शरीर, मन आणि आत्मा हे तिघे मिळून ‘आपण’ तयार होतो. यातील एकही गोष्ट वेगळी करता येत नाही, हे तिघेही एकत्र जोडलेले आहेत
Swasthyam 2022:
शरीर, मन आणि आत्मा हे तिघे मिळून ‘आपण’ तयार होतो. यातील एकही गोष्ट वेगळी करता येत नाही, हे तिघेही एकत्र जोडलेले आहेत. आपण शरीरासाठी काहीही केले व त्यात आपले मन गुंतलेले असले, तरच त्याचा फायदा होतो. एखादी गोष्ट मनापासून केली तरच त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो, उदाहरणार्थ जेवण. जिथे मन गुंतले असेल, तिथेच शरीर कार्यशील राहील. या साऱ्या गोष्टी योगाभ्यासात येतात.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी लोकांनी काय करावे, त्यासाठी योगाभ्यास किती उपयोगी पडू शकतो, असे प्रश्न नेहमी विचारले जातात. केवळ आसने म्हणजे योगाभ्यास नव्हे, तर योगाभ्यासाचे अनेक भाग आहेत. आसने योगाभ्यासाचा केवळ एक भाग आहे. संपूर्ण योगाभ्यासासाठी काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
- डॉ. हंसाजी योगेंद्र, संचालक, दि योगा इन्स्टिट्यूट
योगाभ्यासात मुख्यतः तीन बाबींचा अंतर्भाव
अ) सायकॉलॉजी (मानसशास्त्र) : आपले मन कसे असते किंवा मन कसे असावे, यावर लक्ष दिले पाहिजे. कोणी आपला अपमान केल्यास त्या रागाने किंवा आपल्याला वाईट वाटून आपल्या मनावर आणि शरीरावरही अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. आपल्या पचनसंस्थेच्या समस्या येऊ शकतात, नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो, काही आजार उद्भवतात, स्मरणशक्ती कमकुवत होते, सारासार विचारशक्ती कमी होते आणि आपण काहीतरी वेगळीच कृती करू शकतो. मात्र, ही जीवन जगण्याची रीत नाही. कोणी आपल्याशी वाईट वागल्यास ती त्याची समस्या आहे, तुम्ही का अस्वस्थ होता? ही समज आपल्याला यायला हवी, हे योगाभ्यासात सांगितले आहे.
अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य (सगळ्या बाबींवर नियंत्रण ठेवणे), अपरिग्रह (कोणत्याही गोष्टीचा विनाकारण साठा करू नये) आणि अस्तेय (चोरी करू नये, यात मानसिक चोरीही आली, उदा. कॉपीराइट भंगही करू नये.) ही योगाभ्यासाची महत्त्वाची अंगे आहेत. नियमामध्ये स्वच्छता आणि आरोग्य येते. आपले शरीर अंतर्बाह्य स्वच्छ हवे, मनातही स्वच्छ विचार हवेत. आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी आणि समाधानी राहायला हवे. जे नाही त्यासाठी तुम्ही जरूर मेहनत करा ते मिळवा, पण ते नाही म्हणून दुःखी होऊन कुढत राहू नका. तुम्ही काय करावे हे नियम सांगतात, त्याच्यानंतर आसने आणि प्राणायाम येतात. आपण आपल्याला शरीराला समजून घ्यावे. आपल्याला जर शीतपेये पिऊन सर्दी होत असल्यास ते पिऊ नये. आपल्या घराण्यात कोणाला काही आजार असल्यास आपणही आपली काळजी घ्यायला हवी. मनाला नेहमी आनंदी, उत्साही ठेवा, नैराश्यात जाऊ नका, दुःखी होऊ नका. अशाप्रकारे मनाला सकारात्मक कसे ठेवावे हे योगाभ्यासात आहे.
शरीर आणि मनानंतर आत्मा महत्त्वाचा आहे आणि तो साऱ्या विश्वाशी जोडलेला आहे. आपण समुद्रातून तांब्याभर पाणी घरी आणले, तरी तो मूळ समुद्राचा एक भाग आहे. तसेच, आपल्या विश्वात प्रचंड बुद्धीमत्ता आहे आणि त्यात प्रचंड मोठी शक्ती आहे. या दोन्ही गोष्टींमुळेच हे सारे विश्व सुरळीत चालले आहे. ही साऱ्या विश्वाची बुद्धी आणि ऊर्जा आपल्यातही यायला हवी. कारण आपणही शेवटी या ब्रह्मांडाचाच एक भाग आहोत. आपला आत्मा आणि हे विश्व यांना जोडण्यासाठी अनेक कंपने आणि अनेक ध्वनी आहेत.
एखाद्या वेळी आपले शरीर आणि मन द्विधा झाले, आपला गोंधळ झाला, आपल्यासमोर कठीण परिस्थिती आल्यास आपल्याला आपल्या आत्म्यापासूनच ज्ञान आणि शांती मिळू शकते. अशा कठीण परिस्थितीत आपल्याला इतर ठिकाणाहून शक्तीची आवश्यकता भासते, पण ती आपल्यातच आहे, हे लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत पाच मिनिटे शांत बसा, सगळ्या चिंता दूर करा, डोळे मिटून ध्यान धरा आणि मनाला स्थिर करा. पाच मिनिटांतच तुमचे मन शांत होईल आणि तुमच्या सगळ्या समस्याही सुटतील. तुमच्यातूनच ही ऊर्जा तुमच्यात येईल. याला ध्यानधारणा म्हणतात व हे देखील योगाभ्यासात आहे
ब) फिलॉसॉफी (तत्त्वज्ञान) : आपले शरीर सतत हलते ठेवा, अन्यथा शरीर किंवा त्याचा हालचाल न होणारा भाग आखडून जाईल हे लक्षात ठेवा. आपला पाठीचा कणा सतत लवचिक हवा, तसेच आपल्या नाभीच्या शेजारची जागा म्हणजे पोट नेहमी पातळ आणि
आतल्या भागात गेलेले असावे. यासाठी लागते ते तंत्र. आपण कुठलीही गोष्ट का करतो याचा विचार करा, कारण त्याचा परिणाम तुम्हालाच भोगायला लागणार आहे. विचार करा आणि आपल्या कृतीचा हेतू लक्षात ठेवा. इथे कर्म ही संकल्पना समोर येते. आपल्या जीवनाचे उद्देश आणि लक्ष्य काय, याबाबत स्पष्टता हवी. केवळ भावनेने नको तर बुद्धीने काम करा. उदाहरणार्थ, तुम्हाला समोर एखादा चमचमीत खाद्यपदार्थ दिसला तरी तो उगाच खाऊ नका. तुम्हाला भूक लागली असल्यासच खा. अशा प्रकारे आपण सारासार विवेकबुद्धीने वागले पाहिजे, अन्यथा त्रास तुम्हालाच होणार हे लक्षात घ्या.
क) टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) : आपले शरीर सतत चालते (अॅक्टिव्ह) ठेवण्यासाठी हवी ती टेक्नॉलॉजी. योगाभ्यासाची सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी ही समजून घ्यायला हवी, मन आणि शरीर यांना समजून घ्यायला हवे, तरच आपल्याला जीवन आणि स्वभाव समजू शकेल.
योगाभ्यास कळला का?
आज आपल्या समाजाची परिस्थिती अशी आहे, की आपल्याला योगाभ्यास खरोखर कळालेलाच नाही. योगाभ्यास म्हणजे काय, तर पोट आत बाहेर करा, शीर्षासन करा, फार तर सूर्यनमस्कार घाला, एवढीच सर्वसामान्यांची संकल्पना आहे. मात्र, योगी चालण्याला खूप महत्त्व देतात हे लक्षात ठेवा. आसने हा भाग जास्ती करून हठयोगी करतात. मात्र, कुठल्याही प्रकारे चालणे, डोंगरावर जाणे (ट्रेकिंग) मेडिटेशन, ध्यानधारणा हे योग्याचे आयुष्य आहे. त्यानेच आपण फिट राहू.
भारतातून जगभर प्रसार
गेल्या दहा वर्षांत भारतात आणि हळूहळू जगातही योगाभ्यासाकडे लोक आकर्षित होत आहेत. कारण, भारतीय संस्कृतीला जोडण्याची ताकद योगाभ्यासात आहे आणि हीच ताकद विश्वाला आधार देईल. हेच जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाभ्यास दिवस साजरा केला. अशा वातावरणात आमच्यासारख्या संस्थांनाही हे कार्य पुढे नेण्यास प्रोत्साहन मिळते. रामदेव बाबा हे अत्यंत उत्साही हठयोगी असून, ते देखील त्यांच्या वेगळ्या तंत्राने, वेगळ्या प्रकारे योगाभ्यासाला उत्तेजन देत आहेत.
परदेशातील परिस्थिती वेगळीच आहे, तिथे खूप दुःख, अशांती आहे. ते त्यांच्या परीने योगाभ्यास शिकत आहेत, मात्र त्यात व्यावसायिकपणा असल्याचे जाणवते. त्यांनादेखील याबाबत चांगले मार्गदर्शन आवश्यक आहे. हल्ली ‘आयुष’ मंत्रालयामार्फत योगाभ्यासाला उत्तेजन दिले जात आहे, त्यांच्यातर्फे योगाभ्यासाला आयुर्वेद, युनानी, होमिओपथी आदींशी जोडले जात आहे. मात्र, योगाला कुठल्याही ‘पॅथी’शी जोडू नये, असे मला वाटते. परदेशी व्यक्तीही आता योगाभ्यास करीत आहेत, मात्र भारतीयांनाही योगाभ्यास समजून घ्यायला आणि शिकायला वेळ लागेल. त्यामुळे परदेशी व्यक्तींनाही याला वेळ लागेल, हेही तितकेच खरे आहे.
असा करा योगाभ्यास
योगाभ्यास कसा करावा किंवा समजून घ्यावे याचे छोटे उदाहरण पाहा. शवासन हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत आहे, मात्र त्याचे योग्य तंत्र व्यवस्थित शिकवले पाहिजे. शवासन करताना जसे आपण एका एका अवयवातील चेतना काढून घेत जातो, त्यासाठी वैराग्य हा शब्द अत्यंत सयुक्तिक आहे. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही आवश्यक तेवढे वैराग्य हवे, हे अभ्यासकाला शिकवायला हवे. उगाचच फक्त कृती म्हणून आसने करू नका, हे तत्त्वज्ञानही त्यासोबत शिकवायला हवे. आसने म्हणजे फक्त हात वर करा, असे होऊ नये. आसनांबरोबर फिलॉसॉफी, सायकॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी हवी. आसने म्हणजे केवळ शारीरिक कृती नसून, त्यात सुयोग्य मानसिकता आणि अध्यात्मिकताही यायला हवी. या गोष्टी आसनांपासून वेगळ्या करू नका. मुख्य म्हणजे, आपला स्वभाव आणि व्यवहारही तसाच हवा. आपल्याला अहंकार स्पर्शही करू देऊ नये. तुमच्यात अहंकार आल्यास तुमच्याकडे शंभर पदव्या असूनही त्या काहीही कामाच्या नाहीत. अहंकार असेल तर तुम्ही मुळात शिकलात ते चुकीचे आहे, ते ध्यानात ठेवा. ही अशी चर्चा देखील योगाभ्यास क्लासमध्ये शिष्यांशी व्हायला हवी.
असे व्हा सहभागी...
मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.
उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !
Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam
Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/
Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam
LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.