उदरभरण नोहे.. जाणिजे ‘ध्यानकर्म’

ध्यान अगदी सोप्या क्रियेतूनही घडू शकतं हे अनुभवायचं असेल तर ‘अन्न चर्वण ध्यान’ करायलाच हवं. ध्यान आणि रोजचं आयुष्य या वेगळ्या गोष्टी नाहीत.
Chewing food
Chewing foodsakal
Updated on

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

ध्यान अगदी सोप्या क्रियेतूनही घडू शकतं हे अनुभवायचं असेल तर ‘अन्न चर्वण ध्यान’ करायलाच हवं. ध्यान आणि रोजचं आयुष्य या वेगळ्या गोष्टी नाहीत. हे ज्याला जितकं लवकर समजेल तितका तो लवकर ध्यान शिकेल. बऱ्याच वेळेला आपण करत असलेल्या खूप छोट्या गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत.

कसं करायचं हे ध्यान ?

शांतचित्तानं जेवायला बसावं. प्रत्येक घास ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ अशी पवित्र भावना मनात ठेवून खावा. तीस दिवस अशा प्रकारे अन्न चावून जेवायचं. ते पातळ, बारीक होईपर्यंत आतमध्ये गिळू नका. ‘प्रत्येक घास बत्तीस वेळा चावा’ हे लहानपणीच आपल्याला शिकवलेलं आहे. हे करताना एकीकडे चोवीस तास स्वतःच्या वागण्यावर लक्ष ठेवा. हे ध्यान करताकरता लक्षात येऊ लागेल, की स्वभावातली हिंसकता हळूहळू कमी होते. तीस दिवसानंतर कदाचित थक्क व्हायला होईल इतका बदल दिसून येईल.

या ध्यानाची शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली बाजू काय आहे? डॉ. फ्रिट्झ पर्ल्स अमेरिकतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ. आपण कधी विचारही केला नसेल अशा छोट्याशाच गोष्टीवर त्यांनी आयुष्यभर सातत्याने प्रयोग केले. ते म्हणतात, जो माणूस अन्न नीट चावून जेवत नाही, त्याचं आयुष्य जास्त हिंसेनं भरलेलं असेल. याउलट जो प्रत्येक घास व्यवस्थित चावून जेवत असेल तो कमी हिंसक असेल.

दिसायला विचित्र वाटेल ही गोष्ट. चावून खाणं आणि हिंसा यांचा काय संबंध असू शकतो? डॉ. पर्ल्स यांनी तीस वर्षं अथकपणे संशोधन करून शोध लावला. ‘सगळेच प्राणी हिंसा करतात. ही हिंसा ते दातांनी करतात. माणसाचा हिंसकपणाही दातांमध्ये केंद्रित असतो. मात्र, आपल्या आहारात शाकाहारी पदार्थ प्रामुख्याने असतात. ते चावताना एवढी हिंसा निर्माण होत नाही. त्यामुळे दातांमध्ये केंद्रित असलेली अव्यक्त हिंसा संपूर्ण शरीरभर पसरते.’

डॉ. पर्ल्स यांनी अनेक वर्षं हिंसक प्रवृत्तीच्या व्यक्ती, हिंसा केल्याशिवाय राहूच शकत नव्हते असे वेडे रुग्ण, तोड-फोड करण्याशिवाय जगू न शकणारे आक्रमक लोक अशांना जेवण नीट चावून खायला शिकवलं. काही महिन्याच्या प्रयोगानंतर लक्षात आलं, की यातल्या जवळपास सगळ्यांचीच हिंसक प्रवृत्ती नष्ट झाली होती. दात, हिंसा आणि माणसाचं व्यक्तिमत्त्व यावर शास्त्रीयदृष्ट्या संशोधन करून हे वैज्ञानिक पातळीवर सिद्ध झालं. पुढे त्यांनी ‘अहंकार, भूक आणि आक्रमकता’ असं पुस्तकही लिहिलं, जे जगभर गाजलं.

खूप राग आला, तर टेबलाखाली दोन्ही हात घट्ट बांधून नखं आतमध्ये जोरात दाबावी. पाच वेळा मुठी जोरात आतमध्ये खेचा आणि उघडा. हे केल्यावर रागवायची शक्तीच उरत नाही. नखं आणि दात हे हिंसाप्रधान अवयव आहेत. प्राणी नखांनी, दातांनी हिंसा करतात. माणसाचे दात, नखं कमजोर असल्यामुळे त्याने हत्यारं बनवली. त्यांचाच त्यानं दात आणि नखं समजून वापर केला. माणसानं बनवलेली सारी हत्यारं बघितली, तर ती दाताची किंवा नखांचीच विस्तृत रूपं आहेत हे ‘ध्याना’त येतं.

ओशो रजनीश शिष्यांना हे ध्यान करायला सांगत. ‘चालताबोलता सहज घडे ध्यान’ असं योगतज्ज्ञ नेहमीच सांगतात. ‘वर्तमानात राहणं म्हणजे ध्यान’ अशी सोपी सुटसुटीत व्याख्याही आहे. अन्नचर्वणासारख्या छोट्या-छोट्या क्रिया जाणीवपूर्वक करायला शिकलं, तर सगळी दैनंदिनीच ध्यानमय होऊन जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com