ओसीडी आणि आपण

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डरच्या (ओसीडी) च्या आजाराची काही लक्षणे, ओसीडीग्रस्त व्यक्तींचे प्रकार या काही गोष्टी आपण गेल्या आठवड्यात बघितल्या. आता इतर गोष्टी बघू.
OCD and you
OCD and yousakal
Updated on

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डरच्या (ओसीडी) च्या आजाराची काही लक्षणे, ओसीडीग्रस्त व्यक्तींचे प्रकार या काही गोष्टी आपण गेल्या आठवड्यात बघितल्या. आता इतर गोष्टी बघू.

ओसीडीमधील obsession मध्ये पुढील विचार असू शकतात :

  • मला जंतुसंसर्ग होईल. माझ्यामुळे इतरांना लागण होईल.

  • मी स्वत:ला किंवा इतरांना इजा करून घेईन.

  • अतिशयोक्त लैंगिक किंवा हिंसात्मक विचार किंवा प्रतिमा.

  • अतिशयोक्त धार्मिक विचार किंवा मूल्यविषयक विचार.

  • अपयशाची अतार्किक भीती.

  • प्रत्येक गोष्ट नेहमीच अतिव्यवस्थित, अतिपद्धतशीर, अतियोग्य असलीच पाहिजे.

  • एखादी गोष्ट मला लकी किंवा अनलकी आहे याविषयीची पराकोटीची अंधश्रद्धा.

ओसीडीमधील compulsions (जबरदस्तीनं केल्या जाणाऱ्या) कृतींमध्ये पुढील कृती असू शकतात :

  • कुलुपं, गॅसचे नॉब, उपकरणं इत्यादी पुनःपुन्हा तपासणं.

  • आपले नातेवाईक सुरक्षित आहेत की नाहीत याची परतपरत तपासणी करणं, खात्री करून घेणं.

  • अस्वस्थता कमी करण्यासाठी सारखे आकडे मोजणं, बोटांची हालचाल, काही शब्द पुनःपुन्हा उच्चारणं.

  • स्वच्छतेत, साफसफाईत (स्वत:च्या व घराच्या) अतिशय वेळ घालवणं.

  • धार्मिक भयापोटी, देवाचा कोप होईल म्हणून परतपरत नमस्कार करणं. कितीही नमस्कार केले, तरीही समाधान न होणं. अतिकर्मकांडे करणं.

  • कारण नसताना त्याच गोष्टींची पुनःपुन्हा रचना करत राहणं.

  • जुन्या गोष्टी, रद्दी, डबे वगैरे, ज्यांचा काहीही उपयोग नाही, त्या उगाचच साठवून ठेवणं.

ओसीडीवरील उपचार

मनोविकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानं औषधं घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पुढील उपचार पद्धती उपयोगी ठरतात.

कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी : या थेरपीमध्ये सकारात्मक दृष्टीनं obsessive विचारांना तोंड द्यायला शिकवलं जातं. जेणेकरून compulsive कृती करायला लागू नयेत. तसंच या विचारांच्या व कृतींच्या मुळाशी जाऊन आजार बरा करण्याचा प्रयत्न असतो. साधारण चार पायऱ्यांमध्ये ही प्रक्रिया होते. त्या अशा :

१. Relabel : obsessive विचार आणि compulsive कृती हा आजाराचा भाग आहे हे ओळखायला शिकवणं

२. Re-attribute : ओसीडी हा आजार मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे आहे याची जाणीव करून देणं.

३. Refocus : लक्ष दुसरीकडे वळवण्याचं प्रशिक्षण देणं.

४. Revalue : obsessive विचार अतार्किक व अर्थशून्य असल्यामुळे, compulsive कृती न केल्यास कुठलीही इजा होणार नाही याची खात्री पटवणं.

ब) स्वस्थतेचे व्यायाम शिकणं, माइंडफुलनेस व इतर ध्यान पद्धती, कल्पनाशक्तीचा वापर करून मनानं ते प्रसंग उभे करून त्याला तोंड देण्याची मानसिक तालीम वारंवार करणं.

ग्रुप थेरपी : ओसीडी असलेल्या व्यक्तींच्या मदत गटाचा फायदा होऊ शकतो. आपल्यासारखाच प्रॉब्लेम इतरांना आहे. आपण एकटे नाही याची जाणीव होते. दुसऱ्यानं कशा प्रकारे यावर मात केली हे जाणून घेतलं, की आधार वाटतो आणि स्वत: प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. हा मदत गट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असतो.

कुटुंबीयांची कर्तव्यं : ओसीडी हा आजार आहे हे समजून घ्या. ती व्यक्ती मुद्दाम करत नाहीय हे समजून घ्या. त्या व्यक्तीला आधार द्या, प्रेम द्या, तिला समजून घ्या. तिच्यावर टीका करू नका. घरात वातावरण हलकंफुलकं, तणावमुक्त राहील असा प्रयत्न करा. ओसीडीग्रस्त व्यक्तीच्या compulsive कृतीमध्ये सहभागी होऊ नका. त्या कृतीला पाठींबा देऊ नका. सौम्य शब्दांत रोखण्याचा प्रयत्न करा; परंतु बळजबरी करू नका.

ओसीडी हा अतिशय अस्वस्थता निर्माण करणारा आजार आहे; पण योग्य उपचारांद्वारे त्यावर नियंत्रण ठेवता येतं. त्यापासून मुक्तता मिळवता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.