‘मानसिक आरोग्यही महत्त्वाचे’
‘मानसिक आरोग्यही महत्त्वाचे’sakal

‘मानसिक आरोग्यही महत्त्वाचे’

माझ्या मते, तुम्ही किती स्लिम किंवा भारी आहात, तुमचे वजन कमी आहे की जास्त, या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही. फिटनेस चार गोष्टींवर ठरतो - स्ट्रेंथ, स्टॅमिना, फ्लेक्सिबिलिटी आणि एंड्युरन्स.
Published on

फिटनेस

नेहा जोशी,अभिनेत्री

माझ्या मते, तुम्ही किती स्लिम किंवा भारी आहात, तुमचे वजन कमी आहे की जास्त, या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही. फिटनेस चार गोष्टींवर ठरतो - स्ट्रेंथ, स्टॅमिना, फ्लेक्सिबिलिटी आणि एंड्युरन्स. आपण ऊर्जावान असलो, तर दिवसभराच्या कामानंतर शरीर आणि मन कितीही थकलं असलं तरी थोड्या वेळानं पुनरुज्जीवित होतं. माझ्यासाठी फिटनेस म्हणजे ऊर्जावान, शांत आणि आनंदी वाटणं आहे.

मी सुरुवातीपासून फिटनेस फ्रीक नव्हते. माझे वडील व्यायाम कर, योगा कर, असं मला अनेक वर्षं सांगत होते; पण मी वर्कआउटसाठी आळशी असायचे. मात्र, लॉकडाऊनमध्ये आपण २४ तास घरातच असायचो, तेव्हा वर्कआउटची खूप गरज वाटली. कारण कुठेही येणं-जाणं नव्हतं आणि मानसिक शांतीसाठी एक फोकस असणं गरजेचं होतं. तेव्हा मी ऑनलाइन क्लास जॉइन केला आणि सुमारे दीड वर्षं ऑनलाइन योगा क्लास केला. माझा एक तासाचा क्लास आठवड्यात पाच दिवस असायचा. आता व्यायामासाठी नियमित वेळ काढणं कठीण होतं; पण तरीही मी आठवड्यात किमान चार दिवस योगा जरूर करावं, यासाठी पूर्ण प्रयत्न करते

मी सध्या ‘ॲण्‍ड टीव्‍ही’वरील ‘अटल’ या मालिकेमध्‍ये कृष्‍णादेवी वाजपेयींची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणामुळे जास्त वेळ मिळत नसेल तर सूर्यनमस्कार आणि स्ट्रेचिंग नक्की करते.

मला वाटतं, की फिटनेसच नाही, तर कोणत्याही कामात चांगले परिणाम मिळवण्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही तीस मिनिटं स्ट्रेचिंग किंवा सूर्यनमस्कारसुद्धा नियमित केल्यास तुम्हाला कधीही ऊर्जेची कमतरता वाटणार नाही. नियमित वर्कआऊट केल्यानं हवामानातल्या बदलांसारख्या छोट्या-छोट्या कारणांनी तुम्ही आजारी पडणार नाही. कन्सिस्टन्सीनं वर्कआऊट करण्याचे हे अतिरिक्त फायदे आहेत.

व्यायाम, योगासनांबरोबरच आहारही समतोल असायला हवा. हेल्थ एक्स्पर्ट्‌सच्या मते, निरोगी-फिट राहण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायामासोबत बॅलन्स्ड डाएट घेणंही गरजेचं आहे. तुम्ही खूप वर्कआऊट करत असाल; पण योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत पोषणयुक्त आहार घेत नसाल तर व्यायामाचे परिणाम मिळणार नाहीत. मला वाटतं, की आपला भारतीय आहार ज्यात डाळ, भात, रोटी, भाजी, रायता, सॅलड असतं, तो बॅलन्स्ड डाएट आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे.

फिटनेसचा संबंध शरीर, फिगर आणि वजनापेक्षा मनाशी जास्त आहे. त्यामुळे संपूर्ण फिटनेससाठी शरीराच्या वर्कआऊटसह मनाचंही वर्कआऊट करणं आवश्यक आहे.

तुम्ही अस्वस्थ असाल, तर डॉक्टरांकडे जावं किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मन हलकं करावं.

शरीराप्रमाणंच मनही निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्यच शरीराला निरोगी ठेवतं. त्यामुळे शरीराप्रमाणेच मनावरही लक्ष देणं खूप आवश्यक आहे.

सात्त्विक आहार आणि सीझनेबल फळं घेतल्यास आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक घटक मिळतात. त्याचा अवलंब प्रत्येकानं करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.