डॉ. भाग्यश्री झोपे
तेज, प्रकाश, उत्साह, शक्ती हे सगळे समान अर्थाचे शब्द. ज्या देशात हिवाळ्यात दिवसेंदिवस सूर्यदर्शन होत नाही, तेथे ‘चांगला दिवस’ म्हणजे सूर्यदर्शनाचा दिवस असे समीकरण झालेले दिसते. भारतात पावसाळ्यात ज्या दिवशी सूर्यदर्शन अजिबात होत नाही तो दिन ‘दुर्दिन’ असे म्हटले जाते. आयुर्वेदातही अशा दिवशी नस्यासारखे उपचार करू नयेत असे सांगितलेले आढळते. हे सांगायचा हेतू इतकाच की प्रकाशाची, तेजाची ओढ प्रत्येकाला असते. आरोग्यसुद्धा सतेजतेतून प्रकट होत असते.
दोष, धातू, मल हे शरीराचे मूलभूत घटक. दोषांमधील संतुलन, धातूंची संपन्नता आणि मलभागाचे योग्य उत्सर्जन यावर आरोग्य ठरत असले तरी याच्याबरोबरीने शरीरातील अग्नीचे योगदान खूपच महत्त्वाचे असते. अन्नपचन करणारा तो अग्नी अशी अग्नीची साधी व्याख्या. ‘रोगाः सर्वेऽपि मन्दाग्नौ’ म्हणजे सर्व आजार मंदावलेल्या अग्नीमुळे होतात हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावे असे आहे. मात्र अग्नीचे कार्य अन्नपचनापुरते मर्यादित नाही हे चरकसंहितेतील या सूत्राद्वारे स्पष्ट होते.
‘‘आयुर्वर्णबलं स्वास्थ्यम् उत्साहोपचयौ प्रभा । ओजस्तेजोऽग्नयः प्राणाः चोक्ता देहाग्निहेतुकाः ।।’’ आयुष्य, वर्ण, ताकद, आरोग्य, उत्साह, सुदृढता, कांती, ओज, तेजस्विता व प्राण हे सर्व शरीरस्थ अग्नीशी संबंधित आहेत. हा अग्नी डोळ्यांनी दिसत नाही पण कार्यावरून समजून घेता येतो. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगतात त्याप्रमाणे सध्याच्या आधुनिक परिभाषेतील हॉर्मोन्स किंवा संप्रेरके सुद्धा अग्नीच्या अधिपत्याखाली येतात. थायरॉइडमधील बिघाड असोत, प्रजननंसंस्थेशी संबंधित विकार असोत, स्त्री-संतुलनातील दोष असोत यावर उपचार करताना अग्नीचा विशेष विचार करणे गरजेचे असते. आयुर्वेदात अग्नीला ‘भगवान’ अशी संज्ञा दिलेली आहे, तर श्रीमद्भगवद्गीतेत श्रीकृष्ण ते स्वतः ‘वैश्र्वानर’ रूपाने प्रत्येक प्राणिमात्राच्या शरीरात राहतात असे सांगतात.
या सगळ्या उदाहरणांतून आपण शिकायचे इतकेच की देव प्रसन्न राहावा म्हणून आपण जसे दक्ष असतो, देव रागावला तर आपले काही खरे नाही हे जसे आपल्याला माहिती असते तसेच अग्नी प्रदीप्त राहावा यासाठी यथासंभव प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात असते. बिघडलेल्या अग्नीला पुन्हा संतुलित करणे अतिशय अवघड काम होय. शरीरात १३ प्रकारचे अग्नी असतात असे आयुर्वेदात सांगितलेले असले तरी त्यातला सर्वांत महत्त्वाचा असतो जाठराग्नी. कारण जाठराग्नी व्यवस्थित असला तर धात्वग्नी, भौतिकाग्नी वगैरे इतर सर्व अग्नी सुद्धा आपापली कामे यथाव्यस्थित करत राहतात. पण जाठराग्नी बिघडला तर इतर सर्व अग्नींवर त्याचा परिणाम होतो. आरोग्याच्या तेजस्वितेसाठी जबाबदार अशा पाच मुख्य अग्नींना संतुलित ठेवण्यासाठी काय करायला हवे हे आज आपण पाहू या.
‘‘पाचक अग्नी - पाचकोऽग्निरामपक्वाशयमध्यगः ।’’ आमाशय म्हणजे ज्याला जठर, पोट, स्टमक म्हटले जाते त्याच्या आणि पक्वाशय म्हणजे आतड्याच्या मध्यात राहणारा अग्नी म्हणजे पाचक अग्नी. हा सूर्याशी संबंधित असतो. बाह्य सृष्टीत जेव्हा सूर्य तीव्र होतो तेव्हा पाचकाग्नी सुद्धा प्रदीप्त होतो आणि म्हणून मध्याह्नी जेवण करणे हे पाचकाग्नीच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. सकाळी पोटभर नाश्ता करून दुपारी न जेवणे किंवा उशिरा जेवणे आणि रात्री सूर्यास्तानंतर खूप उशिरा जेवणे हे पाचकाग्नीला हळू हळू मंदावणारे असते. म्हणून आयुर्वेदानुसार सकाळी कधी साळीच्या लाह्या, कधी ज्वारीच्या लाह्या, कधी एखादा मुगाचा लाडू, हिवाळ्याच्या ऋतूत घावन किंवा धिरडे अशा पचायला अगदी हलक्या गोष्टी घेणे, दुपारी १२ ते १ च्या दरम्यान वरण, भात, भाजी, आमटी, कोशिंबीर, पोळी वा भाकरी, ताक असे चौरस जेवण करणे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर लवकरात लवकर, निदान आठ-साडेआठपर्यंत दुपारच्या तुलनेत कमी आणि हलका आहार घेणे उत्तम समजले जाते.
वैद्यांच्या सल्ल्याने एकदा स्वतःची प्रकृती काय आहे हे समजून घेऊन प्रकृतीला अनुकूल अन्न घेणे, ज्या देशात राहतो तेथील धान्य, भाज्या, फळे सेवन करणे देशी बियाणे, सेंद्रिय अन्न यांना प्राधान्य देणे हे सुद्धा पाचकाग्नीच्या रक्षणासाठी आवश्यक होय. प्रत्येक भारतीय व्यक्तीला ‘यज्ञ’ माहीत असतो. यज्ञात तुपाची आहुती दिली की अग्नी जसा प्रज्ज्वलित होतो तसाच पाचकाग्नी संधुक्षित होण्यासाठी अन्नासह योग्य मात्रेत पारंपरिक तूप घेणे सहायक असते. भाजी-आमटी बनविताना त्यात योग्य प्रमाणात जिरे, धणे, हळद, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता, आमसूल वगैरे मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणे, ताटात तोंडाला चव यावी यासाठी हिरवी चटणी किंवा लोणचे असणे, जेवणात लिंबाची फोड असणे, प्यायचे पाणी अग्निसंस्कार केलेले म्हणजे उकळलेले असणे हे सर्व पाचकाग्नीला मदत करणारे असते.
‘‘रंजक अग्नी – रञ्जकः आमाशयाश्रयः।’’ आमाशय म्हणजे सेवन केलेले अन्न सर्वप्रथम जमा होते तो अवयव. आमाशय हे कोफदोषाचेही राहण्याचे ठिकाण, त्यामुळे येथील अग्नीच्या संतुलनासाठी कफदोष वाढणार नाही यासाठी प्रयत्न करणे इष्ट असते. यादृष्टीने पाणी योग्य प्रमाणातच पिणे, गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी न खाता सुरुवातीला सेवन करणे, जेवणाच्या शेवटी जिरे पूड, काळे मीठ टाकून वाटीभर ताजे ताक घेणे, मुखशुद्धीसाठी ओवा, बडीशोप यांच्यापासून बनविलेल्या सुपारीचे मिश्रण खाणे, त्रयोदशी विडा सेवन करणे, दुपारच्या जेवणानंतर न झोपणे याकडे लक्ष देण्याचा उपयोग होतो.
‘‘आलोचक अग्नी- आलोचकः दृक्स्थः।’’ दृष्टीमध्ये, डोळ्यांमध्ये असणारा आलोचक अग्नी. याच्या तेजस्वितेसाठी नियमित पादाभ्यंग, डोळ्यांत अंजन घालणे, शुद्ध मध उपलब्ध असला तर तो अंजनाप्रमाणे डोळ्यांत घालणे, रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण तूप व मधात मिसळून घेणे, आठवड्यातून दोन वेळा त्रिफळ्याच्या पाण्याने डोळे धुणे, सुनयन तेलासारखे तेल डोळ्यात टाकणे हे सहायक असते. डोळ्यातील सतेजता ही शक्तीची निदर्शक असते. यादृष्टीने आत्मप्राश, च्यवनप्राश, सॅन रोझसारखी रसायने सेवन करणे, अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे, वेळेवर व पुरेशी झोप घेणे हे हितावह असते.
‘‘भ्राजक अग्नी – भ्राजकः त्वक्स्थः।’’ त्वचेत राहणारा तो भ्राजक अग्नी. नियमित अभ्यंग, स्नानाच्या वेळी साबणाऐवजी उटणे वापरणे, आहारात साजूक तूप, घरचे लोणी वगैरे स्निग्ध द्रव्यांचा समावेश असणे हे या अग्नीला प्रदीप्त करणारे असते.
‘‘साधक अग्नी - साधकः हृदिस्थः।’’ हृदयात राहणारा तो साधक अग्नी. हृदय हे ओजतत्त्वाचेही स्थान असते. ओज म्हणजे सप्तधातूंचे सार. त्यामुळे पोषक आहार, उत्तम रसायने यामुळे सात धातूंचे व्यवस्थित पोषण झाले की ओजाचे पोषण होते, शरीराची एकंदर प्रभा, आभा वाढण्यास मदत मिळते. आयुर्वेदातील सद्वृत्ताचे पालन करणे म्हणजे गरज असणाऱ्याला मदत करणे, समाजाप्रती कृतज्ञता बाळगणे, दुसऱ्याला आदर देणे, मैत्रीभाव मनात कायम असू देणे यामुळेही साधक अग्नीच्या माध्यमातून सतेजतेचा लाभ होतो. मोठे सत्पुरुष, संत, श्रीगुरु यांच्याकडे पाहिल्यावर जी तेजस्विता जाणवते, आपोआप प्रसन्नतेचा अनुभव येतो तो यामुळेच. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जर आपण आयुष्य जगलो तर आपल्यालाही ही आंतरिक सतेजता जाणवू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.