आई 9 महिने बाळाला आपल्या पोटात ठेवते आणि या नऊ महिन्यांत बाळाच्या सर्व पोषणाच्या गरजा आईच्या आहारातून पूर्ण होतात. बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच शक्य असल्यास नाळ कापण्याआधीच स्तनपान सुरू करणे आवश्यक आहे. स्तनपान आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे सर्वज्ञात आहे. आईचे दूध हे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व पोषण देते.
बाळ जसजसे वाढत जाते, तसतसे स्तनपान करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत जातो. बाळाच्या वाढत्या वयानुसार आवश्यक पोषण द्रव्ये त्याला प्राप्त होण्यासाठी आईच्या दूधामध्येही आवश्यक ते बदल होतात. त्यामुळे बाळ अगदी सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याच्या शारीरिक आणि विकासात्मक वाढीसाठी सर्व पोषण त्याला आईच्या दूधातून मिळत असते.
स्तनपानामुळे आईला व बाळाला कसा फायदा होतो हे जाणून घेऊ या मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या कन्स्लटंट स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अनू विज यांच्याकडून.
स्तनपान बाळाच्या आरोग्यसाठी महत्त्वपूर्ण
बाळाला कोणत्याही विषाणूजन्य आजाराची बाधा झाल्यास त्यापासून रक्षण करण्याचे गुणधर्म आईच्या दुधामध्ये असतात. त्यामुळे बाळ आणि आई दोघांचेही विविध विषाणू आजारांपासून संरक्षण होत असते. मातेच्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारे दूध हे आरोग्यदृष्ट्या स्वच्छ आणि योग्य तापमानाचे असते.
तसेच स्तनपान सुरू असलेल्या बालकांना अस्थमा, स्थूलपणा, टाईप १ मधुमेह, अचानक होणारे संभाव्य मृत्यू (सडन इन्फंट डेथ सिन्ड्रोम) इत्यादी आजारांची बाधा होण्याची शक्यता फारशी नसते. तसेच या बालकांना कानाचे संसर्ग, बॅक्टेरिअल मॅनेनजायटिस होण्याचा धोकाही फारसा नसतो.
त्याची दृष्टीही सक्षम असते आणि रॅटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी आजाराची लागण होण्याची शक्यता फारशी नसते. आईच्या दुधामुळे तयार झालेल्या नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्तीमुळे अतिसार, बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाचे अन्य आजार होण्याचीही शक्यता फारशी नसते.
या बालकांना रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे न्युमोनिया, रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस आणि डांग्या खोकला अशा आजारांसह साधा सर्दी, खोकल्यापासूही त्यांचे रक्षण होण्यास मदत होते.
मातेसाठीही स्तनपान आरोग्यदायी
स्तनपान जसे बालकाच्या दृष्टीने फायदेशीर आहे, तसेच मातेलाही याचे काही फायदे निश्चितच आहेत. स्तनपानामुळे मातेला स्तनाचा किंवा अंडाशयाचा कर्करोग, टाईप २ मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता कमी होते. प्रसूतीनंतर मातेचे वजन कमी करण्यासाठी स्तनपानदेखील महत्त्वाचे काम करते.
आईच्या शरीरामध्ये दूध तयार करणे आणि स्तनपान करणे यामुळे दरदिवसाला जवळपास ५०० अतिरक्त कॅलरी खर्च केल्या जातात. स्तनपानामुळे मातेच्या शरीरात गर्भाशय आकुंचन पावण्याची प्रक्रिया वेगाने होण्यास मदत होते, ज्यामुळे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होण्यास फायदा होतो.
स्तनपान करणाऱ्या मातेला मूत्रमार्गाचा संसर्ग, ऍनिमिया, प्रसूतीनंतर येणारे नैराश्य इत्यादी आजारांची बाधा होण्याची शक्यता फारशी नसते. तसेच या महिलांना रजोनिवृत्तीच्या काळातही ऑस्टिओपोरॅसिस होण्याची शक्यता कमी असते.
स्तनपान करणाऱ्या माता त्यांच्या लहान मुलांचे संकेत वाचण्यास शिकतात आणि बाळाचेही आईबाबतचा विश्वास दृढ होत जातो. आयुष्याच्या पहिल्या वर्षांमध्ये स्नेहपूर्ण बंधनामुळे मुले आणि पालकांमधील सामाजिक आणि वर्तनविषयक समस्या कमी होण्यास मदत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.