केस वाचवा, केस

अहो डॉक्टर, माझे केस फार प्रमाणात गळत आहेत. जितक्या वेळा केसांत कंगवा घालावा तितक्या वेळा पुंजकेच्या पुंजके केस बाहेर येतात.
save the hair
save the hairsakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

अहो डॉक्टर, माझे केस फार प्रमाणात गळत आहेत. जितक्या वेळा केसांत कंगवा घालावा तितक्या वेळा पुंजकेच्या पुंजके केस बाहेर येतात. घरात सगळीकडे माझे केस पडलेले दिसतात. मला वाटते येत्या काही महिन्यांत मला टक्कलच पडणार आहे, अशी तक्रार घेऊन क्लिनिकला येणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे.

केसांचा विचार महिलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात करावा लागतो कारण केसांचे सौंदर्य व केसांना मिळणारी हॉर्मोन्सची मदत स्त्रियांच्या बाबतीत जास्त दिसते. गेल्या २० वर्षांत पुरुषांमध्ये वाढत टकलांचे प्रमाण आपण हळू हळू स्वीकारत चाललो आहोत. ताणतणाव आहे, रात्रीची झोप नीट होत नाही यामुळे केस गळत असतील किंवा टक्कल पडले असेल अशी समजूत करून घेतली जाते.

पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र केस गळणे सुरू झाले की काहीतरी वेगळेच होते आहे याची जाणीव व्हायला लागते. केस लांबसडक, काळेभोर व मऊ असावेत असे प्रत्येक तरुणीला वाटत असते अर्थात सहसा केसांचा संबंध आपण सौंदर्याशी लावतो, परंतु खरे पाहता केस व्यक्तीच्या स्वास्थ्याशी निगडित असतात.

आयुर्वेदात केसांचा संबंध अस्थिधातू व शुक्रधातूशी सांगितलेला आहे. काही आचार्य केस हा उपधातू आहे मानतात तर काही आचार्य केस धातूंचा मल आहे असे सांगतात. धातूऱ्हास सुरू झाला की अशा प्रकारे केस गळताना दिसतात. केसांत आकाश व पृथ्वीधातूचे प्राधान्य असते. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी आकाश व पृथ्वीधातूचे संतुलन आणि अस्थिधातू व शुक्रधातूची संपन्नता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आपण यासाठी काही उपचार बघू या.

1) आहार : अस्थी व शुक्रधातूसंन्नतेसाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते. गाईचे नैसर्गिक दूध हे अस्थी व शुक्रधातूसंन्नतेसाठी अत्यंत उत्तम असते. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने रोज दूध नक्की प्यावे. त्यात शक्यतेनुसार संतुलन चैतन्य कल्प, संतुलन शतानंत कल्प, स्त्री संतुलन कल्प वगैरे घालून घेतल्याने धातुवृद्धीसाठी मदत मिळते.

तसेच खारीक पूड घालून उकळलेले दूध आठवड्यातून किमान २-३ वेळा घेतल्याचा फायदा होताना दिसतो. त्याचबरोबर खसखस, बदाम, खारीक, गोडांबी, चांगल्या प्रतीचा डिंक घालून केलेला डिंकाचा लाडू नियमितपणे खाण्यात ठेवावा. घरी केलेले पांढरे लोणी थोडी खडीसाखर घालून नियमितपणे खावे. गहू चांगला नाही, त्यात फार प्रमाणात ग्लुटेन असते या कारणामुळे गहू खाण्यात ठेवू नये अशी भ्रामक समजूत सध्या समाजात पसरलेली आहे.

त्यामुळे बरेच लोक गहू आहारातून वर्ज्य करतात. असे करू नये. दिवसभराच्या आहारात थोड्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा गहू असेल याची काळजी घ्यावी. सर्व प्रकारचा सुका मेवा आहारात नक्की असावा. केसांकरता बदाम व काजू उत्तम सांगितलेले आहेत. आहारात मूग, मटकी, मसूर वगैरेंसारखी कडधान्ये नक्की ठेवावीत. सध्या आपल्या आहारात ओल्या नारळाचे प्रमाण कमी झालेले आहे, तेही जाणीवपूर्वक वाढवावे.

2) अति प्रमाणात व्यायाम करण्याची प्रवृत्ती सध्या दिसून येते. व्यायाम प्रमाणात असला तर शरीरासाठी पोषक ठरतो परंतु प्रमाणापेक्षा जास्त झाला तर शरीराचा ऱ्हास करू शकतो. त्यामुळे संतुलन राहण्याच्या दृष्टीने चालायला जाणे, योगासने करणे उत्तम पण रोज जिममध्ये २-३ तास घालवणे, खूप जास्त प्रमाणात सायकल चालवणे, अति पोहणे वगैरैंमुळेही शरीरात धातूंचा ऱ्हास होतो व त्यामुळे केसगळतीचा त्रास होताना दिसतो.

3) रात्रीची व्यवस्थित झोप शरीरातील धातुपुष्टीसाठी अत्यंत गरजेची असते. त्यामुळे वेळेत झोपणे व सकाळी लवकर उठणे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. रात्री फार उशिरापर्यंत जागरण करणे व सकाळी उशिरा उठणे यामुळे शरीरात वाताचे असंतुलन होऊन केसगळती सुरू होऊ शकते.

4) केसांना तेल लावणे. केसांना पोषण घेतलेल्या आहारातूनच मिळते, केसांना तेल लावल्याने काही फायदा होत नाही, असा अपपप्रचार सध्या होताना दिसतो. पण हे खरे नाही. केसांना तेल लावल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते हे प्रत्यक्ष दिसू शकते. केसांसाठी खोबरेल तेल उत्तम आहेच, पण मेथी बी, जास्वंद, बदाम, दूध वगैरे केश्य (केसांच्या आरोग्यासाठी मदत करणाऱ्या) वनस्पती घालून सिद्ध केलेले संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेलासारखे तेल केसांना लावण्याचा फायदा होतो. हे तेल आठवड्यातून १-२दा तरी केसांच्या मुळाशी नक्की लावावे व नंतर केस धुवावे. केस फार जास्त प्रमाणात गळत असले तर नाकात नस्यसॅन घृत टाकण्याचा तसेच शिरोधारा व शिरोबस्ती करून घेण्याचा उपयोग होताना दिसतो.

5) केस धुण्यासाठी शांपूचा वापर कमीत कमी करावा. शांपू वापरायचाच असला तर त्यातल्या त्यात अगदी सौम्य (माइल्ड) शांपू वापरावा. एकाच वेळी २-३ वेळा शांपू लावून खूप फेस करून केस धुवू नयेत. शक्यतो भृंगराज, रिठा, आवळा, हिरडा, बेहडा, जास्वंद वगैरे वापरून केस धुणे बरे. संतुलन सुकेशा केस धुण्यासाठी उत्तम.

6) केसांचा नितळपणा टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मास्क लावणेही उत्तम. ओल्या नारळाचे दूध, ताजा कोरफडीचा गर, जास्वंदीच्या फुलांचा कल्क, मुलतानी माती, मेथी दाण्यांची पूड हे केशवर्धनासाठी व केस काळे राहण्यासाठी, कोंडा होऊ नये यासाठी मदत करतात. संतुलन पित्त हेअर पॅक व संतुलन वात हेअर पॅक आठवड्यातून १-२ वेळा पाण्यात मिसळून लावल्यास फायदा होतो. शक्य असल्यास हे हेअर पॅक कोरफडीच्या ताज्या गरात मिसळून लावल्याचा अधिक फायदा मिळू शकेल.

7) याचबरोबरीने केसांच्या आरोग्यासाठी संतुलन प्रवाळपंचामृत, संतुलन पित्तशांती, हेअरसॅन वगैरेंसारखा पूरक गोष्टी नियमितपणे घेणे चांगले.

8) शरीरात जीवनसत्वांची कमतरत असल्यासही केस गळू शकतात, त्यासाठी रक्ततपासणी करून घेऊन शरीराला आवश्यक त्या जीवनसत्वांची पूर्ती करणे चांगले.

केस आपल्या शरीराच्या आरोग्याचे द्योतक तर असतातच, पण त्याचबरोबरीने व्यक्तिमत्वासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.