Music Health : संगीतातील राग, बरे करतात मानसिक आजार

संगीत चिकित्सा पद्धती ; वेळ, रुग्णाच्या मानसिक स्थितीनुसार वापर
Music Health
Music Health sakal
Updated on

कोल्हापूर : शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजनासाठी नाही. तर त्याचा संबंध मानवी मनाशी आहे. संगीतातील ताल, श्रृती, विविध राग यांचा वेळेनुसार आणि रुग्णाच्या मानसिक स्थितीनुसार उपयोग केला, तर मानसिक आजार बरे होतात आणि मन प्रसन्न राहते. प्रसिद्ध बासरी वादक सचिन जगताप यांनी संगीत चिकित्सा यामध्ये संशोधन करून विविध व्याधींचे सुमारे ४३७ रुग्ण बरे केले आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीतात विविध प्रकारचे राग आहेत. या रागांना श्रुतींमध्ये बसवले जाते. त्याला एक प्रकारचा रिदम असतो. यातील आलाप, ताल हे आपल्या मानसिक अवस्थेशी निगडित आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी अभ्यास करून संगीत चिकित्सा ही उपचार पद्धती विकसित केली आहे. जमशेदपूर येथील टाटा कॅन्सर सेंटरमध्येही कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष वादन किंवा गायन करून संगीत ऐकवले जाते. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो आणि ते मनाने खंबीर बनतात, असे दिसून आले आहे.

नैराश्य, निद्रानाश, मधुमेह, स्मृतिभ्रंश या रोगांवरही संगीत चिकित्सा प्रभावी ठरते. मात्र, यासाठी संगीत तज्ज्ञ आणि मानोसोपचार तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने हे उपचार घ्यावे लागतात. कोरोना काळात तर काही कोविड सेंटरमध्ये विशिष्ट प्रकारचे संगीत लावले जात होते. त्यामुळे तेथील रुग्णांचे मनोबल वाढल्याचे निरीक्षणातून दिसून आले. खासगी कंपन्यांमधील कर्मचारी, अधिकारी यांची मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी आणि कामाची क्षमता वाढवण्यासाठीही संगीत चिकित्सेचा उपयोग होत असल्याचे सचिन जगताप यांनी संशोधनातून सिद्ध केले आहे.

कोणते संगीत कधी ऐकाल

मनाच्या प्रसन्नतेसाठी शास्त्रीय संगीत उपयोगी ठरते. सकाळी हायफ्रिक्वेन्सीची गाणी एकू नयेत. मध्य किंवा मंद्र सप्तकातील भूपाळी ऐकावी. ध्यान साधना करताना तानपुरा ऐकावा. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. रात्री झोपताना खर्ज किंवा मध्य सप्तकातील संगीत ऐकावे. बासरी, संतूर, जलरंग यांचे वादन ऐकावे.

आजार आणि संगीत

नैराश्य : नैराश्याचे कारण काय हे शोधून रुग्णाचे वय, मानसिकता लक्षात घेऊन रागाची निवड केली जाते. सर्वसाधारणपणे ओडव रागातील संगीत ऐकण्यासाठी देतात. यामध्ये हंसध्वनी, दुर्गा, भूप या रागातील गाणी, वादन रुग्णांना नैराश्यातून बाहेर आणण्यास मदत करतात.

निद्रानाश : मानसिक ताणतणावांमुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास सुरू होतो. काही जणांना औषधे घेऊनही चांगली झोप मिळत नाही. संगीत चिकित्सेमध्ये अशा रुग्णांना मंद्र सप्तकातील यमन कल्याण राग ऐकवला जातो. यातील आलापांचा प्रभाव दिसून येतो.

दृढ संकल्प : अनेकांना मनाचा निग्रह नसतो त्यामुळे इच्छा असूनही ते अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. अशा व्यक्तींना शास्त्रीय संगीताबरोबरच रिदममधील प्राणायाम करून घेतला जातो. कोमल शुद्ध स्वर यातूनही मनाचा निग्रह होण्यास मदत होते.

स्मृतिभ्रंश : विविध कारणांनी व्यक्तींना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना विविष्ट ताल ऐकवले जातात. त्यातूनही त्यांची स्मृती चांगली होते.

भारतीय शास्त्रीय संगीत हे श्रुतींवर आधारलेले आहे. यामध्ये वेळेलाही महत्त्व आहे. संगीतातील ताल, आलाप, स्वर यांचा संबंध मानवी मनाशी आहे. त्यामुळे मार्गदर्शनाखाली सातत्याने शास्त्रीय संगीत ऐकल्याने मन प्रसन्न राहते. एकाग्रता, दृढ संकल्प हे साध्य करता येते. जीवनाकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोनही शास्त्रीय संगीताने साध्य करता येतात.

- सचिन जगताप, प्रसिद्ध बासरी वादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.