नवी दिल्ली : सातत्याने वाढत असलेले हवा व ध्वनी प्रदूषण, प्रचंड गर्दी आणि मर्यादित असणाऱ्या बागा किंवा मैदानांसारख्या ठिकाणांमुळे शहरांमधील मुलांच्या विकासावर परिणाम होत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय संशोधनात देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियातील सिडनी तंत्रज्ञान विद्यापीठातील (University of Technology Sydney) संशोधकांनी जगभरातील ४१ देशांतील २३५ संशोधन अहवालांचे विश्लेषण करून बालपणावर परिणाम करणाऱ्या प्रमुख शहरी पर्यावरणीय पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे.
बालकाच्या विकासात आयुष्याचे सुरुवातीचे दोन हजार दिवस किंवा शून्य ते पाच वर्षांपर्यंतचा काळ त्यानंतरच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी(Physical, intellectual, social and emotional health) अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
त्याचप्रमाणे, मुलांच्या विकासासाठी वातावरण, घराशेजारील परिस्थिती, समुदाय समर्थन आणि निवासी भागातील पर्यावरण आदी घटकही महत्त्वाचे असतात, असे ‘पब्लिक हेल्थ रिसर्च ॲंड प्रॅक्टिस’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात म्हटले आहे.
येत्या २०३० पर्यंत जगाची ६० टक्के लोकसंख्या शहरी असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे, या अहवालातील निष्कर्ष शहरी भागातील आरोग्याचे धोके समजून घेण्यास मदत करतात. त्यातून शहरांतील अशा समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी शहरी पर्यावरणाचे नियोजन व आराखडाही या अहवालाच्या मदतीने करता येईल, असा संशोधकांचा विश्वास आहे.
संशोधकांच्या मते, शहरांतील हवा प्रदूषणाचा मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होतो. वाहने आणि उद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणाऱ्या प्रदूषित घटकांचा मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे, दम्यासारख्या श्वसनाशी संबंधित विकारालाही आमंत्रण मिळते.
मोठ्या शहरांमध्ये बागा, मैदाने तसेच नैसर्गिक वातावरण मर्यादित असल्याने मुले संवेदनाक्षम अनुभव आणि उपजत वृत्तीतून शोध घेण्याच्या संधीपासून वंचित राहतात. याचाही मुलांच्या शारीरिक आणि संज्ञानात्मक विकासावर परिणाम होतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
शहरी आराखड्याचे नियोजन करताना बागांसारख्या ठिकाणांची गरज समजून घ्यायला हवी. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्यही सुधारू शकते. शहरातील धकाधकीच्या जीवनामुळे पालक व मुलांमध्ये तुटलेपणाची भावना निर्माण होते.
त्यातून नवजात अर्भकाच्या विकासासाठी महत्त्वाच्या आधारभूत घटकाच्या कमतरतेतून कुटुंबाला सामाजिक विलगता आणि मर्यादित समुदाय समर्थनाचा सामना करावा लागतो, याकडेही संशोधकांनी लक्ष वेधले आहे.
सिडनी विद्यापीठातील शाश्वत भविष्य संस्थेमधील संशोधक एरिका मॅकिंटायर म्हणाल्या, की शहरी नियोजनकर्ते आणि धोरणकर्त्यांनी आरोग्य व तंदुरुस्तीचा पाया म्हणून दैनंदिन शहरी पर्यावरणाची भूमिका ओळखण्याची गरज आहे.
मुलांसाठी अनुकूल आराखड्याची निर्मिती, बागांसारख्या अधिक हिरवाई असणारी ठिकाणे तयार करणे, हवा व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आणि मुलांच्या शारीरिक हालचाली वाढविण्यासाठी चालण्यायोग्य क्षेत्रे बनविणे आदी उपाय मुलांच्या निकोप विकासासाठी अनुकूल पर्यावरण तयार करण्यात मदत करतील. शहरी जीवनातील ज्या घटकांबद्दल सर्वाधिक चिंता व्यक्त केली जाते, त्यात हवा प्रदूषण एक आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.