कशात करावा स्वयंपाक?

आरोग्यरक्षण हा आयुर्वेदाचा मुख्य हेतू आहे. आरोग्यरक्षणासाठी आयुष्यात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आयुर्वेदात मार्गदर्शन केलेले सापडते. आहार हा आयुष्यात सगळ्यांत महत्त्वाचा.
cook
cooksakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

आरोग्यरक्षण हा आयुर्वेदाचा मुख्य हेतू आहे. आरोग्यरक्षणासाठी आयुष्यात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आयुर्वेदात मार्गदर्शन केलेले सापडते. आहार हा आयुष्यात सगळ्यांत महत्त्वाचा.

आहारः प्रीणनः सद्योबलकृद्देहधारणः ।

स्मृत्यायुः शक्तिवर्णौजः सत्त्वशोभाविवर्धकः॥

आहाराने आपले शरीर, मन, आत्मा, इंद्रिये वगैरे तयार होतात. आहार सुखकारक असतो, मनुष्याला तृप्त करतो, सद्यबलवृद्धी करतो, देहाचे धारण करतो. स्मृती, आयुष्य, शक्ती, वर्ण, तेज, ओज हेही आहारावर अवलंबून असतात. शरीराचे आकर्षण, सुंदरता तसेच मनाचा चांगुलपणा व निर्मळता हेही आहारावरच अवलंबून असतात. त्यामुळेच आयुर्वेदात आहाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेले सापडते.

आरोग्याच्या दृष्टीने काय खावे काय खाऊ नये, एवढेच नव्हे तर स्वयंपाकघर कसे असावे, त्यात कशा प्रकारची उपकरणे असावीत, स्वयंपाक करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करावा, कशा क्रमाने करावा, पदार्थ तयार झाल्यावर कसा ठेवावा, कसा खावा येथपर्यंत सगळे मार्गदर्शन आपल्याला आयुर्वेदात सापडते.

स्वयंपाक करताना कुठल्या भांड्यांचा वापर करावा, केलेला स्वयंपाक ठेवायला कुठल्या भांड्यांचा वापर करावा, जेवावे कशात हेही महत्त्वाचे असते. कारण आहार चांगला असला तरी तो कुठल्या पात्रात ठेवला जातो आहे यानुसार आहारावर होणारे संस्कार बदलतात. आहाराचे कण सूक्ष्म स्तरावर ज्या पात्रात आहार ठेवला आहे त्या पात्राच्या अणुरेणूंच्या संपर्कात येतात व त्याचे गुणधर्म बदलतात. मला अजूनही आठवते.

एकदा एका नातेवाइकांकडे गावी गेले असता त्यांनी तांब्याचा बंब पेटवून स्नानासाठी पाणी गरम करून दिले. आज इतक्या वर्षांनाही त्या स्नानाने वाटलेली प्रसन्नता व उत्साह मी विसरलेले नाही. आज बॉयलरमधून आलेल्या गरम पाण्यात कितीही वेळ अंघोळ केली तरी ती ऊर्जा व ताजेतवानेपणा जाणवत नाही.

आहार शिजवताना सूक्ष्म संस्कारांचा विचार आपल्याला नक्कीच करावी लागतो. आहार शिजवताना उष्णतेच्या संपर्कात येतो. त्यात असलेले आम्ल, कटु, तिक्त रसांची ज्यात शिजवले आहे त्या पात्राशी रासायनिक क्रिया होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

धातूंची पात्रे : साधारणपणे माहिती असलेल्या धातूंमध्ये सोने, चांदी, लोह, कांस्य, पितळ आपल्या घरांमध्ये पाहायला मिळते. सोने व चांदी अर्थातच यांत उत्तम आहेत. सोने शीतल, मधुर, स्निग्ध, रसायन (आयुष्यवृद्धीला मदत करणारे), वृष्य, स्मृतीवर्धक, नेत्रांना हितकर, त्रिदोषांचे संतुलन करणारे तसेच यक्ष्मा, उन्माद, विषबाधा वगैरे रोगांमध्ये अत्यंत हितकारी असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणून राजा व त्याच्यासारख्या इतरांनी सोन्याचा वापर करावा असे सांगितलेले आहे. चांदीही जवळजवळ याच गुणाची असते पण थोड्या हीन स्वरूपात.

आजच्या काळात कोणालाही सोन्याच्या वा चांदीच्या पात्रात स्वयंपाक करणे शक्य नाही. पण सोन्या-चांदीशी अन्नाचा संपर्क होण्याची शक्यता असली तर तो आवर्जून होऊ द्यावा. यालाच एक पर्याय म्हणून श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे नेहमी सल्ला देत असत की संतुलन अमृतशर्करा, ज्यात सोने आहे, वापरून केलेले पंचामृत थोडा वेळ चांदीच्या वाटीत ठेवून संस्कार झाल्यावर खायला घ्यावे. यामुळे शरीरात योग्य प्रमाणात सोने जायला मदत होते व सोन्या-चांदीचे फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात.

कांस्य पात्र : कांस्य बुद्धिमत्ता वाढवते, अन्नाची रुची वाढवते, शरीरातील रक्त व पित्त यांचे प्रसादन करणे अर्थात त्यांचे गुणवर्धन करते, कफदोष संतुलित करते व जंतुघ्न असते.

लोह पात्र : शरीरातील शोथ कमी करते, नेत्रविकार व अर्श (मूळव्याध) हे विकार कमी करते, पांडू (ॲनिमिया), कामला (कावीळ) या विकारांमध्ये लोहपात्र उत्तम समजले जाते. मातीचे व दगडाचे पात्र – ही पात्रे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. यात शिजवलेले पदार्थ अत्यंत रुचकर व सर्वगुणसंपन्न असतात.

लाकडी पात्र : ही भोजनात रुची वाढवतात. कफवृद्धी करतात तसे वात व पित्ताला संतुलित करतात.

स्फटिक पात्र : ही गुणाने शीतल असतात, संपन्न असतात, शरीरात पित्तदोषाचे संतुलन करतात.

पितळेचे पात्र : पितळ अन्नाची शुद्धी करायला मदत करते, तसेच पांडुरोग, रक्तपित्ताशी संबंधित रोग व त्वचारोगांमध्ये अत्यंत उपयुक्त असते.

तांब्याचे पात्र : यात भोजन तयार करणे निषिद्ध आहे. असे केल्यास अरुची, आम्लपित्त होऊन उलट्या वगैरे होण्याचा त्रास होऊ शकतो. स्वच्छ तांब्याच्या भांड्यात पाणी उकळले वा साठवून ठेवले चालू शकते, मात्र तांब्याचे भांडे स्वच्छ नसेल तर त्याचे अपायच जास्त प्रमाणात होतात.

स्वयंपाक कुठल्याही पात्रात करायचा असला तरी ते पात्र स्वच्छ, चांगल्या गुणवत्तेचे असणे आवश्यक असते. सध्याच्या काळात लोखंडाची जागा स्टीलने घेतलेली आहे. वेगवेगळ्या गुणवत्तेचे स्टील उपलब्ध असते. त्यातल्या त्यात उच्च गुणवत्तेचे स्टील वापरणे जास्त बरे. रोजच्या स्वयंपाकासाठी शक्यतो कल्हई असलेली पितळेची भांडी, नैसर्गिक रीत्या तयार केलेली मातीची भांडी, कांस्याची व चांगल्या प्रतीची स्टीलची भांडी वापरलेली चालू शकतात. सध्या नॉनस्टिक भांडी वापरण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

या भांड्यांना काही चिकटत नाही, तेल कमी वापरावे लागते, स्वच्छ करणे सोपे असते अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नॉनस्टिक भांडी व ॲल्युमिनियची भांडी स्वयंपाकघरात शिरलेली आहेत. या भांड्याच्या वापरामुळे सध्या यकृतामधील ट्यूमर्स, ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड, मूत्रपिंडसंबंधित रोग वगैरे वाढत चाललेले आहेत. त्यामुळे शक्यतो ही भांडी न वापरणेच उत्तम. पण तरीही घरी आणलेलीच असली तर त्यांच्यावर असलेल्या कोटिंगवर चरा पडलेला नाही, त्याचे तुकडे पडून निघत नाहीत याकडे नक्की लक्ष द्यावे.

स्वयंपाक करताना जी भांडी वापरली जातात त्याचा आकार त्यात किती पदार्थ शिजवायचा आहे यावरही ठरवावा लागतो. फार मोठ्या भांड्यात कमी स्वयंपाक करणे योग्य नव्हे, तसेच फार लहान भांड्यात जास्त स्वयंपाक करणेही योग्य नाही. पदार्थ व्यवस्थितपणे हलवता येईल, उष्णता सगळीकडे लागेल अशा आकाराचे भांडे घेणे आवश्यक असते.

स्वयंपाक करून झाल्यावर तो वाढण्यासाठी दुसऱ्या पात्रात काढून घ्यायला हवा. स्वयंपाक काढण्यासाठी काचेची वा लाकडाची भांडी वापरता येऊ शकतात. तयार अन्न काढून ठेवण्यासाठी सध्या प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. पण प्लॅस्टिकचा वापरा पूर्णपणे टाळलेला बरा. पात्राचे अणू त्यात ठेवलेल्या आहारावर संस्कार करत असतात हे आपण वर पाहिले आहेच. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर केल्याने प्लॅस्टिकचे अणू शरीरात जाऊन शरीराची जीवनशक्ती कमी करतात. यामुळेही सध्या रोग पसरत चाललेले आहेत. त्यातल्या त्यात प्लॅस्टिकच्या भांड्यांमध्ये कोरडे पदार्थ ठेवले तर हरकत नाही, पण ज्यात द्रव आहे असे पदार्थ प्लॅस्टिकच्या भांड्यांत काढू नयेत.

सगळ्यांचे जेवण झाल्यावर उरलेले अन्नही प्लॅस्टिकच्या भांड्यांत वा नंतर गरम करायचे असल्यास मायक्रोवेव्हच्या भांड्यांमध्ये काढून ठेवले जाते. खरे पाहता अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे अन्नाची पोषणमूल्ये संपूर्णतः संपून जातात, व शरीरात पित्ताचे वेगवेगळे विकार होण्याची शक्यता असते. भात सोडून सर्वच पदार्थ वाढण्यासाठी अन्य भांड्यांत काढून ठेवायला हवे. आहाराचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी अशा प्रकारे प्रत्येक नियमाचे पालन करणे आवश्यक असते, किमान त्याबद्दलची माहिती ठेवणे अत्यंत अत्यावश्यक, जेणेकरून चुका कमीत कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.