फॅट्स आणि आपण
- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग
आहारशास्त्राच्या क्षेत्रात फॅट म्हणजे चरबीला नेहमी एका खलनायकासारखे दाखवले गेले आहे, वजनवाढ व इतर आरोग्य समस्यांचे कारण म्हणून. खरे पाहता, चरबी ही आवश्यक मॅक्रोन्युट्रियंट आहे, जी अनेक गोष्टींत महत्त्वाची भूमिका बजावतं.
ऊर्जास्रोत : चरबी एकत्रित ऊर्जेचा स्रोत आहे जो कर्बोदके आणि प्रथिनांच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त कॅलरीज एका ग्रॅमसाठी पुरवतो. जास्त परिश्रम केले किंवा कमी अन्नग्रहण केले गेले, तर हे राखीव इंधनाचे काम करून दीर्घकाळ ऊर्जा पुरवते. अलीकडच्या काळात ‘केटोजेनिक डाएट’ला कर्बोदके कमी करून चरबी जास्त प्रमाणात खाण्यावर भर दिल्याने बरीच प्रसिद्धी मिळाली. केटोजेनिक डाएट सर्वांनाच मानवेल असे नाही व जपून वापरले जावे.
पोषणतत्त्वांचे शोषण : अ, ड, ई व के यांसारख्या काही जीवनसत्त्वांचे शरीरात योग्य रितीने शोषण होण्यासाठी चरबीची गरज असते. चरबी या जीवनसत्त्वांसाठी वाहकाचे काम करते. आहारात योग्य फॅट्स असल्याशिवाय ही पोषणतत्त्वे योग्य रितीने शोषली जात नाहीत.
पेशींची रचना आणि कार्य : पेशींच्या आवरणातील महत्त्वाचा घटक चरबी असून, पेशीच्या रचनेत व तरलतेत याचा सहभाग असतो. पेशीच्या आत व बाहेर पदार्थाची हालचाल नियंत्रित करून पेशींना संदेश मिळण्याचे काम करते.
निरोधक आणि संरक्षक : स्थूलता किंवा शरीरातील वाढलेली चरबी निरोधकाचे काम करते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवून औष्णिक समतोलत्व राखते. याशिवाय चरबीचे कण शरीरातील हृदय, मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांभोवती साठून त्यांचे संरक्षण करतात.
मेंदूचे आरोग्य : मेंदू बहुतांश चरबीने बनलेला असतो व मेंदूची वाढ व कार्य यासाठी आहारातील चरबीची गरज असते. ओमेगा-३ व ओमेगा-६ यांसारखी फॅटी ॲसिड्स मानसिक कार्य, मूड सांभाळणे व मज्जासंस्थेचे आरोग्य टिकवणे यांसारखे महत्त्वाचे कार्य करतात.
हार्मोन नियंत्रण : चरबी काॅर्टिसोल, इस्ट्रोजेन व टेस्टोस्टेरोन यांसारख्या स्टेराॅईड हार्मोन्ससह हार्मोन्सचे एकीकरण व नियंत्रण करते.
भुकेचे नियंत्रण : जेवणातील आरोग्यदायी चरबी पोट भरल्याची व तृप्ततेची जाणीव करून देते, ज्यामुळे भुकेवर नियंत्रण येऊन जास्त खाणे टळते. चरबी पोट रिकामे करण्याच्या क्रियेस विलंब करते, ज्यामुळे बराच वेळ तृप्ततेची भावना राहून भूक कमी होते.
स्वाद आणि रुचकरपणा : चरबीमुळे अन्नामध्ये स्वाद, पोत व समृद्धता वाढते, ज्यामुळे रुचकरपणा वाढून अन्न खाण्याचा आनंद वाढतो.
चरबीचे निरनिराळे प्रकार असून, यातील प्रत्येकाचे शरीरावर वेगळे परिणाम होतात. सुकामेवा, बिया, ॲवोकाडो व ऑलिव्ह ऑइल यांतून मिळणारी अनसॅच्युरेटेड फॅट्स ही चांगली चरबी, आरोग्यदायी चरबी मानली जाते. याचे प्रमाणात सेवन केल्याने वाईट कोलेस्टेरॉल (LDL कोलेस्टेरॉल) कमी होण्यास मदत होते, पर्यायाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
याविरुद्ध, सॅच्युरेटेड फॅट्स जी विशेषतः प्राणिजन्य पदार्थात आणि पाम व नारळ तेलासारख्या विषुववृत्तीय तेलात आढळतात, ती कमी प्रमाणात खाल्ली गेली पाहिजेत, कारण यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांत बहुदा आढळणारे ट्रान्सफॅट्स पूर्णतः टाळले गेले पाहिजेत, जे कोलेस्टेरॉल पातळी व हृदयाच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम करतात.
आहारात आरोग्यदायी चरबीचा समावेश करणे एकंदर आरोग्य व वेलबीइंगसाठी आवश्यक आहे. किती आणि कोणत्या प्रकारची चरबी घ्यावी यासाठी आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.