‘आहाराबरोबर वेळा पाळणेही आवश्यक’

मी आयुष्यात जिम आणि व्यायामाला कधीच महत्त्व दिलं नव्हतं. पहिल्यापासूनच माझी शरीरयष्टी खूप फिट होती.
Diet and Exercise
Diet and Exercisesakal
Updated on

- नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, अभिनेत्री

मी आयुष्यात जिम आणि व्यायामाला कधीच महत्त्व दिलं नव्हतं. पहिल्यापासूनच माझी शरीरयष्टी खूप फिट होती. मला वाटायचं, की मी फिट दिसते म्हणजे मी खूप फिट आहे. मात्र, हा माझा गोड गैरसमज होता. व्यायामाचे महत्त्व मला खूप उशिरा समजले. माझ्या मैत्रिणीकडून मला वर्कआऊटचं महत्त्व समजलं. दररोज एक तास व्यायाम करणं, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे.

व्यायाम केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील ग्लो नकळत वाढतो. मी सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करते. ब्राह्ममुहूर्तावर मी ध्यानधारणा करते. याचा उपयोग मला अभिनयासह कविता लिखाणासाठी होतो. ध्यानधारणा झाल्यानंतर जिमला जाते. एक ते दीड तास मनापासून व्यायाम करते. जिमला जाण्यापूर्वी आणि जिमवरून आल्यानंतर नाश्ता करते. माझा हा दिनक्रम कधीच चुकवत नाही. 

मी शुद्ध शाकाहारी आहे. रात्री कडधान्य भिजवून ठेवते. मोड आल्यानंतर सकाळी तो नाश्ता म्हणून खाते. त्याबरोबर ड्रायफ्रूट्स खाते. वर्कआऊटवरून आल्यावर दुकानातून पनीर घेऊन येते. सोयाबीनही असते. ज्वारीच्या भाकरीतून कार्ब्ज मिळतात.

मी रात्रीचे जेवण सात ते आठच्या दरम्यान घेते. रात्री साडेदहा वाजता झोपते. त्यावेळी मोबाईल बंद ठेवते. पहाटे साडेपाचला उठते. आठवड्यातील तीन दिवस दररोज तीन ते साडेतीन किलोमीटर पळते; तसेच वॉकही करते. व्यायामात गॅप पडू देत नाही. कारण व्यायामात सातत्य ठेवणे गरजेचे असते. त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो.

मी अभिनेत्रीसह लेखिका आणि कवयित्रीही आहे. अनेक गोष्टी मी लिहिते आणि वाचते. मी शेतकरी कन्या आहे. त्यामुळे संगमनेरला जाताना मी मला आवश्यक असलेल्या गोष्टी घेऊन जाते. तिथे गेल्यानंतर मी खूप आनंदी राहते. तिथे जिम नसले, तरी कार्डिओ करते. सूर्यनमस्कार घालते. भरपूर चालायला जाते. विशेष म्हणजे आमच्या घरातील सर्वजण नियमितपणे व्यायाम करतात. त्यांनाही माझ्यामुळे व्यायामाची आवड लागली आहे.

मी व्यायाम जेवढा आवडीने करते, तेवढ्याच आवडीने स्वयंपाकही करते. आपण आवडीने केलेली गोष्ट चांगलीच होते. व्यायामाबरोबर आहारही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे घरचेच खा; बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. गोड पदार्थ व मैद्याचे पदार्थ आहारातून टाळा. त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स

1) आपण जेवढी मेहनत करू, तेवढा फायदा आपल्याला होतो. त्यामुळे न विसरता आपल्या शरीरासाठी काम करा.

2) दररोज न चुकता एक तास व्यायाम करा. त्यामध्ये सातत्य ठेवा.

3) रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ नियमित पाळा. जेवणाच्याही वेळा पाळा.

4) शाकाहारी असलो, तरी आपल्याला आपली तंदुरुस्ती राखता येते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे पालेभाज्या, फळे आणि कडधान्याचा आहारात समावेश करा.

5) आपण खूप फिट आहोत, असा गैरसमज करून घेऊ नका. दररोज नियमितपणे काही ना काही व्यायाम करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.