लग्नातील जेवणाचा आस्वाद घेताना...

आपल्याकडील लग्न म्हटले की आनंद, उत्साह व चविष्ट, चटकदार खाद्यपदार्थ. बुफे व इतर मेजवान्या हे लग्नाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असते.
Wedding Meal
Wedding MealSakal
Updated on

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

आपल्याकडील लग्न म्हटले की आनंद, उत्साह व चविष्ट, चटकदार खाद्यपदार्थ. बुफे व इतर मेजवान्या हे लग्नाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असते. परंतु, आहारातील समतोल आणि अन्न वाया जाऊ न देणे यांबाबत ते एक प्रकारचे आव्हानच आहे. आपल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक आहाराचा विचार करून चौकसपणे लग्नाच्या मेजवानीचा आनंद घ्यावा. याबद्दल काही टीप्स बघूया.

पूर्वनियोजन

लग्न किंवा त्याच्या स्वागत समारंभाला जाण्याचे ठरवताना, तेथील जेवणाची वेळ लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपले खाणे ठरवावे. रिसेप्शनचे जेवण खूप मोठे असेल असे वाटत असेल, तर दिवसभरात हलका आहार घेऊन एकंदर कॅलरीचे प्रमाण समतोल राखावे; पण जेवण चुकवू नका.

विचारपूर्वक खाणे

बुफेमध्ये प्लेट भरण्यापूर्वी तेथे मांडलेले सर्व पदार्थ एकवेळ नजरेखालून घाला. सॅलड्स, ग्रिल्ड किंवा उकडलेले पदार्थ; थोड्या प्रमाणात मसालेदार-चमचमीत, जड पदार्थ अशी निवड करा. यामुळे जास्त न खाता सर्व पदार्थांची चव घेऊ शकता.

प्रमाणावर नियंत्रण

विविध पदार्थ पाहून आपण सहजपणे वाहवत जातो; पण प्रत्येक पदार्थ किती प्रमाणात वाढून घेता, त्याबाबतचे नियंत्रण महत्त्वाचे. पहिल्यांदा थोडे थोडे वाढून घ्या. एखादा पदार्थ जास्त आवडल्यास परत वाढून घेऊ शकता. यामुळे जास्तीचे खाल्ले जात नाही व अन्नाची नासाडीदेखील होत नाही. ‘टेबलस्पून’ वापरून तेथे असलेले सर्व पदार्थ एक-एक चमचा वाढून घेतल्यास तिथे मांडलेले सर्व पदार्थ आपण चाखू शकतो.

हायड्रेशन

लग्नसमारंभात असताना वरचेवर थोडे पाणी प्यायल्यास, पोट भरल्यासारखे वाटून जास्त खाणे टळते. तिथे दिली जाणारी, साखर घातलेली पेये जास्त पोट भरतात, त्यामुळे ती पूर्णपणे टाळा.

योग्य निवड

भारतीय लग्नांत बऱ्याच परंपरागत, चमचमीत, मसालेदार व लुभावणाऱ्या पदार्थांची रेलचेल असते. या पदार्थांचा थोडासा वाटा घेतला, तरी इतर शाकाहारी पदार्थ, ताजी फळे यावर भर देण्याचा प्रयत्न करावा.

गोडाचा आनंद

लग्नांत गोड पदार्थ असतातच. त्यांचा आनंद घेण्यासाठी, प्रत्येकाचा चवीपुरता छोटासा वाटा घेणे हा एक पर्याय आहे, किंवा तुमच्या विशेष आवडीचा एखाद दुसरा पदार्थच फक्त घेऊ शकता. गोड खाताना अगदी सावकाश व विचारपूर्वक खात खात त्यांचा आस्वाद घ्यावा.

शरीराचे ऐका

आपल्या शरीराने दिलेल्या भुकेच्या व पोट भरल्याच्या जाणिवांची दखल घ्या. प्रत्येक घास हळूहळू, चावूनचावून खा. पोट भरल्याची जाणीव होताच थांबा.

हालचाल करा

शक्य असल्यास लग्नसमारंभापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये केवळ तीस मिनिटांसाठी का असेना, भाग घ्या. शरीरातील आनंदी हार्मोन्स ‘एंडोर्फिन्स’ना चालना मिळून समारंभ साजरा करण्यास उत्साह येईल. लग्नसमारंभात इकडेतिकडे फिरा, लोकांना भेटा-बोला, नाचण्याचा आनंद घ्या. यामुळे कॅलरी जळण्यास मदत होईल. मेजवानीचा आस्वाद घेतल्यावर शतपावली, किंवा कोणतीही छोटी शारीरिक हालचाल करण्याचा विचार करा.

लग्नातील बुफेचा आस्वाद विचारपूर्वक आणि नियंत्रणात घेतल्यास शरीरास आवश्यक असणारा चौरस आहार मिळूनदेखील आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. याखेरीज, अन्नाची नासाडी होऊ न देण्याचा विचार केल्यास समारंभाचा आनंद घेता येतो व याचा शरीराला फायदाही होतो. समारंभाचा, चवदार खाण्याचा आनंद घ्या व आपल्या वैयक्तिक आरोग्य ध्येयासह त्याचा आस्वाद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.