अनमोल जलसंपत्ती !

पाणी नसेल तर प्राणिमात्र, वृक्षवल्ली जगू शकणार नाही.
जलसंपत्ती
जलसंपत्ती sakal
Updated on

भारतीय संस्कृतीतील स्वस्तिप्रार्थनेमध्ये संपूर्ण पृथ्वीसाठी ज्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला त्यातील महत्त्वाचा उल्लेख म्हणजे ‘काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी’ अर्थात ‘वेळेवर पावसाचा वर्षाव होवो आणि पृथ्वी धान्याने संपन्न होवो’. पाणी आहे म्हणून जीवन आहे. सर्व पृथ्वीवरील जलतत्त्व जर नष्ट झाले तर पृथ्वीचे वाळवंट व नंतर राख व्हायला वेळ लागणार नाही. मनुष्य एक वेळ पैशावाचून जगू शकतो, घर नसले तर आकाशाखाली झोपू शकतो, अन्न नसले तर झाडाची पाने खाऊन जगू शकतो, वस्त्र नसेल तर झाडाच्या साली गुंडाळून राहू शकतो; पण पाणी नसेल तर प्राणिमात्र, वृक्षवल्ली जगू शकणार नाही.

पाण्याची अनमोलता लक्षात यावी यासाठी २३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर हा सप्ताह जलसप्ताह म्हणून निर्देशित केला जातो. या निमित्ताने पाण्याचे मूल्य, पाण्याचे महत्त्व जगाला सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आयुर्वेदात, भारतीय संस्कृतीमध्ये तर पाण्याला देवत्व बहाल केलेले आढळते ते यासाठीच. जीवनदान देणारे ते जल हे समजावणारी सुंदर गोष्ट म्हणजे ‘गंगावतरण’. सगराचा वारस असलेल्या भगीरथाने खूप तपश्र्चर्या केली व अनेक प्रयत्नांनी गंगेचा पावन ओघ पुन्हा एकदा पृथ्वीकडे वळविला, त्यानंतर नुसते राजा सगराचे सहस्र मृत पुत्रच जिवंत झाले असे नाही तर पृथ्वी धनधान्याने समृद्ध झाली. भगिरथाने जशी शारीरिक, मानसिक अशुद्धीचा नाश करणारी गंगा पृथ्वीवर आणली तसेच आज आपल्यालाही पाण्याचे प्रदूषण होऊ नये, पाण्याची नासाडी होऊ नये, पाण्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी भगीरथप्रयत्न करणे आवश्यक आहे.

वास्तविक पाहता पृथ्वीच्या जवळजवळ ६६ टक्के पृष्ठभागावर पाणी आहे. परंतु पिण्यायोग्य असलेले पाणी वर्षानुवर्षे खराब करत करत खारट व न पिण्यासारखे झाले तर जसे समुद्राचे खारट पाणी पिण्यासाठी उपयोगी येत नाही, त्याचप्रमाणे हे प्रदूषित पाणीसुद्धा निरुपयोगी होणार आहे. मनुष्य मृगजळाच्या मागे धावतो असे म्हणतात पण मृगजळाने तहान भागत नाही. सध्याच्या युगातील मृगजळही (संपत्तीची चकाकी) जीवन देण्यास असमर्थ असते, त्याच्यामागे धावण्याने तहान भागत नाही. विहिरी खोदल्याचे खोटे दाखले दाखवून नंतर ती विहीर चोरीला गेल्याच्या पोलिस केसेस करणारी माणसे दिसतात. अनेक नदी-नाल्यांचेच प्रवाह आपल्या सोयीनुसार बदलून वा बुजवून टाकून तेथे मोठमोठी घरे उभी करून माणसे शेवटी काय मिळविणार आहेत? दिवसेंदिवस घरे वाढून पाणी कमी झाल्यास त्या घरांची राखरांगोळी होणार हे निश्र्चित, त्यासाठी ज्योतिष्याचा सल्ला घ्यायची वेगळी गरज नाही.

मनुष्य मृगजळाच्या मागे का धावतो व खऱ्या जळाची किंमत समजून त्याच्या प्रेमात का पडत नाही, हे एक कोडेच आहे. पश्र्चिम दिशेला असते वरुणदेवतेचे स्थान. वरुणदेवता ही जलाची देवता आहे. या एकूणच पाश्र्चिमात्य संस्कृतीमुळे असेल कदाचित पण मनुष्य भौतिकतेच्या मागे लागून जिवंत पाण्याकडे दुर्लक्ष करत आहे व त्यामुळे होत आहे पाण्याचे प्रदूषण. वास्तुशास्त्राप्रमाणे अगदी व्यवस्थित बांधलेल्या घरातसुद्धा जर ओल असेल किंवा कुठलाही नळ नीट बंद होत नसेल वा सांध्यापासून गळत असेल तर त्या घरावर अनेक संकटे येत राहतात. तेव्हा वाया जाणाऱ्या पाण्याचे महत्त्व असेही लक्षात घ्यायला हरकत नाही. सध्या नको तितके पाणी वापरण्याने पाण्याचा साठा संपुष्टात येत आहे. वातावरणातील सर्व अशुद्ध वायू व प्रदूषण वर जाऊन पावसाच्या पाण्यात विरघळल्यामुळे पावसाचे पाणीही शुद्ध स्वरूपात मिळत नाही.

सांडपाणी शुद्ध न करता, आपल्या सोयीनुसार नद्या, नाले, सरोवरात सोडल्याने त्यांच्यातही प्रदूषण वाढत राहते. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळेही पाणी दूषित होते. सध्या नको नको त्या औषधी गोष्टींचे सेवन करण्यात आलेले दिसते. हॉर्मोन्ससारखी स्त्रियांना दिलेली रसायनिक औषधे मलमूत्रावाटे शरीराबाहेर टाकली जातात व शेवटी पृथ्वीच्या पोटातील पाण्यात मिसळतात. अशा प्रकारे चारही बाजूंनी पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर चालू राहते, त्यामुळे साहजिकच साथीच्या रोगांनाही आमंत्रण मिळते. आपण पाहतो की कावीळ, कॉलरा, व्हायरल जंतुसंसर्ग असे रोग पावसाळ्यात लवकर व मोठ्या प्रमाणावर पसरत राहतात. प्रवासाला गेल्यानंतर दूषित पाणी पिण्यामुळे जुलाब होणे ही नित्याची गोष्ट झालेली दिसते.

रेल्वे-बसमधून प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूच्या ढाब्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्या कधी धुतल्या होत्या याचा इतिहास शोधणे अवघड. त्यामुळे अशा ठिकाणी साधी चूळ भरली तरी प्रदूषित पाण्यामुळे त्रास झाल्याची उदाहरणे दिसून येतात. आपली पाचही बोटे पाण्यात बुचकळून पाणी आणणाऱ्या मुलाचे दृष्य हॉटेलात दिसणे हा विनोदाचा विषय असला तरी पाण्याची साठवण करताना, ते ओतत असताना त्याच्यात प्रदूषण होण्याचा धोका असतोच. आता तर हेही सिद्ध झाले आहे की, पाणी फक्त जंतूंमुळे व घाणीमुळे प्रदूषित होत नाही तर विचारांमुळेही पाण्याचे प्रदूषण होते. शुद्ध पाण्यावर वाईट विचारांचे प्रदूषण कमी होते पण त्यावर चांगल्या विचारांचे प्रक्षेपण केल्यास पाणी अत्यंत शक्तिमान होते व असे पाणी केवळ शरीराचीच नव्हे तर आत्म्याची तृषाही भागवू शकते. जेवढे पाणी वाईट, दूषित वा विषारी असेल तेवढा त्यावर वाईट शक्तींचा व वाईट विचारांचा प्रभाव जास्ती पडतो व ते अधिकच दूषित होऊन मनुष्यमात्राच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते, हे आता सप्रयोग सिद्ध झालेले आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्‍यक असते.

जेथे जेथे पाणी असेल, मग ते पाणी ठेवायचे छोटे भांडे असो, घरासमोरची विहीर असो वा गावातील तळे असो, या सर्व ठिकाणी अत्यंत शुद्धता पाळण्याची गरज आहे. नदी म्हणजे संपूर्ण शहरातील सांडपाणी वाहून नेण्याची एक व्यवस्था नसून मनुष्य वस्तीसाठी नदीपासून बऱ्याच अंतरावर परवानगी मिळावी जेणेकरून घरातून येणारे सांडपाणी शुद्ध केल्याशिवाय थेट नदीत जाऊ नये. पाणी नेहमी गाळून व उकळून प्यावे. मला आठवते आहे की लहानपणी नर्मदेवर ध्यानधारणेसाठी जात असू व परत येताना पिण्यासाठी पाणी भरून आणत असू. आमचे वडील पावसाळ्यातील गढूळ पाणी गाळून घेऊन त्यात तुरटीचा खडा फिरवीत असत. त्यानंतर बराच वेळ ठेवल्यावर गाळ म्हणजे माती खाली बसून वरचे नितळ पाणी पुन्हा एकदा गाळून घेऊन, शक्यतो उकळून प्यायला देत असत.

यामुळे आरोग्यही चांगले राहात असे. गंगा, नर्मदा वगैरे नद्यांचे पाणी जोरात वाहत असल्याने त्यात विद्युतचुंबकीय शक्ती असण्याची शक्यता अधिक असल्याने या नद्यांचे पाणी अधिक पवित्र समजले जाते. पण गंगा सपाटीला आल्यावर तिच्या पात्रात होणाऱ्या प्रदूषणामुळे गंगेचे पाणी अशुद्ध होऊन निरुपयोगी कधी ठरेल याचा पत्ता लागत नाही. तेव्हा जीवनसंज्ञा मिळालेल्या जलसंपत्तीचा वारेमाप वापर न करता युक्तिपूर्वक वापर करणे, जलशुद्धीसाठी आपापल्या परीने दक्ष राहणे हे आपल्या सर्वांचे परमकर्तव्य होय.

( श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.