व्यायाम करा अन् चांगलं खा

प्रत्येक मनुष्याला एक चांगली देणगी मिळाली आहे ती म्हणजे सुंदर शरीर. त्या शरीराची आपण जेवढी जास्तीत जास्त काळजी घेऊ, तेवढा उपयोग आपल्याला आयुष्यभर होत असतो.
Actress Neha Khan
Actress Neha Khansakal
Updated on

प्रत्येक मनुष्याला एक चांगली देणगी मिळाली आहे ती म्हणजे सुंदर शरीर. त्या शरीराची आपण जेवढी जास्तीत जास्त काळजी घेऊ, तेवढा उपयोग आपल्याला आयुष्यभर होत असतो. सात्त्विक आणि वेळेत आहार, दररोज न चुकता व्यायाम करणं आणि वेळेवर सहा ते आठ तास झोप घेतल्यामुळे आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त राहतं.

मी नियमितपणे सकाळीच उठते. त्यानंतर कमीत कमी एक लिटर पाणी पिते. फ्रेश झाल्यानंतर सूर्यनमस्कार, कपालभाती, प्राणायामाचे प्रकार करते. माझा नाश्ता भरपेट असतो. सकाळचं जेवण हलकंसं असतं. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये उपलब्ध होणारी फळं खाते. मी दररोज पाच ते सात लिटर पाणी पिते. प्रत्येक फळामध्ये वेगवगळी जीवनसत्त्वं असतात. दररोज सकाळी मी एक सफरचंद खाते. त्यामुळे मला दिवसभर ऊर्जा मिळते.

वर्कआऊट करण्यापूर्वी मी केळी खाते. त्यात खूप कॅलरीज असतात. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे वर्कआउट करू शकते. संत्री आणि अननस वर्कआऊट झाल्यानंतर खाते. सायंकाळी लेमन ग्रीन टी पिते आणि द्राक्षं खाते.  रात्रीच्या जेवणात चिकन वा पालेभाज्यांचा समावेश असतो. मी सॅलडही भरपूर खाते. त्याचप्रमाणे वेळेवर आणि पुरेशी झोप घेते.

फिट राहिल्यामुळे मला आनंद मिळतो आणि मनःशांतीसाठी मी मेडिटेशन करते. योगासनं, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार माझा मानसिक विकास करण्यासाठी उपयोगी पडतात.

अपघातानंतर सर्व बदललं

गेल्या दोन वर्षांत मला ही गोष्ट जाणवली, की जसं मी पूर्वी ज्या गोष्टींमधून फॅट मिळतात त्या गोष्टी म्हणजेच भात, दूधाचे पदार्थ व तूप यांसह विविध पदार्थ खाणं सोडलं होतं. मात्र, मी आता माझ्या जीवनशैलीमध्ये काही बदल घडवून आणले आहेत. मार्शल आर्ट करत असताना दीड वर्षापूर्वी  माझी पाठ दुखावली होती.

त्यादरम्यान मी दवाखान्यात उपचारही घेत होते. त्यावेळी मला डॉक्टरांनी सल्ला दिला होता, की खूप डाएटिंग करू नका. दूध, तूप, भात, सर्व प्रकारच्या डाळी, सर्व प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या आपण खाल्ल्याच पाहिजेत.  मी आता निसर्गानं दिलेले सर्व प्रकारचे पदार्थ खाते. मात्र, शरीराला घातक असणारं जंक फूड मी आवर्जून टाळते.

दूध आणि तुपातून शरीराला आवश्यक असणारं कॅल्शियम मिळत असतं. डाएटिंग म्हणजे तुम्ही फक्त सॅलडच खा, असं नाही. आता मी माझी जीवनशैली ठरवून घेतली आहे. मी जेवढं वर्कआउट करते, मेहनत करते, त्याचप्रमाणात आहारही घेते.

बाबाच माझे फिटनेस आयडॉल

आरोग्य आणि फिटनेस बाबतीत मी माझ्या बाबांचाच आदर्श घेतला आहे. माझे बाबा स्वतःच पैलवान होते. त्यांनी तब्बल ५४ कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळवलं होतं. ते सर्व प्रकारचे अन्नपदार्थ खात असत आणि शरीराला आवश्यक गोष्टी त्यांना त्या पदार्थांमधून त्यांना मिळत असत. ते म्हणायचे, की तुम्हाला वजन वाढलं आहे, असं वाटत असेल, तर थोडं जास्त वर्कआउट करा. त्यातून तुमच्या शरीराचा समतोल राखला जाईल.

आरोग्याबाबत टिप्स

  • दिनक्रम कितीही व्यग्र असला, तरी न चुकता व्यायाम करत जा.

  • सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणाची वेळ पाळा. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा.

  • मनःशांतीसाठी व्यायामाबरोबरच ध्यानधारणा, योगासने आणि प्राणायाम करत जा. सूर्यनमस्कारामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे होतात.

  • आपण वेळेवर झोपून वेळेवरच उठलं पाहिजे. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा तोटा आपल्यालाच सहन करावा लागतो.

  • जीवनामध्ये आनंदी राहणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त वेळ द्या. मित्रपरिवारांमध्ये मिळून-मिसळून राहा. विचारांची देवाणघेवाण करा. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्वही खुलत जातं.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.