दुर्गा योग-शक्ती ध्यान

‘गायत्री ध्यान’ या लेखाला उदंड प्रतिसाद लाभला. पुष्कळ वाचकांनी ‘दुर्गेच्या शक्तीचं ध्यान कसं करावं?’ असंही विचारलं आहे.
Durga Yoga-Shakti Meditation
Durga Yoga-Shakti Meditationsakal
Updated on

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

‘गायत्री ध्यान’ या लेखाला उदंड प्रतिसाद लाभला. पुष्कळ वाचकांनी ‘दुर्गेच्या शक्तीचं ध्यान कसं करावं?’ असंही विचारलं आहे. नवरात्राचे नऊ दिवस, नऊ रात्री ठिकठिकाणी रास गरबा, भोंडला, देवी जागरण, श्रीसूक्त पठण असे भरगच्च सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सगळीकडे होत आहेत. सगळं वातावरण भक्तीमय झालेलं आहे. मात्र, हे सगळं करत असताना, आपल्या आत एक मोठी अशी शक्ती आहे. तिला आपण आत्मशक्ती, प्राणशक्ती, कुंडलिनीशक्ती अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो.

त्या निर्गुण, निराकार शक्तीचं सगुण, साकार रूप म्हणजे देवी, भवानी, जगदंबा यांचं मूर्तीरूप. आपण त्यांची अतीव श्रद्धेनं, भक्तीनं आराधना, पूजा करतो. नवरात्रीच्या काळात विशिष्ट मंत्र, श्लोक, दुर्गा सप्तशतीमधली प्रार्थना म्हणून केलेलं ‘दुर्गा योग-शक्ती ध्यान’ हे अतिशय प्रभावी ठरतं. ते ध्यान कसं करायचं ते आता आपण पाहूया.

साधारण आठ-दहा मिनिटे सहज, सुखावह स्थितीत बसता येईल अशा आरामशीर आसनात बसावं. डोळे शांत मिटलेले असावेत. शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत अशी स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करावा. मिटलेल्या डोळ्यांसमोर आदिशक्ती, आदिमाया, कुंडलिनी जगदंबेचं जे कुठलं रूप आपल्याला अधिक आवडतं, भावतं ते साकार करावं. त्या रूपाशी आपण पूर्णपणे एकाकार, तल्लीन, एकाग्र होतो आहोत अशी भावना मनात निर्माण करावी.

आता खालील प्रार्थना (पाठ असेल तर) म्हणावी. किंवा (दुसऱ्या कुणी म्हटलेली) ऐकावी.

दुर्गे स्मृता हरसि भीतिम अशेषजन्तो:

स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभान ददासि।

दारिद्र्यदु:खभय हारिणि का त्वदन्या

सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता।।

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।

शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

या देवी सर्व भूतेषु।

शक्ती रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै।

नमस्तस्यै नमो नमः ॥

मार्कंडेय पुराण हे सगळ्यात प्राचीन समजलं जातं. दुर्गा सप्तशती हा त्यातलाच एक भाग आहे. विश्वशक्तीचं स्वरूप सुंदररीत्या उलगडून दाखवणारा असा हा अद्वितीय भाग आहे.

प्रार्थना म्हणून झाल्यावर, पुढचे काही क्षण डोळे तसेच शांत मिटलेले ठेवावे. नंतर अगदी सावकाश या ध्यानाच्या स्थितीतून बाहेर यावं. एक हळुवार श्वास घेऊन हळुवार सोडावा. आपल्या हाताच्या, पायाच्या बोटांची हळुवार हालचाल करावी. दोन्ही हातांचे तळवे अगदी अलगद डोळ्यांवरून फिरवून सावकाश डोळे उघडावे.

दुर्गेचं नाम, वर्णन, महिमा या मंत्राच्या माध्यमातून घेताना, शरीर आणि मनाचं आरोग्य सर्वोत्तम राखणारी अफाट अशी शक्ती ही स्पंदन-कंपनातुन जागृत होते. त्याबरोबरच आपल्या अंतःकरणातला भाव, भक्ती, श्रद्धा उत्कटतेच्या चरमसीमेवर येते. या सगळ्यांचं मिळून एक अद्‍भुत असं रसायन तयार होतं. त्याचा परिणाम आपल्या आतबाहेर, तसंच आजूबाजूचं वातावरण, यांच्यावर निश्चितपणे होतो.

आपलं मन अगदी सहजगत्या, सहजरीत्या अंतर्मुख होऊन, आपल्या अंतस्थ शक्तीशी (ज्ञानोबा माऊलींनी तिलाच ‘कुंडलिनी जगदंबा’ असं म्हटलेलं आहे) एकरूप होतं. या कुंडलिनी शक्तीचा विकास, तिचं जागरण, तिचं उत्थापन करण्यासाठी या ध्यानाचा अतिशय चांगला उपयोग होतो. हे ध्यान करत असताना आपल्या मनातले ताणतणाव, काळज्या, चिंता, किल्मीषं कुठच्या कुठे दूर पळून जातात. हा अनुभव आपण सगळ्यांनी नक्कीच घ्यायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.