‘मन ध्वनी अनुनाद ध्यान’ कसं करावं?

‘मन ध्वनी अनुनाद तंत्र’ या ध्यानपद्धतीबद्दल माहिती आपण पाहिली. आता हे ध्यान कसं करायचं हे समजून घेऊया.
sakal
MeditationMeditation
Updated on

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

‘मन ध्वनी अनुनाद तंत्र’ या ध्यानपद्धतीबद्दल माहिती आपण पाहिली. आता हे ध्यान कसं करायचं हे समजून घेऊया.

आरामशीर स्थितीत पाठीवर झोपावं. सर्व सांधे शिथिल करावेत. शरीरात कुठे ताण जाणवत असेल तर मनानं तिथे नेऊन ते स्नायू शिथिल होत आहेत अशी भावना मनात ठेवा.

प्रार्थना - महामृत्युंजय मंत्र

(पाठ नसल्यास नुसता ऐकावा)

ॐ त्र्यम्बकं यजामहे

सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्

मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

ॐकार मंत्र आहत (प्रत्यक्ष म्हणणे) : ॐचं उच्चारण करताना ध्वनीकंपनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिध्वनीद्वारे मन शरीराशी जुळवून घेतलं जातं. अ-कार, उ-कार, म-कार आणि ॐकार आपली जागरूकता विकसित करण्यास, अधिक कार्यक्षमतेने विश्रांती अनुभवण्यास मदत करतात.

मन एकाग्र करून कंबरेपर्यंतचं शरीर पूर्णतः शिथिल करा. कंबरेच्या खाली जाणवणाऱ्या संवेदना अनुभवा. नाभीवर लक्ष एकाग्र करून तीन वेळा ‘अ’चा उच्चार (अकार) करा. तुमची सजगता वाढवा. शरीराच्या संवेदना जाणा. आता लक्षपूर्वक पोट, छाती, पाठ, खांदे, दोन्ही हात शिथिल करा. हृदयावर लक्ष केंद्रित करून तीन वेळा ‘ऊ’चा उच्चार (‘ऊ’कार) करावा. शरीराच्या मध्य भागात निर्माण होणारे तरंग अनुभवा. लक्ष मस्तकाच्या भागात न्या. तीन वेळा ‘म’चा उच्चार (‘म’कार) करावा. शरीराच्या वरील भागात संवेदना अनुभवा.

सर्व शरीरभर आतून लक्ष फिरवा. कंपनांचा अनुभव घेत तीन वेळा पूर्ण ॐकार म्हणावा. ॐकाराच्या उच्चारामुळे शरीर-मन शांत स्थितीत पोचतं. शरीराची मनाला होणारी जाणीव कमी होत जाते. ‘शरीरापेक्षा माझं अस्तित्व वेगळं आहे’ या जाणीवेतून शवासनात पहुडलेल्या शरीराकडे साक्षीत्वाने पाहत राहावं.

ॐकार मंत्र अनाहत (प्रत्यक्ष तोंडाने न म्हणता, तो उच्चार फक्त मनाने करणे)

दुसऱ्या पायरीप्रमाणेच अ, ऊ, म आणि ॐचा उच्चार प्रत्येकी तीन वेळा; पण मनानेच करावा. या अनाहत अवस्थेत अनुनाद लहरी अनुभवा.

महामृत्युंजय मंत्र

आहत (प्रत्यक्ष म्हणणे)

महामृत्युंजय मंत्र तीन वेळा तोंडाने म्हणावा (किंवा ऐकावा.)

अनाहत (प्रत्यक्ष तोंडाने न म्हणता, तो उच्चार फक्त मनाने करावा)

ॐ च्या अनुनादित लाटा वर येत आहेत. संपूर्ण शरीरात पसरत आहेत. आपण शांत होत चालले आहोत. या शांत स्थितीत काही वेळ डुंबत राहावं.

या प्रक्रियेत आपण अंतर्मुख होतो. मन मौन स्थिती धारण करतं. ही मौन स्थिती अनुभवत राहावी.

मनात खालीलपैकी कोणताही एक संकल्प करावा:

मी सदैव आनंदात आहे; माझ्या सर्व पेशी आरोग्यसंपन्न, निरामय आरोग्याने परिपूर्ण आहेत; माझी रोगप्रतिकार क्षमता अतिशय शक्तिशाली आहे; मी ऊर्जेने परिपूर्ण आहे; चैतन्य हे माझं जन्मजात रूप आहे.

प्रार्थना.

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत

ॐ शांतीः शांतीः शांतीः||

प्रत्येक जण आनंदी, रोगमुक्त असावा. प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा आणि शुभ दिसावं. कोणीही दुःखी नसावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.