Monsoon Child Care Tips : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने धूमाकूळ घातला आहे. पुढील ३-४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी या दमदार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे.
या दिवसांमध्ये आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. खास करून लहान मुले आणि वयोवृद्ध यांच्यावर पावसाळ्यात विशेष लक्ष ठेवावे लागते. कारण, या दिवसांमध्ये लहान मुले आणि वयोवृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
त्यामुळे, त्यांना लगेच संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे, ते विविध आजारांना बळी पडू शकतात. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी लहान मुलांची खास काळजी घ्यायला हवी. त्यासाठीच्या काही सोप्या टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पावसाळ्यात वातावरणातील तापमान कधी वाढते तर कधी कमी होते. कधी वातावरणात उष्णता असते तर कधी थंडावा असतो. या बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शिवाय, याच दिवसांमध्ये डासांची पैदासही मोठ्या प्रमाणात होते.
त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मुलांना हलके परंतु, संपूर्ण अंग झाकणारे कपडे घाला. त्यांना खास करून सुती कपडे घालायला द्या. यामुळे, त्यांच्या शरीराचे संरक्षण होईल.
या दिवसांमध्ये वातावरणातील थंडाव्यामुळे आणि पावसामुळे सर्दी, खोकला आणि तापाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना लगेच या फ्लूचा संसर्ग होतो. तसेच, डायरिया, डेंगू आणि मलेरियाचा ही धोका वाढतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये पालकांनी लहान मुलांचे अवश्य लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून ते कोणत्याही संसर्गांना बळी पडणार नाहीत.
पावसाळ्याच्या दिवसात लहान मुलांना रोज अंघोळ घाला. हे अतिशय महत्वाचे आणि गरजेचे आहे. अंघोळीपूर्वी लहान मुलांची कोमट तेलाने मालिश केल्यास अधिक उत्तम त्यानंतर त्यांना अंघोळ घाला. खराब वातावरण असेल तर शक्यतो गरम पाण्यानेच मुलांना आंघोळ घालावी.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे, घराची व्यवस्थित स्वच्छता करा आणि घराजवळ किंवा आसपास पावसाचे पाणी साचू देऊ नका. कारण, या पाण्यात डेंगू, मलेरियासारख्या डासांची पैदास होते.
त्यामुळे, पाणी अजिबात साचू देऊ नका. तसेच, खोलीत मच्छरांपासून बचाव करणारे लिक्विड, अगरबत्ती यांचा वापर करा. रात्री झोपताना मुलांच्या खोलीत मच्छरदाणीचा वापर करा जेणेकरून मुलांचे मच्छरांपासून संरक्षण होऊ शकेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.