पर्यायी पद्धतींचं ज्ञान आणि उपयुक्तता

मागील लेखामध्ये आपण पर्यायी आणि पारंपरिक औषधोपचार पद्धतींना मिळालेली जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आणि त्यांचं वाढत चाललेलं महत्त्व पाहिलं.
Ayurveda
Ayurvedasakal
Updated on

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

मागील लेखामध्ये आपण पर्यायी आणि पारंपरिक औषधोपचार पद्धतींना मिळालेली जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आणि त्यांचं वाढत चाललेलं महत्त्व पाहिलं. खरं तर आपल्यापैकी अनेकांची अल्टर्नेट पॅथींबद्दल विविध मतं आहेत, काहींचा दृढ विश्वास आणि चांगला अनुभव आहे, तर काहींना ते बोगस किंवा निरुपयोगी वाटतात किंवा त्यांना चांगला अनुभव आला नसेल.

माझ्या अनुभव आणि अभ्यासानुसार, अल्टर्नेट पॅथीजदेखील शास्त्रशुद्ध आणि आरोग्यासाठी लाभदायकही आहेत. परंतु, दुर्दैवानं या शास्त्रांची सखोलता आणि कार्यक्षमता पूर्णपणे शिकून त्याची योग्य प्रॅक्टिस आणि संशोधन करणाऱ्या डॉक्टरांचं, शास्त्रज्ञांचं व दवाखान्यांचं प्रमाण खूप कमी आहे.

त्यांना उपलब्ध असणाऱ्या आर्थिक, धोरणात्मक व इतर साधनांचं प्रमाण तुटक आहे! (या व अशा अनेक कारणांमुळे) मॉडर्न मेडिसीनइतक्या विश्वासार्ह आपल्याला या पॅथीजचा अनुभव कदाचित आला नसेल, कारण आजही जगातील ऐंशी टक्के लोक हे पर्यायी आणि पारंपरिक औषधोपचाराचा वापर करू पाहत आहेत, त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही!

या सर्व पद्धतींना जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) टीसीआय (पारंपरिक, पूरक आणि एकत्रित औषधोपचार) या श्रेणीमध्ये सामावून घेतलं आहे. या श्रेणीमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, चायनिज मेडिसिन, ॲक्युपंक्चर, ओस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिस (हाडवैद्य) वनौषधी, निसर्गोपचार, युनानी मेडिसीन या नऊ पॅथीजचा समावेश आहे.

जुनाट आजारांशी लढण्यासाठी आपण पर्यायी पद्धती वापरायच्या ठरवल्या आहेत; परंतु त्यांचं ज्ञान आणि त्यांची उपयुक्तता यांची माहिती असणं महत्त्वाचं आहे. अल्टर्नेट मेडिसिनला साइड इफेक्ट नसतात हा मोठा भ्रम आहे आणि योग्य प्रॅक्टिसमुळे आपल्याला फायदा होतो; तसंच चुकीच्या प्रॅक्टिसमुळे नुकसानसुद्धा होऊ शकतं!

पॅथी म्हणजे नेमकं काय?

ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी या सर्वांमध्ये पॅथी हा उत्तरार्धातला शब्द आहे. मूळच्या ग्रीक भाषेतील ‘पॅथोस’ शब्दाचा अर्थ त्रास किंवा आजार. या त्रासाशी कशा प्रकारे लढलं जात आहे तो शब्द (ॲलो, होमिओ इत्यादी) पूर्वार्धात येतो. प्रत्येक पॅथीचे मूळ सिद्धांत, उगम, मानवी रचनेकडे बघण्याचा दृष्टिकोन, औषध बनवण्याची प्रक्रिया, त्याचा उपयोग, या सर्व गोष्टी भिन्न आहेत.

आपण पुढील लेखांमध्ये या पॅथीजचे फायदे, चुकीच्या पद्धतीनं औषधोपचारामुळे आढळणारं नुकसान, पाळायचे नियम आणि इतर अनेक गोष्टी पाहणार आहोत. थोडक्यात काय, जसं आपल्याला व्हिटॅमिन डी कमी असल्यावर काय होतं हे माहिती आहे; तसंच पारंपरिक प्रणालीप्रमाणं शरीरातील पित्त जास्त झाल्यास काय लक्षणं दिसतात हेही समजू लागलं, तर कोणत्या जुनाट आजारानं ग्रासले जाण्याची शक्यता नक्कीच कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.