तापूर्वी करणे आरोग्यासाठी उत्तम असते.

आरोग्य लाभावे याची मनापासून इच्छा असणाऱ्यांनी, अवाजवी वजन कमी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी, मधुमेह, रक्तदाब वगैरे जीवनशैलीशी निगडित असणारे रोग असणाऱ्यांनी आपल्या दिनक्रमात एक बदल नक्की करावा तो म्हणजे संध्याकाळच्या आत जेवणे.

काही लोक म्हणतात की संध्याकाळी लवकर जेवल्यास रात्री भूक लागते, मिड नाइट स्नॅकिंगची सवय आहे, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी जेव्हा अग्नी उपस्थित नाही तेव्हा अग्नीला अन्न दिले तर शरीरात आम तयार होणार असतो, त्यामुळे रोग तयार होणार असतात. त्यामुळे अशा वेळी आहारात योग्य ते बदल करून सॅनकूल चूर्णासारखे चूर्ण, संतुलन पित्तशांतीसारख्या गोळ्या नियमितपणे घ्याव्या, म्हणजे अशा प्रकारचा त्रास होत नाही. तरीही भूक लागली तर मूठभर साळीच्या लाह्या खाणे उत्तम.

शरीरात असलेले वात, पित्त व कफदोष सूर्याच्या चक्राप्रमाणे चालतात. दिवसाच्या व रात्रीच्या १२-१२ तासांचे विभाजन करायचे झाल्यास प्रत्येक दोषाला चार तास मिळतात.

सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा काळ कफाचा, दुपारी व रात्री १० ते २ हा काळ पित्ताचा आणि दुपारी व मध्यरात्री २ ते ६ हा काळ वाताचा समजला जातो.

यामुळे दुपारी ११ ते १ या काळात जेवल्यास हा काळ पित्ताचा असल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते. रात्रीचे जागरण केले व या काळात जेवले तर मात्र पित्त विदग्ध होऊन शरीरात त्रास देऊ शकतो हे आपण आधीच पाहिले आहे. शरीरातील सर्व चयापचय क्रिया या कालानुसार चालत आहे असे आपल्या निदर्शनास येते.

याच बरोबरीने वय, ऋतू, यांचेही परिणाम वात-पित्त-कफावर होत असतात. पण शेवटी ऋतूही सूर्य व पृथ्वी यांच्यात असलेले अंतर व कोन यांच्यामुळेच तयार होत असतात. त्यामुळे तेथेही मुळात सूर्य आलाच. ज्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल त्यांनी रोज सकाळी सहाच्या आत उठावे व मलत्यागाचा प्रयत्न करावा. हा काळ वाताचा असल्यामुळे आपसूक पोट साफ व्हायला मदत होते. उशिरा उठण्याची सवय असल्यास कफाचा काळ सुरू झाल्यामुळे मलत्याग करणे अवघड होते.

आपल्या झोपेचे नियमही सूर्यावरच अवलंबून असतात. सूर्यास्तानंतर साधारण तीन-साडेतीन तासांनी झोपणे योग्य असते. सूर्यास्ताची वेळ साडेसहा धरली तर साडेनऊ-दहाला झोपणे हे आदर्श. पण सध्या कामामुळे प्रत्येकाला तर साडेनऊ-दहाला झोपणे अशक्य असते. आपण सध्या आपल्या आजूबाजूला कृत्रिम प्रकाश तयार करू शकतो.

या सगळ्यांचा विचार केला तर साडेनऊ-दहाऐवजी अकराला झोपले तर चालू शकते, पण त्याहून उशिरा झोपणे आरोग्यासाठी घातक ठरते. तसेच दिवसा झोपणे टाळलेलेच बरे. दुपारी झोपल्याने नंतर सुस्त वाटते, काहींचे डोकेही दुखते असा अनुभव आहे. आजारपण असल्यास, वृद्ध व्यक्ती व अगदी लहान मूल यांना दुपारची झोप चालू शकते.

आपल्या शरीरातील पाचनाग्नी सूर्यदेवतेचे प्रतीक आहे. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी कदाचित तुपाला एवढे महत्त्व दिलेले असेल. तूप हे शीतल असले तरी अग्नीला संधुक्षित राहायला मदत करते. अर्थात त्याची उष्णता कमी होऊन कार्य व्यवस्थित करायला मदत करत असावे.

त्यामुळे आपल्या शरीरातील सूर्यदेवतेचा आशीर्वाद टिकून राहावा अशी इच्छा असणाऱ्यांना आपल्या रोजच्या आहारात तुपाचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे होय. त्यामुळे सूर्यदेवतेला नमस्कार करून त्यांनी दाखविलेल्या पदचिन्हांवर चालणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे याचे भान ठेवून आपली दिनचर्या आखणे बरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.