वीस-पंचवीस मिनिटांचा काळ...

संध्याकाळची वेळ. सात साडेसातची. हिंजवडीहून संदीप परत येत होता. त्याच्या आयटी कंपनीतून. नेहमीप्रमाणे प्रचंड ट्रॅफिक. हळूहळू गाडी पुढं सरकत होती.
panic attack disorder
panic attack disordersakal
Updated on

संध्याकाळची वेळ. सात साडेसातची. हिंजवडीहून संदीप परत येत होता. त्याच्या आयटी कंपनीतून. नेहमीप्रमाणे प्रचंड ट्रॅफिक. हळूहळू गाडी पुढं सरकत होती. सगळ्या वातावरणात कंटाळा भरलेला. घरी जाण्याची प्रत्येकाला घाई; पण प्रत्येक जण हताशपणे आपापल्या गाडीत कैद झाल्यासारखा. सवयीनं म्युझिक सिस्टीममधून गळत असलेलं म्युझिक. मनात डेडलाइन्स, टार्गेट्स, कस्टमर कॉल्स, दिवसभरातली मॅनेजमेंटची बोलणी किंवा सहाय्यकांशी झालेली बाचाबाची वगैरे गोष्टी चालूच.

चौकात सिग्नलला संदीप थांबला आणि अचानक त्याला गुदमरल्याची भावना जाणवायला लागली. छातीत दुखतंय असं वाटायला लागलं. डावा हात दुखायला लागला. ही लक्षणं कुठंतरी ऐकली होती. हार्ट ॲटॅक तर नसेल? त्याला नको नको त्या गोष्टी आठवायला लागल्या.

त्याच्या मित्राचा- अभिजीतचा दोन महिन्यांपूर्वी अचानक हार्ट ॲटॅकनं झालेला मृत्यू. लहानपणी शेजारच्या लेलेकाकांचा सकाळी पेपर वाचता वाचता झालेला मृत्यू, डोक्यापासून पायांपर्यंत बर्फासारखी थंडगार शिरशिरी पसरत गेली. तो हादरला. सिग्नलला त्यानं गाडी डाव्या बाजूच्या रस्त्यावर घेतली आणि वेगात जवळच असलेल्या हॉस्पिटलच्या दारात थांबवली.

डॉक्टरांनी तपासलं. ईसीजी काढला. तो अगदी नॉर्मल आला होता. रक्तदाब थोडा वाढला होता; पण डॉक्टर म्हणाले, ‘दिवसभराचा थकवा आणि घाबरल्यामुळे तो अगदी थोडा वाढलाय.’ घरी जाऊन विश्रांती घ्यायला सांगितली. तो पुनःपुन्हा विचारत होता, ‘हार्ट ॲटॅक नक्की नाहीय ना?’ त्यांनी ‘नक्की नाही’ असं सांगितलं. मात्र, संदीपचं समाधान झालं नाही. बीपी नॉर्मलचा १२०/८० चा आकडा मनात सारखा येत होता. थोडं जास्त आलंच कसं?

इंटरनेटवर वाचलेली हार्ट ॲटॅकची लक्षणं मनात येत होती. आणखी कुणाला तरी दाखवायला हवं. दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला हवं. त्यानं बायको स्वातीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. मोठया हॉस्पिटलमध्ये Cardiologist नी तपासलं. त्यांनीही सांगितलं, की सर्व नॉर्मल आहे. थोडी विश्रांती घ्या. तात्पुरतं समाधान झालं. घरी आल्यावर रात्री झोप नाही. सतत टेन्शन. काहीतरी असणार नक्की. स्वातीनं खूप समजावलं.

दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरनी काही स्वस्थ वाटण्याच्या गोळ्या दिल्या. त्यानं मात्र बरं वाटलं. दोन दिवसांनी कामावर रुजू झाला; पण मनात कोपऱ्यात भीती थोडी होतीच. आठच दिवसांनंतरची गोष्ट. ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती. त्यापूर्वी अर्धा तास आधी पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं. छातीत दुखतंय असं वाटायला लागलं. घाम आला. हे साधारण वीस पंचवीस मिनिटं चाललं होतं.

मागच्या वेळेला नसेल; पण आज नक्की गंभीर काही तरी आहे. मित्राला घेऊन बाहेर पडला. दुसऱ्या नामांकित Cardiologist कडे गेला. त्यांनी दोन दिवसात सर्व टेस्ट्स केल्या. सर्व रिपोर्ट्‌स नॉर्मल होते. त्यांनी धीर दिला. काही मन:शांतीच्या गोळ्या दिल्या व गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचं सुचवलं. संदीप थोडा सावरला. पण काही काळानंतर छातीत दुखल्यासारखं वाटणं, विलक्षण भीती वाटणं हा सिलसिला चालूच राहिला.

प्रत्येक वेळी हे साधारण वीस पंचवीस मिनिटे व्हायचं. आयुष्यातली स्वस्थताच हरवली होती. घरच्यांनी, बाहेरच्यांनी सगळ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण सगळे प्रयत्न फोल गेले. संदीपच्या बाबतीत नेमकं काय घडत होतं? सगळे रिपोर्ट्‌स नॉर्मल आहेत हे डॉक्टरांनी वारंवार सांगूनसुद्धा पुनःपुन्हा छातीत दुखणं आणि पंधरा-वीस मिनिटं विलक्षण भीतीची लक्षणं हे सगळं काय होतं?

...संदीपला panick attacks येत होते आणि panic attack disorder सुरू झाली होती. ही पॅनिक ॲटॅक डिसॉर्डर हल्ली खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते. संपूर्ण शारीरिक तपासणी करून कुठलाही शारीरिक आजार नसल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला, तरीही छातीत दुखणं, डोकं दुखणं व काहीतरी भयानक आजार असण्याची जवळजवळ खात्री पटून, मृत्यूच्या भीतीनं हतबल होऊन जाणं, हे यात घडतं.

अशा ॲटॅकमध्ये दिसणारी लक्षणं, प्रमुख कारणं आणि त्याबाबतच्या उपाययोजना यांच्याविषयी पुढील लेखात माहिती घेऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.