- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग
कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना त्यांचे कामाचे मुक्त वेळापत्रक व वेळेवर काम पूर्ण करण्याचे बंधन यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले जाते. खाण्यास सहजसोपे, पटकन खाण्याजोगे, करण्यास झटपट असे पौष्टिक पदार्थ खाण्याची गरज असली, तरी हे आव्हानात्मक आहे. हे मनात ठेवूनच आपले मधल्या वेळचे खाणे व दुपारच्या जेवणात; तसेच जर कॅंटिनमध्ये खायचे असल्यास तिथे, योग्य पदार्थ निवडण्याचे भान ठेवावे.
सकस अन्नातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सूक्ष्म पोषकतत्त्वांचे समतोलत्व. प्रथिने, कर्बोदके व चरबीयुक्त पदार्थ, याचबरोबर विविध जीवनसत्त्वे व क्षार. त्यामुळे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या चौरस अन्नामध्ये डाळी व कडधान्ये, कमी चरबी असलेली प्रथिने, हेल्दी चरबी व भरपूर भाज्यांचा समावेश असावा.
डब्यासाठी विनापॉलिशच्या तांदळाचा (हातसडीचा), भाज्या घातलेला पुलाव, मिश्र भाजी आणि दही अशा पदार्थांचा विचार केला जाऊ शकतो. या जेवणातून कॉम्प्लेक्स कर्बोदके, फायबर(तंतूमय पदार्थ), भाज्यांतून आवश्यक पोषकतत्त्वे व दह्यातून प्रथिने व प्रोबायोटिक्स मिळतात. याशिवाय पनीर किंवा ग्रिल्ड चिकन घालून केलेले गव्हाच्या चपातीचे रोल, सोबत ताजे सॅलड आणि थोडेसे रायते/कोशिंबीर हे पोटभरीचे, सोयीचे व सुटसुटीत होईल.
कॅंटिनमध्ये जेवायचे असल्यास डाळ-भात, मिक्स भाजी, सॅलड/कोशिंबीर यांसारखे पदार्थ निवडावेत. डाळी किंवा कडधान्ये हा वनस्पतीजन्य प्रथिने व फायबर यांचे उत्तम उदाहरण आहे. मिश्र भाजी विविध जीवनसत्त्वे व क्षार पुरवते, तर सोबतचे थोडे सॅलड याला पूर्णान्न बनवते.
कामाच्या दिवशी मधल्या वेळच्या खाण्यासाठी (स्नॅक) ताजी फळे, सुका मेवा, दही यांसारखे पदार्थ झटपट व ताजे मिळू शकतात व हे सहजपणे आपल्या कामाच्या डेस्कमधे ठेवता येतात.
हायड्रेशन हे आपल्या निरोगी जीवनशैलीचा एक भाग आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. दिवसभरात वरचेवर पाणी पिण्याची सवय लावावी. गोड चहा-कॉफी, बाटलीतील गोड सरबते, सोडा यांच्याऐवजी नारळपाणी, ताक, हर्बल टी यांचा पर्याय वापरावा.
नियमित व्यायामही निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. तुमच्याकडे वेळ कमी असला, तरीही थोडे चालल्याने तुमचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते. जेवल्यानंतर शतपावली किंवा जिन्यावरून आपल्या कामाच्या मजल्यावर (ये-जा) चढ-उतार करणे याचाही उपयोग होतो.
आपल्या दैनंदिन जीवनात या पदार्थांच्या पर्यायाचा समावेश केल्याने कॉर्पोरेट कर्मचारी, आपली सोय व चव यांच्याशी कोणतीही तडजोड न करताही चौरस व पोषक आहाराचा आनंद घेऊ शकतात. खाण्याच्या बाबतीत विचारपूर्वक निवड केल्याने, त्यांचा एकंदरीत आरोग्यावर व कामाच्या ठिकाणच्या उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.