Infectious Disease : देशात पाच प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे सात लाख मृत्यू

‘लॅन्सेट’ चा अहवाल : २०१९ मधील आकडेवारी
Infectious Disease
Infectious Diseasesakal
Updated on

नवी दिल्ली : कोरोनामुळे भारतासह जगभरात लाखो जणांचा मृत्यू झाला. मात्र, कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी २०१९ मध्ये भारतात पाच प्रकारच्या जिवाणूंमुळे सहा लाख ७८ हजार ८४६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ‘लॅन्सेट’ या नियतकालिकात याबाबतचा अहवाल प्रकाशित झाला आहे. ई. कोली, एस. न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए. बाउमनी हे पाच जिवाणू भारतीयांसाठी प्राणघातक ठरत आहेत. या जिवाणूंचा संसर्ग २०१९ मध्ये मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे कारण होते.

संशोधकांनी ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१९’ व ॲंटिमायक्रोबियल रेझिस्टन्समधील डेटाचा वापर केला. त्यात ३४ कोटी व्यक्तींची जिवाणू संसर्गाबद्दलची माहिती अभ्यासली. जगात ३३ जिवाणूंमुळे २०१९ मध्ये तब्बल ७७ लाख जणांनी प्राण गमावले. यापैकी पाच जिवाणूंमुळेच निम्मे मृत्यू झाले, असेही या अहवालात म्हटले आहे. या ३३ जिवाणुंसह ११ प्रमुख संसर्गांसह त्यांच्याशी संबंधित मृत्यूची प्रथमच माहिती देण्यात आली आहे. यातील सर्वांत प्राणघातक जिवाणू व त्यांचा संसर्ग ठिकाण व वयानुसार बदलतो.

भारतात ई. कोली, एस. न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए. बाउमनी हे पाच जिवाणू सर्वांत प्राणघातक ठरत आहेत. २०१९ मध्ये या पाच जिवाणूंमुळे देशभरात सहा लाख ७८ हजार ८४६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ई कोली सर्वाधिक प्राणघातक जिवाणू असून त्याच्या संसर्गामुळे १.५७ लाख जणांनी प्राण गमावले.

जगभरात २०१९ मध्ये एकूण मृत्यूमध्ये हृदयविकाराचा पहिला क्रमांक होता. त्यानंतर जिवाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दुसरा क्रमांक लागतो. जिवाणू संसर्गाचे मृत्यू कमी करण्यासाठी नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करणे, प्रतिजैवकांचा परिणामकारक वापर महत्त्वाचा असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. जिवाणू संसर्गाला जागतिक सार्वजनिक आरोग्यात महत्त्व देण्याची गरज व्यक्त करत निदान प्रयोगशाळांची संख्या वाढवून मजबूत आरोग्य यंत्रणा उभारण्याचे उपायही सुचविले आहेत.

प्राणघातक जिवाणू

  • ७७ लाख - जगभरातील मृत्यू (२०१९)

  • १३.७ - एकूण मृत्यूपैकी टक्केवारी

  • ५४ टक्के - पाच जिवाणूंमुळे मृत्यू

  • जगभरात सर्वाधिक बळी घेणारा जिवाणू - ११ लाख एस. ऑरियस :

एड्‌सपेक्षा ‘ई कोली’चे मृत्यू अधिक

क्षयरोग, मलेरिया आणि एचआयव्हीसारख्या विषाणूंचा आतापर्यंत अनेकांनी अंदाज वर्तविला. मात्र, जिवाणूंचा अभ्यास निवडक जिवाणुंपुरता मर्यादित किंवा विशिष्ट लोकसंख्येवरच केंद्रित होता. जगभरात २०१९ मध्ये एड्‌सपेक्षा ई. कोली व एस. ऑरियस या जिवाणूंमुळे अधिक मृत्यू झाल्याकडेही संशोधकांनी लक्ष वेधले आहे.

या अहवालामुळे जागतिक आरोग्यापुढे जिवाणू संसर्गाने उभ्या केलेल्या आव्हानाची पूर्ण व्याप्ती प्रथमच लक्षात आली आहे. अहवालातील निष्कर्ष जागतिक आरोग्य उपक्रमात अग्रस्थानी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे, या प्राणघातक जिवाणूंचा सखोल अभ्यास करता येईल.

-ख्रिस्तोफर मरे, संशोधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.