व्यायाम करण्यात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असतात, असे काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात म्हटले होते.
व्यायाम करण्यात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असतात, असे काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात म्हटले होते. घर सांभाळून, नोकरी करून आमचा व्यायाम होतो, त्यामुळे इतर व्यायाम करण्याची गरज नाही, असे अनेक महिलांना वाटते. स्वयंपाक करणे, फरशी पुसणे, कचरा काढणे अशा हालचालीतून व्यायाम होतो, असे अनेकींचे मत आहे. मात्र, या पलीकडे जात कोल्हापुरातील महिलाही फिटनेसबाबत जागरुक बनत आहेत. व्यायामासाठी जिमला जाणे, डाएट प्लॅन करून वजन कमी करणे, सकाळी फिरायला जाऊन ओपन जिममधील साधनांवर व्यायाम करणे आणि कोविडपासून ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून घरीच वर्कआऊट करणे हा ट्रेंड दिसून येतो. फिट राहण्याचा महिलांचा या पद्धतीचा त्यांना कितपत फायदा होतो, याचा हा ग्राउंड रिपोर्ट...
सकाळी साडेसहाची वेळ. फुलेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात साधारण पन्नास-साठ वयातील महिला फिरण्यासाठी आल्या होत्या. लॉनवर अनवाणी पायाने काहीजणी हळूवारपणे चालत होत्या, तर काही जणी स्पोर्टस् शूज घालून वेगाने दहा-पंधरा मिनिटे चालून थांबत होत्या. साधारण एक तास चालून झाल्यावर थोडा वेळ निवांत बसल्या. त्यांना विचारले, केव्हापासून तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी येताय?, साधारण वयाच्या चाळीशीनंतर व्यायाम सुरू केलाय. हात-पाय चालत राहिले म्हणजे दुखणे लागत नाही, असे एक आजी म्हणाल्या. त्यालाच जोडून सकाळी पाऊण तास व्यायाम केला की दिवसभर फ्रेश वाटते, वजनही स्थिर राहते अशी जोड गुरव काकींनी दिली. पाटील आजी म्हणाल्या, ‘आता वयानुसार गुडघे दुखतात. मात्र फिजिओथेरपिस्टने रोज काही व्यायाम दिलेत, ते दर दोन तासाने करते. तसेच सकाळी थोडा वेळ पायही मोकळे करते. त्यामुळे जरा गुडघे बरे आहेत.’
एका खासगी फिटनेस ट्रेनरकडे प्रशिक्षण घेणाऱ्या अमृता वासुदेवन यांना त्यांचा अनुभव विचारता त्या म्हणाल्या, ‘पाच महिन्यांपूर्वी वजन कमी करायचे, बॉडी पोश्चर सुधारायचे आणि सकाळी लवकर उठण्याची चांगली सवय लागावी, यासाठी फिटनेस ट्रेनिंग घेण्यास सुरूवात केली. महिन्याभरातच मला चांगला परिणाम मिळाला. वजन कमी झाले, बॉडी पोश्चर सुधारले, त्वचाही तजेलदार बनली, पौष्टिक आहार घेऊ लागले आणि महत्त्वाचे म्हणजे चारचौघात वावरताना आत्मविश्वास निर्माण झाला. कोविड झाल्यानंतर फुफ्फूसाच्या आरोग्याचे महत्त्व कळाले. व्यायामाला सुरूवात केल्यापासून शुगरचे प्रमाणही कमी झाले.’’
शहरातील एका नामांकित जिममध्ये जाणाऱ्या कार्तिकी वाटवे यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला. ‘मी गेली बारा - तेरा वर्षे जिमला जाते. माझे वजन खूप होते, ते कमी करण्यासाठी मी जॉईन झाले. मात्र त्याचे अनेक सकारात्मक परिणाम मला मिळू लागले. रोज दीड तास वर्कआऊट केल्यानंतर दिवसभर ताजेतवाने, उत्साही वाटते. स्वतःसाठी वेळ काढल्याचा आनंद मिळतो. जिममध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या स्पर्धेतील स्वतःच्या क्षमतांची चाचपणी होते. शारीरिक आणि मानसिक सकारात्मक परिणाम मिळण्यास मदत होते.’
योगा व मेडिटेशनकडेही कल
सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकाग्रता हरपत चालली आहे. त्याचा परिणाम कामावर दिसून येतो. हे टाळण्यासाठी अनेक महिला घरच्या घरीच योगा, मेडिटेशन करत स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देतात. दिवसातील तासाभराचा वेळ योगासने, ध्यान धारणेत दिल्याने एकाग्रता वाढण्यासोबतच सकारात्मक राहण्याचा मंत्रही मिळाल्याचे अनुप्रिया कदम यांनी सांगितले.
हेही लक्षात घ्या
व्यायामात सातत्य ठेवा
सकारात्मक विचाराने ध्येय निश्चित करण्यासाठी प्रयत्न करा
सप्लिमेंट घेताना, डाएट करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या
तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायामाची निवड करा
कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून कोणताही ट्रेंड फॉलो करू नका. ऑनलाईन क्लासेस शक्यतो टाळावेत, ज्यामध्ये ट्रेनरला तुमच्या शरीराची परिस्थिती नेमकी माहिती नसते. त्यापेक्षा जिम आणि खासगी फिटनेस ट्रेनरकडून शास्त्रोक्त माहिती घेऊन व्यायाम करा. तुमचे शरीर तुम्हाला सांगत असते, ते ओळखा. ज्या दिवशी दुखणे असेल त्या दिवशी व्यायामाला विश्रांती द्या.
- ऋतुराज शिंदे, फिजिओथेरपिस्ट, सीपीआर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.