International Yoga Day : योगमार्ग सर्वांगीण साधन

जीवनात शुद्ध आनंद मिळविण्यासाठी, प्रगतीसाठी, चैतन्याच्या अनुभवासाठी, अविनाशी आत्म्याची जाणीव निर्माण करण्यासाठी पूर्वकालीन ऋषींनी कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग हे मार्ग सांगितले.
International Yoga Day
International Yoga Daysakal
Updated on

- किशोर विष्णू आंबेकर

जीवनात शुद्ध आनंद मिळविण्यासाठी, प्रगतीसाठी, चैतन्याच्या अनुभवासाठी, अविनाशी आत्म्याची जाणीव निर्माण करण्यासाठी पूर्वकालीन ऋषींनी कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग हे मार्ग सांगितले. आवडत्या मार्गाची साधक निवड करतो. या सर्व मार्गांचे ध्येय शेवटी एकच असते. कोणताही मार्ग निवडला तरी तेथे साधकाला कसोटीला उतरावेच लागते.

आत्मा मुक्त असतो; पण तो मन-बुद्धीच्या प्रभावाने बंधनात अडकतो. आत्मा शुद्ध असतो; पण तो मन-बुद्धिच्या प्रभावाने अशुद्ध होतो. म्हणून सत्याचा शोध आवश्यक ठरतो. आत्म्याच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण इंद्रियसुखांत अडकून पडतो. हे अज्ञान दूर सारण्यासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी आध्यात्मिक साधनेला पर्याय नाही. त्यातच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे. आध्यात्मिक साधनेचे प्रमुख चार मार्ग पुढीलप्रमाणे -

1) कर्ममार्ग : या मार्गावरील साधक इतरांच्या हितासाठी निःस्वार्थ कार्य करणारा असतो. प्रत्येक कर्म हे मनातून निर्माण झालेल्या इच्छेमुळे घडते. म्हणून अनावश्यक गोष्टींचे आकर्षण दूर सारून मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवणारा हा साधक असतो. येथे क्रियाशक्तीची परिपक्वता प्रमुख असते.

2) ज्ञानमार्ग : या मार्गाने जाणारा साधक; नित्य काय आहे, अनित्य काय, याविषयी विवेक निर्माण करतो. आपले जीवन सांसारिक उपभोगांसाठी नसून, ते ईश्वरप्राप्तीसाठीच आहे हे जाणून असा साधक त्यासाठी शरीर, इंद्रिये व मनाला प्रशिक्षित करून, श्रद्धा व समाधान यांच्या आश्रयाने दीर्घकाळ प्रयत्न करतो. येथे बुद्धीची परिपक्वता प्रमुख असते.

3) भक्तिमार्ग : अहंकार बाजूला ठेवूनच परमेश्वराची उपासना व सेवा केली पाहिजे, असे या मार्गात मानले जाते. भक्ती ही शरणागतीमुळे प्राप्त होणारी शुद्ध आनंदाची भावना असते. येथे भावनांची परिपक्वता प्रमुख असते. या मार्गाने जाणारा साधक सर्वत्र भगवंतालाच पहातो.

जे जे भेटे भूत। ते ते मानीजे भगवंत ।

हा भक्तियोग निश्चित। जाण माझा ॥

असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

4) योगमार्ग : या मार्गाने जाणारा साधक मनाच्या वृत्तींचे अवलोकन करून, त्यांचा निरोध करतो, त्यांच्यावर हुकमत आणतो. येथे चित्तशुद्धी आणि चित्ताची अंतर्मुखता प्रमुख असते. मन हेच इच्छा, वासना, आसक्ती, व्यसने इ. आवेगांचे उगमस्थान असते. त्यातूनच आपले विचार उदयाला येतात, स्वभाव निर्माण होतो. हे चारही मार्ग या आवेगांपासून साधकाला अलिप्त करून प्रथम स्थैर्य प्रदान करतात आणि नंतर आत्मसाक्षात्काराकडे जाण्याचा मार्ग दाखवितात.

हे चारही मार्ग एकमेकांना पुरक असतात. ज्ञान हे कर्म आणि भक्तीशिवाय प्राप्त होत नाही. भक्ती ही कर्म आणि ज्ञानाशिवाय साधत नाही. आणि कर्म हे बुद्धी आणि भावनांशिवाय यथायोग्य असत नाही. माणूस हा कर्म, ज्ञान व भक्तीने बनलेला असतो. म्हणजेच तो क्रियाशक्ती, बुद्धिशक्ती आणि भावनाशक्ती यांचा जणू त्रिवेणी संगम असतो. साधकाने कोणताही मार्ग निवडला असला तरी योगाभ्यास त्याला सहाय्यभूत होतो. तो प्रत्येक टप्यावर आवश्यक असतो.

त्याचप्रमाणे योगमार्गात कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा समावेश असतोच असतो. शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय कर्म यथायोग्य होत नाही, ज्ञानाला पूर्णत्व येत नाही आणि भावनांनाही परिपक्वता येत नाही. योगाभ्यासाने शरीर, चित्त आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण केला जातो. शरीर आणि मनाकडे दुर्लक्ष करून, त्यांना डावलून आत्म्यापर्यंत पोहोचता येत नाही. योगमार्ग हा नेहमी कर्म, ज्ञान आणि भक्तिमार्गाला उपकारक ठरतो.

अष्टांगयोग

हात, पाय, वाचा ही क्रियाशक्तीची स्थाने आहेत. मस्तक हे बुद्धी, ज्ञानाचे स्थान आहे. धड हे भावनांचे, वासनांचे स्थान आहे. त्यांच्या व्यवस्थापनासाठी अनुक्रमे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे आहेत. कर्मातील शुद्धतेसाठी; ज्ञानाच्या, विचारांच्या स्पष्टतेसाठी आणि मन, भावनांच्या स्थिरतेसाठी अष्टांगयोग हा चौथा मार्ग. तो कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यांना पायाभूत आहे. प्रत्येकाच्या आवडीनुसार सुरुवातीला एक मार्ग निवडला जातो.

एका मार्गाने पुढे जाताना त्यात इतर मार्गांचाही समावेश असतो. कर्माला प्राधान्य असते तेव्हा ज्ञान आणि भक्ती झाकलेले असतात. ज्ञानाला प्राधान्य असते, तेथे तेव्हा कर्म व भक्ती झाकलेले असतात. जो भक्तीमार्गी आहे त्याच्याबाबतीत कर्म आणि ज्ञान झाकलेले असतात. कोणत्याही एकाचे प्राधान्य असते एवढेच, बाकी काही भेद नसतो. हे सर्व मार्ग एकमेकांत गुंफलेले असतात. ते वेगवेगळे आहेत, असे मानणे ही साधकाची उणीव असते.

योगमार्ग आणि ज्ञानमार्ग

योगमार्गात शरीर, श्वास, मन, बुद्धी, आत्मा यांना एकमेकांना जोडायला शिकवले जाते. त्यांत संतुलन, समतोल, निर्माण करायला शिकवले जाते. नंतर हळूवार, हलका श्वास सोडीत त्यांच्यात शून्यत्व निर्माण केले जाते. त्यातून प्रत्येक पेशीमध्ये जणुकाही अस्तित्वहीनता निर्माण केली जाते. त्यामुळे चेहऱ्याचे स्नायू सैल होतात. ज्ञानेंद्रिय ताणरहित होतात. त्यानंतर मेंदू, जो सतत ज्ञानेंद्रियांच्या संपर्कात असतो तो शांत होतो. मग विचार थांबतात.

योगमार्गामध्ये आसन, प्राणायाम, ध्यान ही साधनेची गुरुकिल्ली असते. त्यांच्या अभ्यासातून ज्ञानमार्गाची पायाभरणी होत असते आणि इमारत उभी राहात असते. अर्थात विवेक, वैराग्य, शांती, समाधान हे ज्ञानमार्गाचे घटक निर्माण होत असतात. दैनंदिन जीवनात आपण जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्ण इतर मार्गांची साधना करतो. असा अभ्यास न करता साधकाच्या साधनेत प्रगती होत नाही. हे योगमार्गातील ज्ञान.

योगाभ्यास करताना आवेश, आवड, प्रेम असावे लागते. त्याशिवाय प्रगती होत नाही. ही योगमार्गातील भक्ती. तुम्ही ज्ञानयोगी असाल; पण शेजारीपाजारी, समाज, सहकारी यांचाबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी नसल्यास या ज्ञानाचा उपयोग काय? तुम्हाला समाजाबद्दल खूप काही करावेसे वाटते, परंतु काय आणि कसे करावे हे कळत नसल्यास त्या भक्तीचा उपयोग काय? अशाप्रकारे हे सर्व मार्ग एकमेकांत असे गुंफलेले आहेत, की त्यांना वेगळे करणे केवळ अशक्य. हेच पतंजलींनी पुढील सूत्रात मांडलेले आहे.

तपः स्वाध्याय ईश्वरप्रणिधानानि क्रियायोगः ॥

(साधनपाद सूत्र १)

तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या तिन्हींनी मिळून क्रियायोग बनतो.

आपल्या उणीवांचे निर्मूलन करण्यासाठी लागणारी कठोर शिस्त, कमालीची स्वच्छता; आपल्या दुर्गुणांची साफसफाई करण्यासाठी लागणारी ज्वलंत इच्छा, ओढ म्हणजे तपस् होय. ‘तपस्’चा निर्देश तापणे, तापवणे, अग्नीप्रक्रिया करणे यावर असतो. क्षणाक्षणाला आपल्या क्षणभंगुर इच्छा, वासनांची राख करायला पाहिजे. त्यासाठी आपण जे करतो तो क्रियायोगातील कर्ममार्गाचा भाग असतो. भगवद्‍गीता आंतरकुंभक आणि बाह्यकुंभकाला यज्ञ, शरणागती किंवा श्वासाचं शरीराच्या अग्नीत केलेले हवन असे म्हणते. पतंजलींप्रमाणे ते तप असते.

आपल्या शुद्धीसाठी काही शिस्त निर्माण केल्यानंतर शरीरापासून आत्म्यापर्यंत स्वतःला समजून घेणे म्हणजे स्वाध्याय. यातून आपल्याला मनाची विचार करण्याची पद्धत आणि मनाचे बरे-वाईट पण लक्षात येते. योग्य मन कोणते व अयोग्य मन कोणते याची जाण निर्माण होते. म्हणून स्वाध्याय हा स्वतःचा पुनर्शोध असतो.

कर्ममार्गाची व्याख्या

भगवंताची अनन्यभक्ती म्हणजे ईश्वरप्रणिधान. शरीराचे अंतर्बाह्य शौच साधल्यानंतर व संपूर्ण मनाची, मनाविषयी जाणीव संपादन केल्यानंतरच अशी संपूर्ण शरणागती शक्य असते. हा क्रियायोगातील भक्तिमार्गाचा भाग असतो. पतंजलींनी राजयोग असा शब्द वापरलेला नाही. त्यांनी केवळ क्रियायोग असा शब्द वापरलेला आहे. क्रिया म्हणजे साधना किंवा सराव. या क्रियेमध्ये कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यांचा समावेश असतो आणि ती साधना अष्टांगयोगाची असते. योगसूत्रांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास हे लक्षात येईल, की यम, नियम, आसन, प्राणायाम हा कर्ममार्ग आहे.

समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात

(समाधिपाद सूत्र ४५)

अर्थात, अनन्यभक्तीमुळे समाधिसिद्धी प्राप्त होते. या सूत्रावरून समाधि हाच भक्तिमार्ग आहे हे स्पष्ट होते.

त्याचप्रमाणे ‘योगांगानुष्ठानात् अशुद्धीक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्याते:’ (समाधिपाद सूत्र २८) या सूत्रावरून हे स्पष्ट होते, की नियमित योगाभ्यासाने अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाची पहाट होते. म्हणजेच तो ज्ञानमार्ग असतो.

स्वात्मारामांच्या हठयोग प्रदिपिकेमध्ये

एक संवाद आलेला आहे. तो पुढीलप्रमाणे -

प्रश्न - इंद्रियांचा राजा कोण?

उत्तर - मन.

प्रश्न - मनाचा राजा कोण?

उत्तर - श्वास.

प्रश्न - श्वासाचा राजा कोण?

उत्तर - मज्जा (मज्जासंस्था)

त्यानंतर लय या शब्दाचा उल्लेख आहे. लय म्हणजे ध्यानमग्नता आणि संगीतातील लय. सर्वसामान्य साधकाला अशा ध्यानमग्नतेचा अनुभव केवळ मज्जासंस्थेवर नियंत्रण आणूनच येतो. त्यामुळे मन नियंत्रणात येते. मन नियंत्रणात आल्यास इंद्रिये नियंत्रणात येतात, अंतर्मुख होतात. श्वासाचे नियमन मज्जासंस्थेच्या ताकदीवर व सहनशक्तीवर अवलंबून असते. म्हणून मज्जासंस्थेमध्ये प्राणशक्तीचा प्रवाह लयबद्ध असावा लागतो.

पतंजली क्रियायोगात कर्म, ज्ञान, भक्ती या तीनही मार्गांचा समावेश करतात. याचा अर्थ, त्या क्रिया करणे आवश्यक असते. ते तपस, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या तिन्हींना लागू आहे. म्हणजेच, कर्म ही क्रिया असते. ज्ञान ही क्रिया असते आणि भक्तीसुद्धा क्रियाच असते. यातून योगाची प्रात्यक्षिकता, व्यावहारिकता दिसून येते. म्हणजे योग हा केवळ सैद्धांतिक नाही, हे कळते. अशाप्रकारे योगमार्ग हा सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि बहुआयामी अशी साधना आहे. ती जीवनाच्या सर्व अंगांचा विचार करणारी व मानवी जीवन खऱ्या अर्थाने संपन्न करणारी साधनप्रणाली आहे.

(लेखक योगशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.