- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ
ध्यानस्थ’ लेखमालेच्या अनेक वाचकांनी ‘नवरात्रात कुठलं ध्यान अधिक परिणामकारक ठरेल?’ असं विचारलं आहे. भारतात हजारो वर्षांपूर्वी वेदांची निर्मिती झाली. ऋग्वेदातली एक ऋचा ही मंत्राप्रमाणे गायत्री छंदात म्हटली जाते. अतिशय दिव्य अशा सविताशक्तीच्या उपासनेचा हा मंत्र म्हणजेच गायत्री मंत्र. या मंत्राच्या उच्चारानं साधकांचं मन हे ध्यानात जाणिवेच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोचतं.
गायत्री मंत्राचे तीन प्रकार आहेत. ऋग्वेदातला मूळ गायत्री मंत्र ‘तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।’ असा आहे. यजुर्वेदातला ‘ॐ भूर्भूवः स्वः’ हा मंत्र मूळ गायत्री मंत्राला जोडला, की ‘गायत्री महामंत्र’ तयार होतो : ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।
ॐकाराला प्रणव असं म्हटलं जातं. गायत्री महामंत्रात तीन वेळा ॐकार गुंफला, की त्याचा ‘त्रिप्रणव गायत्री मंत्र’ तयार होतो. हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र मानला जातो : ॐ भूर्भूवः स्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात् ॐ।
गायत्री ध्यान करताना ‘त्रिप्रणव गायत्री मंत्र’ म्हटला, तर ते ध्यान सगळ्यात जास्त प्रभावी होतं असा अनुभव आहे. चोवीस अक्षरांच्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून गायत्री मंत्र साकार झाला आहे. हे प्रत्येक अक्षर एकेका विशिष्ट शक्तीचं द्योतक मानलं जातं. अग्नि, वायु, सूर्य, आकाश, यम, वरुण, पर्जन्य, बृहस्पति, इंद्र, गंधर्व, पूषा, मित्र, त्वष्टा, वसु, मरुदगण, सोम, अंगिरा, विश्वदेव, अश्विनीकुमार, प्रजापति, संपूर्ण देवता, ब्रह्मा, विष्णू आणि महेश (रुद्र - शंकर) या त्रिमूर्ती.
हे ध्यान कसं करायचं ते पाहूया.
कुठल्याही ध्यानात्मक आसनात आरामशीर वाटेल असं बसावं.
ॐ भूर्भूवः स्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात् ॐ।
हा मंत्र अगदी सावकाश, हळुवारपणे, किमान अकरा वेळा म्हणावा. प्रत्येक अक्षराचा उच्चार करताना जी स्पंदनं निर्माण होतात, ती अगदी एकाग्रतेनं अनुभवावी. ध्यान करताना मंत्र किती वेळा म्हटला, यापेक्षा तो कसा म्हटला याला सर्वाधिक महत्त्व आहे, हे लक्षात ठेवावं.
गायत्री मंत्र आणि गायत्री ध्यानाची पद्धत ही अतिप्राचीन आहे. मात्र या दोन्हीवर संपूर्ण जगभरात विस्तृत संशोधन झालं आहे. डॉ. हॉवर्ड स्टींजेरिल यांनी हॅम्बर्ग विद्यापीठामध्ये गायत्री मंत्रावर संशोधन करून शोधनिबंध प्रकाशित केला. त्यांनी शरीरविज्ञान प्रयोगशाळेत गायत्री मंत्राच्या उच्चाराची शक्ती तपासली. गायत्री मंत्राच्या नादातून प्रति सेकंद १,१०,००० ध्वनिलहरी निर्माण होतात असं लक्षात आलं. गायत्री मंत्रामध्ये चोवीस अक्षरं आहेत. प्रत्येक अक्षरातून सूक्ष्म जाणीव, ऊर्जाक्षेत्र, चुंबकीय क्षेत्र यावर सखोल परिणाम दिसून येतो. शरीरातल्या ‘सुपर नॅचरल पॉवर्स’ जागृत करण्याचं सामर्थ्य गायत्री मंत्रात आहे.
या ध्यानाचे असे परिणाम आढळून आले आहेत -
विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, एकाग्रतेत वाढ. शरीरातली षटचक्रं उत्तेजित होतात. अचेतन शक्तिकेंद्राना चेतना मिळते.
उच्चारशास्त्राच्या अभ्यासकांनी म्हटलंय, की चोवीस अक्षरांचा वारंवार होणारा नाद हा मज्जातंतूमध्ये अनुनाद निर्माण करतो. त्यावेळी ओठ, मेंदूतील नाड्या, टाळू, जिभेवर येणारा दाब हा विशेष असतो. नाड्यामध्ये चुंबकीय आसक्तीमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा निर्माण होतात. सर्व शक्तिमान समजल्या जाणाऱ्या गायत्री मंत्रावर आधारित हे ध्यान या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सुरू करून त्याचे लाभ नक्कीच अनुभवायला हवेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.