नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम :

दहा दिवसांच्या गणेशोत्सवात केलेली श्रीगणेशाची पूजा-अर्चा, त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामधे पाळलेले कुलधर्म या सर्वामुळे शुद्ध झालेले मन, शरीर व जीव यांना शक्ती आणि श्रद्धा मिळण्यासाठी केला जातो.
navratroytsav durga pooja
navratroytsav durga poojasakal
Updated on

दहा दिवसांच्या गणेशोत्सवात केलेली श्रीगणेशाची पूजा-अर्चा, त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामधे पाळलेले कुलधर्म या सर्वामुळे शुद्ध झालेले मन, शरीर व जीव यांना शक्ती आणि श्रद्धा मिळण्यासाठी केला जातो. नवरात्रातील शक्तिमहोत्सव, दुर्गामहोत्सव. या उत्सवामुळे एकूण जीवनावरची श्रद्धा वाढते, सूक्ष्मावरची श्रद्धा वाढते तसेच आपल्याला शक्तीवर, अज्ञातावर, सूक्ष्मावर किंवा ‘त्या’च्यावर मन शांत करून ध्यान करण्याची प्रेरणा मिळते. या शक्तीच्या महोत्सवाला ‘दुर्गा महोत्सव’, किंवा हा महोत्सव नऊ दिवस असल्यामुळे ‘नवरात्र’ असेही म्हटले जाते.

प्राचीन भारतीय शास्त्रात शक्तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्र्विक शक्तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्तीशी संबंधित असल्याचे सापडेल.

आईवडिलांपासून किंवा पूर्वजन्माच्या इच्छा, आकांक्षांतून निर्माण झालेली कर्मबंधने जनुकांनी साठवलेली असतात आणि त्यामुळे मनुष्य बराचसा परस्वाधीन होतो. या बंधनातून सुटून स्वातंत्र्य व मुक्तीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ज्या शक्तीची आवश्‍यकता असते व त्यासाठी जी उपाययोजना करायची त्यातून नवदुर्गा नवरात्रमहोत्सवाची आवश्‍यकता लक्षात येऊ शकेल.

उत्तम आहार असो, शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेली रसायने असोत, प्राणायामासारखा योगाभ्यास असो, या सर्वांच्या सहाय्याने एकदा शक्ती मिळाली की मग ती हव्या त्या स्वरूपात रूपांतरित होऊ शकते. उदा. रसायन म्हणजे शुक्रधातू, ओजस वाढवणारा विशिष्ट ‘औषध योग’ असे समजले तर त्यापासून सर्व प्रकारच्या शक्ती मिळू शकतात म्हणजे वर्ण उजळू शकतो. रोग बरा होऊ शकतो, आयुष्य वाढू शकते; स्मृती, बुद्धी, प्रज्ञासंपन्नता मिळू शकते. एवढेच नाही तर ‘सौभाग्यवर्धन’, ‘अलक्ष्मीनाश’, ‘वाचासिद्धी’ या गोष्टीही मिळू शकतात असे आयुर्वेदात सांगितले आहे.

अर्थात उसनी, तात्पुरती किंवा इन्स्टंट पद्धतीने मिळवलेली शक्ती ही खरी शक्ती म्हणता येणार नाही. अनेक लोकांना दिवसभरामध्ये काम करण्यासाठी दर ३-४ तासांनी कॉफीसारखे पेय प्यायची गरज भासते. कपभर कॉफी घेतल्यास थोडा वेळ ताजेतवाने वाटते, काम करायला हुरूप येतो हेही खरे, पण अशी तात्पुरती ओढून ताणून आणलेल्या शक्तीला खरी शक्ती नाही तर शक्तीचा केवळ आभास म्हणावा लागेल.

या आभासाने कमी पडत असलेली शक्ती भरून निघणे तर दूरच उलट असलेली शक्तीही कळत नकळत हळूहळू खर्ची पडते. आयुर्वेदाच्या नावाखाली आजकाल अशी अनेक इन्स्टंट शक्ती देणारी उत्पादने उपलब्ध होऊ लागली आहे. पण जबरदस्तीने ओढून ताणून आणलेल्या क्षणिक शक्तीने मूळ आरोग्याचे नुकसानच होऊ शकते याचे भान ठेवणे चांगले. शक्ती ही आपली आपण कमवावी लागते. शक्तीचा आभास निर्माण करता येत नाही.

‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ म्हणजे निसर्गातील सर्व तत्त्वे एकरूप होऊन अन्न तयार होते आणि या अन्नातूनच शरीर तयार होत असते. तेव्हा अन्न महत्त्वाचे असले तरी शरीराला चैतन्याचा स्पर्श अग्नीमुळेच होत असतो. मंदाग्नी म्हणजे अन्नपचन न होणे, किंवा पित्ताचे असंतुलन. अग्नी फार मंद असून चालत नाही तसेच भडलेला असूनही चालत नाही. तो जेवढा पाहिजे तेवढाच असला तर त्याची सर्जनात्मक गुणवत्ता दिसून येऊ शकते.

शारीरिक पातळीवर प्रकुपित होणाऱ्या पित्ताचे शमन करण्यासाठी शरद ऋतूतील चांदण्याचा किंवा इतर काही पित्तशामक द्रव्यांचा उपयोग करता येतो. मात्र पावसाळ्यात अनेक दिवस सूर्यदर्शनाच्या अभावामुळे आलेले मानसिक जाड्य दूर करण्यासाठी बाह्य अग्नीची उपासना, शक्तीची उपासना महत्त्वाची ठरते.

या शक्तीच्या उपासनेत थोडीशी माती घेऊन त्यावर धान्य टाकून त्यावर पाण्याने भरलेला मातीचा कलश ठेवणे अशी एक कृती सांगितलेली आहे, जेणे करून जीवोत्पत्ती कशी होते, अन्न कसे तयार होते, सृष्टी कशी तयार होते याची प्रचिती यावी. शक्ती अनेक प्रकारे प्रकट होत असते. एखादी वस्तू हाताने उचलून ठेवता येते किंवा फार जड असली तर जोर लावून सरकवता येते हे जेवढे खरे तेवढेच हे मनःसामर्थ्यांने सुद्धा करता येणे शक्य आहे, हे समजणे महत्त्वाचे होय.

शक्तिउपासनेत भौतिक पातळीवर दीपज्योतिज्ञान व ज्ञानपातळीवर मंत्रसंगीताचे गायन या दोन्ही गोष्टींची एकत्र आवश्‍यकता असते. अत्यंत श्रद्धापूर्वक व भक्तियुक्त हृदयाने ही उपासना करायची असते. तसेच नवरात्रात शक्तिउपासना करत असताना शरीर शुद्ध राहावे या हेतूने स्नान, उपवास, हे सर्व आचरणात आणणे आवश्‍यक असते.

या संपूर्ण शक्तीचे स्वरूप कळावे, शक्तीचे चलन व्हावे आणि ती आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी शक्ती मूर्तीस्वरूपात स्थापन करणे तसेच नवरात्रीचे नऊ दिवस २४ तास दीप प्रज्वलित ठेवणे, हवन करणे, निसर्गाची मदत व्हावी यासाठी देवीला प्रिय असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींची पाने, फुले देवीला वाहणे, अन्नदान करणे, कुमारी पूजन या गोष्टी केल्या जातात. याचा उपयोग स्त्री प्रतिष्ठा वाढण्यासाठी पण होतो.

शक्तीचे उत्थान व्हावे व ती शक्ती शरीरात चलित व्हावी या हेतूने अनेकांनी जमून स्वतःभोवती व वर्तुळात घडाळ्याच्या दिशेने वा घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने गोल गोल फिरत नृत्य करण्याचा प्रघात आहे. या नृत्यप्रकाराला गरबा किंवा रिंगण नृत्य असे म्हणतात. शक्तीला आकृष्ट करून त्या शक्तीचे आवर्तिकी उत्थापन व्हावे या हेतूने नृत्याच्या मध्यभागी दीप ठेवला जातो. तसेच वातावरणाच्या शुद्धतेसाठी रोज सायंकाळी धूप केला जातो.

अशा प्रकारे या देवीच्या तिन्ही रूपात असलेल्या शक्तीची उपासना या दिवसांमध्ये केली जाते. या दिवसांत आजूबाजूच्या सर्वांना घरी बोलावण्याने समाजिक शक्तीचे पाठबळ मिळते. दिवसभर केलेल्या उपासनेमुळे तयार झालेल्या शक्तीला आपल्यामध्ये आकृष्ट करण्यासाठी सायंआरती वगैरेंचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे नऊ दिवस शक्तिउपासना केल्यानंतर स्थापन केलेल्या देवतेच्या मूर्तीचे जलात विसर्जन करणे हेही महत्त्वाचे असते.

थोडक्यात, भारतीय संस्कृतीने योजलेला नवरात्र उत्सव हा अंतर्बाह्य शुद्धी करणारा आणि शक्ती वाढविणारा उत्सव होय.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.