- डॉ. मालविका तांबे
आयुष्यातील सगळ्यांत महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तारुण्य. तारुण्य अर्थात उत्साह, काहीतरी नवीन करण्याची इच्छाशक्ती, धाडस व नसांमध्ये सळसळणारे रक्त. आयुर्वेदात हा काळ पित्तदोषाच्या अधीन सांगितलेला आहे. पित्तदोष म्हणजे अग्नी अर्थात सृजनात्मकता, नवीन काही तरी करण्याचा निर्धार तसेच बाहूंमध्ये-मनामध्ये ताकद.
प्रत्येक जुनी पिढी येणाऱ्या तरुण पिढीला काहीतरी चांगले द्यावे अशा प्रयत्नांत असते. सध्या तर जीवनाचे राहणीमान उंचावलेले आहे. आजूबाजूचे वातावरण सगळ्यांना पोषक आहे. रोज नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होते आहे. आरोग्याप्रती वेगवेगळ्या स्तरांवर जागरूकता निर्माण होताना दिसते आहे. हे सगळे असतानाही नवीन पिढी मात्र कमकुवत होताना दिसते आहे.
१९४५ नंतर जन्म घेतलेल्या लोकांमध्ये स्वास्थ्याची पातळी आधीच्या पिढीपेक्षा खालावलेली आहे असे एका संशोधनात आढळून आलेले आहे. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही आज पणाला लागलेले आहे. अकाली केस पांढरे होणे.
अकाली टक्कल पडणे, कंबर दुखणे, त्वचा काळवंडणे वगैरेंसारख्या छोट्या त्रासांबरोबरच स्थौल्य, हॉर्मोन्सचे असंतुलन, पाळीचे विकार, मधुमेह, थायरॉइड, नैराश्य, अतिचिंता वगैरेंसारखे मोठे आजारही सध्याच्या तरुण पिढीत दिसतात. या सगळ्या आजारांचे मूळ आपल्याला विकृत अग्नी अर्थात पित्तात दिसते.
अग्नीला संतुलित ठेवायचे असले तर सगळ्यांत महत्वाचे असते ते म्हणजे अन्न. सध्याच्या काळात आहाराची वेगवेगळी फॅड्स बघायला मिळतात. तूप, साखर, लोणी, गहू इत्यादींसारख्या पोषक पदार्थांना सध्या व्हिलन्स मानले जाते. त्यांच्याबद्दल समाजात खूप चुकीचा प्रचार चाललेला आहे.
अगदी लहान वयापासूनच मुले दूध, तूप, साखर अशा पोषक वस्तूंपासून लांब राहतात. त्याचबरोबरीने सतत बाहेर खाणे, फास्ट फूड वगैरे चुकीच्या गोष्टी पोटात जात राहतात. त्यामुळे शरीराला आवश्यक ती पोषक द्रव्ये मिळत नाहीत कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, मिनरल्स यांची शरीराला व्यवस्थित पूर्ती झाली नाही तर शरीरात अग्नीचे कार्य व्यवस्थित होत नाही, जेणेकरून शरीरात आवश्यक ते नवीन धातू तयार होत नाहीत.
गाईचे दूध, लोणी, तूप नको असे जेवढे सध्याच्या काळात सांगितले जात आहे, तेवढेच मुलांच्या दातांचे आरोग्य खालावत जात आहे, केस पांढरे होणे, कंबर दुखणे, स्नायूंमध्ये ताकद कमी असणे ही सुद्धा, शरीरात धातू कमी होण्याची लक्षणे होत.
तरुणाईत आहाराची घेतलेली काळजी ही म्हातारपणाकरिता फिक्स डिपॉझिटसारखी काम करते. आहारात तूप, दूध, लोणी, गहू, नाचणी, राजगिरा, फळभाज्या, पालेभाज्या, सर्व प्रकारची मोसमी ताजी फळे, साखर, गूळ, कडधान्ये, तीळ, जवस, वगैरेंचा वापर नियमितपणे केला पाहिजे.
डिंकाचे लाडू, अहळिवाचे लाडू, च्यवनप्राश, चैतन्य-शतावरी-स्त्रीसंतुलन हे कल्प, मॅरोसॅन वगैरेंसारखे रसायन नियमितपणे वापरात ठेवायला हवे, ज्यामुळे शरीरात रसधातूची पुष्टी होऊन पुढचे धातू व्यवस्थित तयार व्हायला मदत मिळेल. पचनाच्या दृष्टीने संतुलन अन्नयोग, संतुलन पित्तशांत वगैरेंसराखी अग्नीला मदत करणारी औषधे घेणे उत्तम.
सध्या तरुणाईसमोर दिसणारे सगळ्यांत मोठे आह्नान आहे ते सोशल मीडिया व स्क्रीन टाइम. संगणक, मोबाइल वगैरे गोष्टी आयुष्यात आल्यामुळे सध्याची पिढी ही वेल इन्फॉर्ड पिढी आहे असे म्हटले जाते. कुठलीही शंका मनात आली की क्षणात त्याचे उत्तर किंवा विकल्प समोर दिसतो, पण हे एक खोटे जग आहे याचे भान सध्या राहत नाही असे दिसते.
दिवसातील बराच काळ स्क्रीनकडे पाहण्यात घालवल्यामुळे बरेच वेगवेगळे त्रास होताना दिसू लागतात. अशांत झोप, स्थौल्य, पाळी लवकर येणे, हॉर्मोन्सचे असंतुलन तसेच डोळ्यांवर ताण येणे, उष्णता वाढणे, चष्मा लागणे, मानसिक ताण, नैराश्य, स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे, चिंता वगैरे सगळे त्रास सोशल मीडियाच्या अति वापरामुळे मुलांमध्ये दिसतान दिसतात. एका ठिकाणी बसून राहण्याने शरीराची पचनशक्ती मंदावते.
या सगळ्यांतून बाहरे निघण्याकरिता सर्वप्रथम मुलांनी स्क्रीनकडे किती बघावे याची मर्यादा ठरविणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरीने मुलांना व्यायामाचे महत्त्वही पटवून देणे गरजेचे आहे. किमान पाऊण ते एक तास मुलांनी व्यायाम व योगसाधनेसाठी दिला पाहिजे.
प्राणायाम, सूर्यनमस्कार, भस्रिका, वेगवेगळी आसने, चालणे, मैदानी खेळ खेळणे हे मुलांनी नियमित केले पाहिजे. शक्य झाल्यास पोहणे, सायकल चालवणे, आपल्या आवडीचा एखादा खेळ नियमितपणे खेळणे अत्यंत आवश्यक असते. तसेच ताण, चिंता कमी करण्यासाठी चांगले संगीत ऐकणे, दीपध्यान करणे, एखादा छंद जोपासणे हे चांगले. शक्यतो लहान मुलांना सुरुवातीपासून पुस्तके वाचण्याची सवय लावावी.
पुस्तके वाचली तर मनावर चांगले संस्कार होतात व डोळ्यांवर येणारा ताण कमी व्हायला मदत मिळते. मुलांना संतुलन ब्रह्मलीन सिरप, संतुलन ब्रह्मलीन सिरप, संतुलन ब्राह्मी घन वटी देण्याबरोबर टाळूवर संतुलन ब्रह्मलीन तेल लावणे, पायाला पादाभ्यंग करणे, डोळ्यांमध्ये सुनयन तेल व आयुर्वेदिक अंजन घालणे या गोष्टी नियमितपणे करायला शिकवणे आवश्यक आहे.
पूर्वी लहान मुलांकडूल रोज स्तोत्र म्हणून घ्यायची पद्धत होती. यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता, एकाग्रता, मन शांत होणे हेही फायदे होत असत. असा कुठलातरी उपक्रम मुलांसाठी करण्याचा प्रयत्न नक्की करावा.
सध्या मुलांना कळत नकळत बऱ्याच रासायिक द्रव्यांना सामोरे जावे लागते. व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचा मारा त्यांच्यावर लहानपणापासूनच होत असतो. जरा काही त्रास झाला की लगेच अँटिहिस्टॅमिन, अँटिबायॉटिक वगैरे रासायनिक औषधांचा वरचेवर उपयोग केला जातो.
जलप्रदूषण वायुप्रदूषण हे तर स्वास्थ्य बिघडवत आहेतच, त्याचबरोबरीने रासायनिक द्रव्ये बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातूनसुद्धा आरोग्यासाठी अहितकर ठरत आहेत, उदा. टूथपेस्ट, सोडा व इतर शीतपेये यांच्यात टाकलेली प्रिझर्वेटिव्हज्, तयार खाद्यपदार्थ बनविताना वापरलेले घटकपदार्थ उत्पादित करताना वापरलेली खते, त्याचबरोबरीने तरुण पिढीकडून नियमित वापरण्यात येणाऱ्या पर्फ्युम, डिओडरंट, मेक-अपचे साहित्य, केस रंगविण्यासाठी वापरण्यात येणारे डाय यांसारख्या गोष्टींद्वारे तरुणांच्या स्वास्थ्यावर रासायनिक हल्ला होत आहे.
या सगळ्यांचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. अनैसर्गिक वस्तूंपासून शक्यतो लांब राहणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे सेंद्रिय अन्नधान्य, नैसर्गिक उत्पादनांचे महत्त्व मुलांना शिकवले पाहिजे. याचबरोबरीने वाय-फाय, हाय स्पीड इंटरनेट, मायक्रोवेव्ह, लेसर वगैरेंपासून सावधगिरी बाळगणे मुलांना शिकवले पाहिजे.
अग्नीच्या संतुलनाकरिता रात्री वेळेवर झोपणे, सकाळी वेळेत उठणे, दिनचर्येचे पालन करणे या गोष्टींचे महत्त्व आजच्या मुलांना शिकवणे आवश्यक आहे.
आजची नवीन पिढी संवेदनशील आहे, नव्या गोष्टी शिकायला तयार आहे, पण त्यांचा भौतिकतेकडे वाढत चाललेला कल कमी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवणेही आपल्यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून ही तरुण पिढी सशक्त राहायला मदत होऊ शकेल. समाजाला पुढे नेण्याचे दायित्व तरुणाईच्या खांद्यांवर असते. या खांद्यांना सक्षम करणे अत्यंत आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.