भारत हा एक सार्वभौम, स्वतंत्र, आध्यात्मिक प्रवृत्तीचा व तेजोपासना करणारा देश. एक वेळ अशी होती की भारतभूमीत सोन्याचा धूर येत असे, रोजच्या आहारात सोन्याच्या मोहऱ्यांची फोडणी दिली जात असे, मिठाईवर सोन्याचा वर्ख दिला जात असे. निदान वर्षातून एकदा विजयादशमीच्या दिवशी सुवर्णाचे छोटे पान भेट म्हणून दिले जात असे.
परकीय गुलामगिरीमुळे, परकीय संस्कृतीच्या कच्छपी लागल्यामुळे, पिवळे तो सोने अशा मनोवृत्तीतून परदेशी साहेब-गोरे तेवढे उत्तम अशा समजामुळे विजयादशमीला साधे आपट्याचे पान देणे परवडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. परकीय आक्रमण झाल्याचे दुःख खरेच पण त्यातही त्यांनी सोने-हिरे लुटून नेण्याचे दुःख नाही, दुःख आहे ते भारतीय मनावर परकीय संस्कार रुजवून गेले याचे.
विजयादशमी हा हृदयविकार टाळण्याचा सण. हृदयासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या - प्रेम व सुवर्ण. त्या दृष्टीने माणसामाणसातील दुरावा दूर करून, गैरसमजुतीच्या सीमा ओलांडून प्रेमभाव वाटावा आणि आरोग्यवान व्हावे यासाठी नऊ दिवस शक्तीची उपासना करून साजरा करण्यात येत असलेला विजयादशमी हा उत्सव.
विजयादशमीची सुटी असल्यामुळे घरी काही तरी गोड-धोड खाणे, एखादा करमणुकीचा कार्यक्रम पाहणे एवढ्यापुरता हा दिवस उजवला जाऊ लागला. परकीयांच्या संस्कारापुढे भारतीय संस्कार बाळबोध वाटायला लागल्याने आपल्या संस्कारांची लाज वाटण्याची पद्धत रूढ झाली. नूतनवस्त्रपरिधान, सीमोल्लंघन प्रातिनिधिक स्वरूपात रूपक म्हणून करावे आणि मिळालेल्या विजयाचे स्वरूप म्हणून सुवर्ण वाटावे ही कल्पना मागे पडली.
म्हणतात की अज्ञातवासात जाताना आपली शस्त्रे पांडवांनी शमीच्या काटेरी वृक्षावर लपून ठेवलेली होती, जेणेकरून त्यांचे आपसूक रक्षण व्हावे. गंज चढलेली, लपवून ठेवलेली, बोथट झालेली शस्त्रे उपसून, पुन्हा एकदा स्वाभिमान जागृत करून आपली परंपरा जपावी यासाठीचा हा सण.
आरोग्यासाठी, उत्क्रांतीसाठी, समृद्धीसाठी जेवढ्या पद्धती भारतीयांनी प्रचारात आणल्या त्या सर्व हळू हळू नष्ट होऊ पाहात आहे. त्याच्याच बरोबर आरोग्याला उपयोगी असलेल्या आयुर्वेदासारख्या शास्त्रावरही मोठे संकट येऊ घातलेले आहे. अनेक आयुर्वेदिक औषधे तयार करता येणार नाहीत कारण काही वनस्पतींवर बंधन आलेले आहे. आयुर्वेदिक औषधे बनवता येऊ नयेत या दृष्टीने कडक नियम भारतातही तयार झालेले आहेत.
दसऱ्याचा मूळ हेतू लक्षात ठेवून हा उत्सव साजरा करायचा असेल तर भारतीय परंपरा प्रेमाने जोपासून एकमेका साहाय्य करू अशी शपथ घेण्याचा हा दिवस. पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये अशा दहा इंद्रियांवर स्वामित्व मिळविण्याचा हा सण.
या दशमीच्या दिवशी शस्त्रांची व आपण वापरत असलेल्या अवजारांची पूजा करावी अशी पद्धत असे. शेवटी ज्ञानाच्या शस्त्राने जसे अज्ञान कापता येते तसेच आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी काही वेळेला गोडीगुलाबीने पण ते शक्य नसल्यास कठोर शस्त्राने कापून काढाव्या लागतात. शस्त्र हे हिंसेसाठी नसावे हे खरे, पण ते स्व-बचावासाठी नक्की असावे. आपल्या वाडवडिलोपार्जित संपत्तीवर, आपल्या संस्कारांवर, आपल्या परंपरेवर शत्रू चालून आला तर आपण कठोरपणे निर्णय घेऊन शत्रूचा नाश करावाच लागतो.
नवरात्राच्या नऊ दिवसांत केलेल्या शक्तिउपासनेचे फळ, जगदंबा आदिशक्तीने दिलेली कृपा सर्वांना वाटायची तसेच ज्या गोष्टी त्रास देणाऱ्या व अकल्याणाच्या असतील त्यांना नष्ट करण्याचा मार्ग शोधून जुन्या शस्त्रांना परजून विघ्नांचा नाश करायचा असा हा विजयादशमीचा दिवस. दसऱ्याच्या दिवशी नवीन शिक्षणाची सुरुवात केली जाते. स्वतःच्या उपजीविकेच्या साधनांची, यंत्रांची पूजा केली जाते, जेणेकरून व्यवसाय हा देवत्वाशी जोडलेला आहे.
नैतिक अधिष्ठान ठेवूनच उपजीविका मिळवली व त्या पैशातून उदरनिर्वाह केला तरच अन्न अंगी लागते व जीवन समाधानी होते. तेव्हा श्रमप्रतिष्ठा म्हणून आपल्या कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्री, हत्यारे, अवजारे यांचे पूजन करून आपल्या कामाला देव समजून दशमीचा दिवस साजरा केला जातो.
आरोग्य टिकविणे हे सर्वांत महत्त्वाचे. आरोग्य नसले तर सणही साजरा करता येत नाही आणि सणाला दिलेले गोड-धोड खाता येत नाही. गुडघे दुखत असले, शरीरात आमवात असला तर श्रीखंड कसे काय खाणार? तेव्हा आरोग्यासाठी असलेले अडथळे दूर करून आरोग्य मिळवावे व सण आनंदात साजरा करावा असा हा दिवस.
विजयादशमीच्या मुहूर्तावर सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, वाईट गोष्टी टाकण्यासाठी, नष्ट करण्यासाठी मनःसामर्थ्य मिळो आणि मनापासून प्रेम करून अनेक मित्र मिळोत अशी इच्छा ठेवायला हरकत नाही. ज्याच्या मनात कुठलेही किल्मिश नाही, जो संकटे नुसतीच झाकून ठेवत नाही, तर नष्ट करतो, ज्याला अनेक मित्र आहेत, जो सगळ्यांशी प्रेमाने वागतो, ज्याच्यावर लोक प्रेम करतात, जो शक्तीची उपासना करतो, त्याला आरोग्य मिळून त्याचे जीवन सुखासमाधानाचे नक्कीच होते.
विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, पण खरे पाहता हा सुवर्णमुहूर्ताचा दिवस. सुवर्णाचे महत्त्व सर्व जगाला पटलेले आहे. सोन्याची खरेदी खूप प्रमाणात होत असावी कारण सोन्याचे भाव दिवसेंदिवस वर वर जात आहेत. सुवर्ण नेहमीच महाग होते, परंतु आता ते एवढे महाग झाले आहे की यापुढे सुवर्ण आहारात किती व कसे ठेवायचे असा प्रश्र्न सर्वांनाच पडू शकतो.
पण शरीराची प्रतिकारशक्ती भरपूर असावी, कांती तेजःपुंज असावी, शरीर उत्तम असावे, हृदय-मेंदू यांनी उत्तम तऱ्हेने काम करावे असे ज्यांना वाटत असेल त्यांना काही प्रमाणात सुवर्ण आहारात ठेवावेच लागेल. सुवर्ण हा असा धातू आहे की जो कच्च्या स्वरूपात म्हणजे सुवर्ण वर्ख या स्वरूपात सेवन करता येतो. आयुष्यात सुवर्णकाल यावा असे वाटणाऱ्यांनी सुवर्णाच्या स्वरूपात निदान कांचनाराची पाने, आपट्याची पाने सुवर्ण म्हणून वाटावीत म्हणजे सुवर्णाचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत निदान लक्षात तरी राहील.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.