ध्यानधारणेने करा मन प्रसन्न

पतंजलींचा योगासूत्रांमध्ये लिहिलेले आहे, की यम-नियम, आसन-प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगाचे आठ प्रकार आहेत.
actress swarda thigale
actress swarda thigalesakal
Updated on

- स्वरदा थिगळे, अभिनेत्री

पतंजलींचा योगासूत्रांमध्ये लिहिलेले आहे,  की यम-नियम, आसन-प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगाचे आठ प्रकार आहेत. ते सगळं फॉलो केल्याने आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होतो. ती तंदुरुस्ती कायम राहावी यासाठी या गोष्टी नियमितपणे करणे गरजेचे आहे.

फक्त एक दिवस प्राणायाम किंवा योगासनं केल्यानं तेवढ्या वेळेपुरताच आराम मिळेल; पण हा सराव सातत्यानं केला, तर ताणतणाव येणार नाही, वजन व्यवस्थित राहील, पचनशक्ती सुधारेल. 

शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मी रोज प्राणायाम, अनुलोम-विलोम किंवा भस्रिका करते. भस्रिकाला योग कॉफीही म्हणतात. तुम्ही सकाळी उठता, तेव्हा एक कप कॉफी पिण्यापेक्षा तर तुम्ही फक्त भस्रिका केली तरी तुम्हाला तेवढीच ऊर्जा मिळते. यानंतर मी माझ्या आसनांना सुरुवात करते. आसनांच्या वेळी मी मंत्रोच्चारण करते. मंत्रोच्चारांनी व्हायब्रेशन्स होतात, तुमच्या अंगाभोवती एक वलय तयार होतं, चांगली वातावरणनिर्मिती होते.

हीच ऊर्जा आपल्याभोवती तयार होते आणि  जेव्हा इतर लोकसुद्धा तुम्हाला भेटतात, त्यांनाही ती सकारात्मकता जाणवते. मी जिमलासुद्धा जाते; कारण  कार्डिओ करायचे असेल, वेट ट्रेनिंग एक्सरसाईज करायचे असेल किंवा चरबी कमी करायची असेल, तर त्यासाठी जिमच गरजेची आहे. तुम्ही आठवड्यातून तीन दिवस जिम व बाकीच्या दिवशी योगासनं करू शकता.

योगासनं करण्यासाठी मला सकाळी साडेपाच वाजता उठावे लागते. सहा ते सव्वासातपर्यंत मी योगासनं करते. साडेसातला मी नाश्ता करते. दुपारी एक वाजता जेवण करते. अकरा-साडेअकराच्या दरम्यान आवळा ज्यूस किंवा चहा, कॉफी किंवा मिक्स फ्रूट ज्यूस असा सात्त्विक आहार पोटात जाण्याचा प्रयत्न करते.

संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान जेवण करते. साडेसातनंतर मी काही खात नाही. सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती  कमी होते. सकाळी जितके लवकर उठाल तेवढं तुमच्या जठराचं काम सुरू होईल, तेवढ्याच लवकर तुमच्या शरीरामधील वाईट घटक  व्यवस्थित बाहेर पडतील आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होईल.

तंदुरुस्त आरोग्यासाठी...

  • सध्याच्या पिढीचा दिनक्रम फार बदलला आहे. आपल्याला जेवायला साडेनऊ-दहा वाजतात आणि झोपायला बारा आणि एक वाजतो. त्यात सकाळी आपण आठ वाजता उठतो आणि लगेचच खातो. त्यामुळे शरीराला व पचनक्रियेला विश्रांती मिळत नाही. हा दिनक्रम चुकीचा आहे.

  • तुम्ही सकाळी साडेपाच वाजता उठला आणि लवकर झोपला, तरी तुमची कामं होऊ शकतात. तुम्हाला तेवढा तो दिवस मिळतो. त्यामुळे वजन कमी-जास्त होणं, केस गळणं, चेहऱ्यावर किंवा शरीरावर पट्टे येणं, ताणतणाव येणं या कुठल्याच गोष्टीला सामोरे जावे लागणार नाही. जीवनशैली खूप आरोग्यदायी आणि तंदुरुस्त होईल.

  • तुम्ही योगाचे आठ प्रकार दररोज मनापासून केले, तर सकारात्मकता, ऊर्जा, ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

  • चांगली जीवनशैली आत्मसात करा. चांगलं खा. पौष्टिक पदार्थ व फळे खा. बर्गर, पिझ्झा, पास्ता टाळा.

  • सात्त्विक आहारावर भर द्या.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.