National Cancer Awareness Day 2023 : आज ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ आहे. कर्करोगाबाबात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबरला साजरा केला जातो. कर्करोगांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकीच एक स्तनांचा कर्करोग आहे.
स्तनांचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. जगभरातील असंख्य महिलांना हा आजार प्रभावित करतो. त्यामुळे, या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे, याची लक्षणे आणि कारणे याबाबत माहिती देणे महत्वाचे आहे. आज आपण हा स्तनांचा कर्करोग आणि हा कर्करोग होण्यामागची कारणे जाणून घेणार आहोत.
स्तनांचा कर्करोग हा जगभरातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. स्तनांचा कर्करोग हा कोणत्याही वयातील मुलीला किंवा महिलेला होऊ शकतो. मात्र, तुम्ही स्वत: जागरूक राहिलात तर हा कर्करोग वेळीच ओळखता येतो.
डॉक्टर आणि तज्ज्ञ मंडळी सांगतात की, विशेषत: मासिक पाळीनंतर महिलांनी महिन्यातून किमान एकदा तरी स्तनांचे आत्मपरीक्षण करावे. जर तुम्हाला स्तनांमध्ये कुठेही छोटीशी गाठ किंवा गुठळ्या दिसल्या तर वेळीच सावध व्हा आणि वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधा.
भारतातील सुमारे ५ ते १० टक्के महिला स्तनांच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे. या कर्करोगाबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या कर्करोगाच्या लक्षणांबद्दल माहिती देणे हे महत्वाचे आहे.
महिलांनी देखील या कर्करोगाची लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. या कर्करोगाबाबत भीती बाळगत बसू नये, उलट डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
जर एखाद्या मुलीची मासिक पाळी १२ वर्षांच्या आधी सुरू झाली किंवा ५३ किंवा ५५ नंतर जर रजोनिवृत्ती झाली तर अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांना स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे, त्या दरम्यान ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी आणि वेळीच उपचारांना सुरूवात करावी.
सामान्य महिलांच्या तुलनेत जास्त वजन असलेल्या महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. कारण, वजन वाढले की शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे, ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
जर तुमच्या कुटुंबात पूर्वी कुणाला कॅन्सर झाला असेल किंवा स्तनांचा कर्करोग झाला असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा फॅमिली हिस्ट्री ही महत्वपूर्ण भूमिका बजावते.
बिघडलेल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. शिवाय, यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या बिघडलेल्या आहारामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते. विशेष करून तंबाखू, सिगारेट आणि दारूचे सेवन करणाऱ्यांना कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.