सद्गुरू ईशा फाउंडेशन
जगात जिथे जिथे अस्तित्वाच्या गूढ रहस्यांचा शोध घेतला जातो, मग ती कोणतीही संस्कृती किंवा धर्म असो-मेसोपोटेमिया, ग्रीस, इजिप्त, कंबोडिया, व्हिएतनाम किंवा भारत, तिथे नेहमी सर्पांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते, एकतर प्रतीकात्मक स्वरूपात किंवा प्रत्यक्षात. गूढ रहस्यवाद आणि साप वेगळे केले जाऊ शकत नाही.
त्याची एक बाजू प्रतीकात्मक आहे, कारण योगामध्ये वेटोळे करून बसलेला सर्प हे कुंडलिनीचे प्रतीक म्हणून वापरले जाते. सापांना हा प्रतीकात्मक दर्जा प्राप्त झाला आहे याचं एक कारण म्हणजे जे दैवी जीव आहेत, जे मानवी स्वरूपापेक्षा जाणिवेने आणि क्षमतेने अधिक उन्नत आहेत, ते ज्या वेळी अस्तित्वाच्या या आयामामध्ये येतात त्यावेळी ते नेहमी सापाचे रूप घेऊन येतात.
धरतीवरच्या प्रत्येक पौराणिक कथेमध्ये तुम्ही याचा अंश पाहू शकता. जगाच्या कोणत्याही भागामधील सर्व देवता - मध्य-पूर्व, उत्तर आफ्रिका, मेसोपोटेमिया, आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य युरोप, त्या नेहमी सापांबरोबर प्रतीकात्मक स्वरूपात दाखवल्या आहेत. याचं कारण सापांमध्ये एक विशिष्ट संवेदना आहे, जी माणसांमध्ये नाही. कोणी खूप ध्यानमय झाला तर ध्यानावस्थेकडे आकर्षित होणारा पहिला प्राणी हा साप असतो. याच कारणामुळे, ऋषी आणि मुनींच्या भोवती वाढलेल्या वारुळांची जी चित्रे असतात त्यामध्ये तुम्ही नेहमी साप पाहता. जे आयाम जाणून घेण्यासाठी मनुष्य जीव अत्यंत आतुर असतो, त्या विशिष्ट आयामाचे आकलन करून घेण्याची क्षमता सापांमध्ये आहे. सापांच्या या विशेष आकलन शक्तींचा केवळ सन्मान म्हणून सापांना अशा स्वरूपात दाखवले आहे.
साप हा ठार बहिरा असतो. परंतु तो त्याचे संपूर्ण शरीर कान म्हणून वापरतो. त्याच्या संपूर्ण शरीराचा जमिनीला स्पर्श होत असतो. पृथ्वीवर होणारी लहानातल्या लहान हालचालीबद्दल तो संवेदनशील असतो. पृथ्वीवर घडणारा कोणताही मूलभूत बदल, मग तो कितीही सूक्ष्म असो; तो त्याला कळतो.
भारतीय पौराणिक कथांमध्ये आणि सर्व जगभर तुम्ही नेहमी ऐकत आला आहात की, परलोकामध्ये एक नागलोक आहे ज्यामध्ये केवळ सर्पच नाही तर मनुष्यांची संपूर्ण वस्ती आहे ज्यांना आपण नाग म्हणतो. नाग सर्प वंशाचे आहेत आणि या राष्ट्राच्या आणि अक्षरशः प्रत्येक संस्कृतीच्या चेतनेला आकार देण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आज, आपल्याला माहीत आहे की कंबोडियातील अंगकोर, अंगकोर थोम आणि अंगकोर वॅट येथील भव्य मंदिर नागांच्या वंशजांनी बांधली आहेत. हे नाग समुदायातील लोक भारतातून तिकडे गेले, स्थानिक लोकांबरोबर मिश्रण होऊन त्यांचे वंशज वाढले आणि त्यांनी राज्य स्थापन केले.
म्हणून गूढ रहस्यवाद आणि सर्प वेगळे केले जाऊ शकत नाहीत. कारण या प्राण्यांना काही विशिष्ट आयामांची जाणीव आहे. जाणिवेची सर्वोच्च स्थिती, ज्याला शिवाच्या कपाळावरील तिसरा नेत्र उघडण्याने दाखवली जाते, तिथे सापाचे अस्तित्व आहे. हा सरपटणारा प्राणी जमिनीवर चालत असला तरी शिवाने त्याला त्याच्या डोक्यावर घेतले आहे, हे दाखवण्यासाठी की तो त्याच्याही वरती आहे. ते हे दर्शवीत आहेत की काही बाबतीत साप शिवापेक्षाही अधिक वरचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.