प्रश्र्न १ - माझे वय ५२ वर्षे आहे. २-३ वर्षांपासून मला रजोनिवृत्तीचा त्रास होतो आहे. शरीरात हॉट फ्लशेस जाणवत राहतात, तसेच सूर्याची ॲलर्जी आहे असे डॉक्टरांनी सांगितलेले आहे. संपूर्ण अंगावर काळे चट्टे उठतात व जळजळही होते. त्वचेचा जो भाग सूर्याच्या संपर्कात येत नाही तेथे या प्रकारचा त्रास होत नाही. चेहऱ्यावर वांग वाढत चाललेले आहेत. यावर कृपया उपचार सुचवावा.
- प्राजक्ता रणदिवे, सोलापूर
उत्तर - रजोनिवृत्ती येण्याच्या काळात हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरात पित्तदोषाचे असंतुलन व्हायला लागते. त्यामुळे पित्त कमी होण्यासाठी प्रवाळपंचामृत, अविपत्तिकर चूर्ण वगैरे घेण्याचा फायदा होऊ शकेल, त्याचबरोबरीने रक्तशुद्धीसाठी महामंजिष्ठादी काढा व अनंत कल्प नक्की घ्यावे. हॉर्मोन्सच्या संतुलनासाठी नियमितपणे संतुलन फेमिसॅन सिद्ध तेलासारख्या तेलाचा पिचू योनीभागी ठेवणे सुरू करावे. संतुलनचे कूलसॅन सिरप नियमित घेण्याचा फायदा होऊ शकेल.
रोज रात्री झोपताना संतुलन पादाभ्यंग घृतासारख्या एखाद्या घृताने काशाच्या वाटीने पादाभ्यंग करावे. बाहेरच्या गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्या. तसेच सिमला मिरची, वांगे, गवार, कोबी, फ्लॉवर वगैरे गोष्टी खाण्यातून कमी केलेल्या बऱ्या. दहा दिवसांतून एकदा तरी १० मिली एरंडेल आल्याच्या चहाबरोबर रात्री झोपताना घ्यावे, यामुळे शरीरातील पित्ताचे रेचन होऊन त्रास कमी व्हायला मदत होऊ शकेल. अशा त्रासामध्ये संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो.