पोषणविषयक मिथके आणि तथ्ये

जास्त फॅट्सचे सर्व पदार्थ घातक असतात, हा चुकीचा समज आहे.
Nutrition foods
Nutrition foodssakal
Updated on

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

मिथक : जास्त फॅट्सचे सर्व पदार्थ घातक असतात.

वस्तुस्थिती : जास्त फॅट्सचे सर्व पदार्थ घातक असतात, हा चुकीचा समज आहे. हेल्दी फॅट्स जे नारळ, सुकामेवा, बिया, ऑलिव्ह तेल यांत आढळतात, ते शरीराच्या क्रायांसाठी आवश्यक असतात. यामुळे शरीरात ऊर्जा पुरवली जाते, पेशींची वाढ होण्यास मदत होते, अवयवांचे रक्षण होते व काही पोषणतत्त्वांचे शोषण होण्यास मदत होते.

असंपृक्त चरबी (मेदाम्ले), विशेषतः ओमेगा-३, आणि ओमेगा-६ हे हृदयाच्या आरोग्यासाठी हितकर ठरतात व सूज कमी करण्यास मदत करतात, असे विविध संशोधनांतून आढळले आहे. घरी बनविलेले, तळलेले पदार्थ आणि जास्त फॅट्स वापरून ‘जास्त प्रक्रिया’ केलेले (‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड’) पदार्थ यांत फरक आहे. संतुलित व माफक प्रमाणात सेवन केलेले स्निग्ध पदार्थ हे फॅट्समध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्व अ, ड, ई व के यांचे शोषण करण्यास परिणामकारकपणे मदत करतात.

मिथक : केळी खाल्ल्याने वजन वाढते.

तथ्य : केळ्यांमध्ये अगदी नगण्य फॅट्सचे प्रमाण असले (०.०३/१०० ग्रॅम) तरी बहुदा त्यांना त्यातील कर्बोदकांच्या प्रमाणामुळे ‘वजन वाढवणारे’ असे संबोधले जाते. साधारण मध्यम आकाराच्या एका केळ्यात १०५ कॅलरीज असतात व केळी पोटॅशियम, जीवनसत्त्व क आणि तंतुजन्य पदार्थ ही आवश्यक पोषणतत्त्वे पुरवतात. यातील तंतुजन्य पदार्थ पचनाला मदत करतात व पोट भरल्याची भावना दर्शवतात, ज्यामुळे ज्यादा खाणे टाळता येते. अभ्यास दर्शवतो, की समतोल आहाराचा भाग म्हणून केळ्यांचे सेवन केल्यास वजन वाढत नाही.

मिथक : निरोगी राहण्यासाठी बारीकच असायला हवे.

वस्तुस्थिती : आरोग्य हे केवळ वजनावर किंवा दिसण्यावर अवलंबून नसते. एखादी व्यक्ती व्यायाम करत नसेल, जेवणाची पद्धत चुकीची असेल किंवा मांसपेशींच्या मानाने चरबीचे प्रमाण जास्त असेल, तर बारीक आणि रोगिष्ट असू शकते. याउलट एखादी व्यक्ती समतोल आहार घेत असेल, नियमित व्यायाम करत असेल आणि हृदयाचे आरोग्य चांगले असेल, तर वजन जास्त असूनही चयापचय क्रियेनुसार निरोगी असू शकते. BMI (Body Mass Index) हे आरोग्य मापनाचे खात्रीशीर प्रमाण नव्हे, यामुळे मांसपेशींचे प्रमाण, हाडांची घनता किंवा चरबीचे वितरण यांसारखे घटक मोजण्यात येत नाहीत. तुमच्या शरीरातील बाॅडीमास वितरण व त्याचे तुमच्या आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य आहे.

मिथक : ज्यूस व स्मूदी आरोग्यासाठी नेहमी चांगले असतात.

वस्तुस्थिती : ज्यूस आणि स्मूदी पौष्टिक आहाराचा एक भाग होऊ शकतात; पण ते नेहमीच फायदेशीर ठरतात असे नाही. दुकानातून खरेदी केलेल्या ज्यूसमध्ये साखर घातलेली असल्याने पोषणतत्त्वांच्या मूल्यांशिवाय कॅलरीजचे प्रमाण वाढते. याशिवाय, रस काढताना फळांतले बहुतांश तंतुजन्य पदार्थ काढले जातात, त्यामुळे रक्तशर्करेच्या प्रमाणात पटकन वाढ होते. घरी केलेल्या स्मूदी ज्यात संपूर्ण फळे, भाज्या घातल्या जातात व साखर वापरलेली नसते, त्यांत तंतुजन्य पदार्थ, पोषणतत्त्वे टिकून राहिल्याने जास्त पौष्टिक असतात. तरीसुद्धा हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, की स्मूदी व ज्यूस हे समतोल पौष्टिक आहाराचा एक घटक असावेत.

मिथक : रात्री दही/योगर्ट खाल्ल्याने सर्दी होते.

तथ्य : या मिथकाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. आयुर्वेदामध्ये रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे अशी सूचना असली, तरी पूर्वीच्या काळी फ्रिजची सोय नव्हती असे तार्किक कारण सांगितले जाते. दही हे ‘प्रोबायोटिक’ अन्न आहे, म्हणजे यात पोटाच्या आरोग्यासाठी मदत करणारे फायदेशीर जिवाणू असतात. हा प्रथिन, कॅल्शियम व इतर पोषणतत्त्वांचा मुख्य स्रोत आहे. दही/योगर्ट बाहेरील तापमानात ठेवल्यास चांगले जीवाणू मोठ्या प्रमाणात वाढून दही आंबट बनते. काही व्यक्तींना यामुळे सर्दी-पडशासारखी लक्षणे दिसू शकतात. जास्त प्रमाणात जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी दही फ्रिजमध्ये ठेवणे गरजेचे असते. रात्री दही खाणे हा एक पौष्टिक पर्याय असू शकतो, विशेषतः यामुळे पोट भरल्यासारखे वाटून रात्री-अपरात्री कमी पौष्टिक नाश्ता खाण्यापासून परावृत्त करते. खाण्यापूर्वी वीस ते तीस मिनिटे फ्रिजमधून दही बाहेर काढून ठेवल्यास तपमानाचा परिणाम होणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल.

योग्य तथ्ये समजून घेतल्यास व्यक्ती आपला आहार व एकंदर आरोग्याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.